Search This Blog

Tuesday, February 25, 2020

नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांची 9 मार्चला प्रसिद्धी


नाशिक, धुळे, परभणी व ठाणे महानगरपालिका पोटनिवडणुका
नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिकेच्या
प्रारूप मतदार याद्यांची 9 मार्चला प्रसिद्धी
मुंबई, दि. 25 (रानिआ): नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तर नाशिक, धुळे, परभणी व ठाणे या चार महानगरपालिकांतील प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीकरिता 9 मार्च 2020 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
विधानसभा मतदारसंघाच्या 31 जानेवारी 2020 रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येतील. त्या आधारावर तयार करण्यात येणाऱ्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 9 मार्च 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. या प्रारूप मतदान याद्यांवर 16 मार्च 2020 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय मतदार याद्या व मतदान केंद्रांच्या याद्या अनुक्रमे 23 व 24 मार्च 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. अंतिम मतदार याद्या 26 मार्च 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
नाशिक महानगरपालिकेच्या 4अ, धुळे महानगरपालिकेच्या 5ब, परभणी महानगरपालिकेच्या 11ब आणि ठाणे महानगरपालिकेच्या 30अ या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील या मतदार याद्या तयार करण्यात येत आहेत.
प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात.

Monday, February 24, 2020

दीड हजार ग्रामपंचायतींसाठी 29 मार्च रोजी मतदान


दीड हजार ग्रामपंचायतींसाठी
29 मार्च रोजी मतदान
मुंबई, दि. 24 (रा.नि.आ.): राज्यातील 19 जिल्ह्यांतील सुमारे 1 हजार 570 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29 मार्च 2020 रोजी मतदान; तर 30 मार्च 2020 रोजी मतमोजणी होणार आहे.
संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल 2020 ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होत आहेत. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे 6 ते 13 मार्च 2020 या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 16 मार्च 2020 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 18 मार्च 2020 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 29 मार्च 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतमोजणी 30 मार्च 2020 रोजी होईल.
सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 13, रायगड- 1, रत्नागिरी- 8, नाशिक- 102, जळगाव- 2, अहमनगर- 2, नंदुरबार- 38, पुणे- 6, सातारा- 2, कोल्हापूर- 4, औरंगाबाद- 7, नांदेड- 100, अमरावती- 526, अकोला- 1, यवतमाळ- 461, बुलडाणा- 1, नागपूर- 1, वर्धा- 3 आणि गडचिरोली- 296. एकूण- 1570.

Monday, February 3, 2020

निवडणुकांसंदर्भातील संशोधनासाठी आयोगाचे प्रोत्साहन



राज्य निवडणूक आयोगाचे प्रोत्साहन
                -यू. पी. एस. मदान
मुंबई, दि. 3 (रा.नि.आ.): स्थानिक‍ स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे विविध पैलू समजून घेण्यासाठी पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांनी संशोधन प्रकल्प हाती घ्यावेत. त्यासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मानस आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
लोकशाही पंधरवड्यानिमित्त एस. के. सोमय्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि राज्य निवडणूक आयोगाच्या लोकशाही, निवडणुका व सुशासन संस्थेतर्फे (आयडीईजीजी) आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सोमय्या ट्रस्टचे सचिव निवृत्त लेफ्टनंट जनरल जगबिर सिंह, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मनाली लोंढे, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. नितीन मोहोड, आयडीईजीजीचे विशेष कार्याधिकारी डॉ. मृदुल निळे यावेळी उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात बोलताना श्री. मदान म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यांच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा पाया आहे. या निवडणुका अधिक चुरशीच्या आणि गुंतागुंतीच्या असतात. त्यामुळे त्यांचे विविध पैलू समजून घेणे आवश्यक असल्याने त्याबाबत शास्त्रीय पद्धतीने संशोधन होण्याची गरज आहे. यात विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. राज्य निवडणूक आयोग निश्चितच सहकार्य करेल.
श्री. जगबिर सिंह म्हणाले की, लोकशाही ही महत्वाची आणि बहुसंख्य देशांनी स्वीकारलेली शासन प्रणाली आहे. या प्रणालीत प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य प्राप्त होते; परंतु त्याचबरोबर जबाबदारीही होते. जबाबदारीबरोबरच शिस्तदेखील महत्वाची असते. जबाबदार नागरिक म्हणून आपल्या सर्वांना पुढे घेवून जाणारे लोकप्रतिनिधी निवडून देणे गरजेचे असते. त्यावरच लोकशाहीचे भवितव्य अवलंबून असते.
राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकाराने 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत दरवर्षी लोकशाही पंधरवडा साजरा केला जातो. त्यानिमित्ताने सोमय्या महाविद्यालयात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या निमित्ताने लोकशाही आणि मतदार जागृतीसंदर्भात एका प्रदर्शनाचीही यावेळी आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्‌घाटन श्री. मदान यांच्याहस्ते यावेळी करण्यात आले.