Search This Blog

Tuesday, August 30, 2016

नगरपरिषदा : 26 सप्टेंबर व 10 ऑक्टोबरला प्रारूप मतदार यादी

नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांसाठी दोन टप्प्यांमध्ये
26 सप्टेंबर व 10 ऑक्टोबरला प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी
प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 12 दिवस

       मुंबई, दि. 30: राज्यातील 169 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी 26 सप्टेंबर 2016 रोजी; तर 45 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 10 ऑक्टोबर 2016 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, त्यानंतर त्यावर 12 दिवसांपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.
          श्री. सहारिया यांनी सांगितले की, राज्यातील 4 नगरपंचायतींसह 191 नगरपरिषदांच्या डिसेंबर 2016 ते फेब्रुवारी 2017 या कालावधीत मुदती संपत आहेत; तसेच 3 नगरपरिषदा आणि 16 नगरपंचायतींची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. अशा एकूण 214 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकासांठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दोन टप्प्यांत असून पहिल्या टप्यात मुदती संपणाऱ्या 151 व 18 नवनिर्मित नगरपरिषदा व नगरपंचायतींचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात 1 नवनिर्मित नगरपरिषदेसह मुदती संपणाऱ्या 44 नगरपरिषदा व नगरपंचायतींचा समावेश आहे.
          पहिल्या टप्प्यात पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या 26 जिल्ह्यांतील एकूण 169 नगरपरिषदा व नगरपंचायतींचा समावेश आहे. त्यांच्या निवडणुकांसाठी 26 सप्टेंबर 2016 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर या यादीवर 7 ऑक्टोबर 2016 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. 15 ऑक्टोबर 2016 रोजी प्रभानिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल, असे त्यांनी सांगितले.
          दुसऱ्या टप्प्यात पुणे, औरंगाबाद, नांदेड, लातूर, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या 7 जिल्ह्यांतील एकूण 45 नगरपरिषदा व नगरपंचायतींचा समावेश आहे. त्यांच्या निवडणुकांसाठी 10 ऑक्टोबर 2016 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर या यादीवर 21 ऑक्टोबर 2016 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. 29 ऑक्टोबर 2016 रोजी प्रभागनिहाय अंमित मतदार यादी प्रसिद्ध होईल, अशी माहितीही श्री. सहारिया यांनी दिली.