Search This Blog

Tuesday, August 9, 2016

सहा राजकीय पक्षांची नोंदणी कायम

कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर राज्य निवडणूक आयोगाकडून
विविध सहा राजकीय पक्षांची नोंदणी कायम
                                  -राज्य निवडणूक आयुक्त
        मुंबई, दि. 9: स्वाभिमानी पक्ष, लोकभारती, जनसुराज्य शक्ती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), ऑल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमिन व अमळनेर तालुका विकास आघाडी या राजकीय पक्षांनी एक लाख रुपये दंड भरून आयकर विवरणपत्रे व लेखा परीक्षण लेख्याच्या प्रती सादर केल्याने त्यांची नोंदणी कायम करण्यात आली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
       श्री. सहारिया यांनी सागितले की, नोटीस बजावूनही आयकर विवरणपत्रे व लेखा परीक्षण लेख्याच्या प्रती सादर न करणाऱ्या 197 अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाने विविध टप्प्यांत रद्द केली होती. त्यापैकी आठ राजकीय पक्षांनी कागदपत्रे सादर करण्यास मुदत वाढ मागितली होती. त्यांना एक लाख रुपये दंड आकारून तीन महिन्यांची मुदत वाढ दिली होती. यापैकी सहा पक्षांनी वाढीव मुदतीत कागदपत्रांची पूर्तता केल्याने त्यांची नोंदणी कायम करण्यात आली आहे. ताराराणी आघाडी पक्ष आणि स्वाभिमान काँग्रेस पक्षाला 30 सप्टेंबर 2016 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत कागदपत्रांची पूर्तता न केल्यास त्यांची नोंदणी रद्द असल्याचे समजण्यात येईल.

      स्वाभिमानी पक्ष, लोकभारती, जनसुराज्य शक्ती व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) या पक्षांची 15 सप्टेंबर 2015 रोजी नोंदणी रद्द करण्यात आली होती. दंड व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर स्वाभिमानी पक्षाची 4 जानेवारी 2016, लोकभारती व जनसुराज्य शक्तीची 25 जानेवारी 2016; तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) ची 24 मे 2016 रोजी नोंदणी कायम करण्यात आली. ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमिन आणि अमळनेर तालुका विकास आघाडी या पक्षांची नोंदणी 20 एप्रिल 2016 रोजी रद्द करण्यात आली होती. दंड व कायदपत्रांच्या पूर्ततेनंतर त्यांची नोंदणी 8 ऑगस्ट 2016 रोजी कायम करण्यात आली. रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) आणि स्वाभिमान विकास आघाडी या दोन पक्षांनीही आता एक लाख रुपये दंड भरून मुदत वाढ मागितली आहे, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.