Search This Blog

Friday, December 2, 2016

अंतिम मतदार यादी 21 जानेवारीला

महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका 2017
मतदार यादीवर हरकती व सूचनांसाठी 12 पासून 17 जानेवारीपर्यंत मुदत
अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी 21 जानेवारीला
मुंबई, दि. 2: राज्यातील 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषदा व 296 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तयार करण्यात येणाऱ्या मतदार यादीवर 12 ते 17 जानेवारी 2017 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील; तर अंतिम मतदार यादी 21 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाकडून 1 जानेवारी 2017 च्या अर्हता दिनांकावर आधारीत तयार करण्यात येणारी विधानसभा मतदार संघाचीच मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ही यादी महानगरपालिकांसाठी प्रभागनिहाय, जिल्हा परिषदांसाठी निवडणूक विभागनिहाय; तर पंचायत समित्यांसाठी निर्वाचक गणनिहाय विभागण्यात येईल. भारत निवडणूक आयोगाने 16 सप्टेंबर 2016 रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीचे विभाजन 15 डिसेंबर 2016 पर्यंत करण्यात येईल. त्यानंतर ती मतदार यादी संबंधित महानगरपालिका, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदांच्या संकेतस्थळांवर सर्वांच्या माहितीस्तव प्रसिद्ध केली जाईल.
नवीन मतदार नोंदणीसाठी भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकानुसार 16 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर 2016 या कालावधीत नवीन मतदार नोंदणी; तसेच नाव व पत्त्यांतीतील दुरुस्तीसाठी अर्ज मागविले होते. या कालावधीत प्राप्त झालेले अर्ज विचारात घेऊन भारत निवडणूक आयोग 5 जानेवारी 2017 रोजी विधानसभा मतदार संघांची पुरवणी यादी प्रसिद्ध करणार आहे. या पुरवणी यादीचेही महानगरपालिकांसाठी प्रभागनिहाय, जिल्हा परिषदांसाठी निवडणूक विभागनिहाय; तर पंचायत समित्यांसाठी निर्वाचक गणनिहाय विभाजन करून ती 12 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध केली जाईल. विभाजित करण्यात येणाऱ्या 16 सप्टेंबर 2016 च्या प्रारूप व 5 जानेवारी 2017 च्या पुरवणी मतदार यादीवर 12 ते 17 जानेवारी 2017 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करण्यात येतील. 21 जानेवारी 2017 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. भारत निवडणूक आयोगाकडून 5 जानेवारी 2017 रोजी विधानसभा मतदार संघांची पुरवणी यादी प्रसिद्ध करण्याची तारीख बदलल्यास त्यानुसार महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठीच्या मतदार यादीच्या कार्यक्रमातही बदल होईल, असे त्यांनी सांगितले.
फक्त याच सुधारणा शक्य...
विधानसभा मतदार संघाच्या यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी 21 ऑक्टोबर 2016 पर्यंत अर्ज केलेल्या व त्यास भारत निवडणूक आयोगाने मंजूर केलेल्या नावांचाच महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्याच मतदार यादीत समावेश असेल. विधानसभेच्या मूळ यादीत कोणत्याही दुरुस्त्या करता येणार नाहीत. विधानसभेच्या मतदार यादीचे विभाजन करताना एखादा मतदार मयत, स्थलांतरित अथवा दुबार आढळल्यास किंवा तशा तक्रारी आल्यास अशा मतदारांच्या नावासमोर केवळ नोंद करण्यात येते. अशा मतदाराचे मतदार यादीत छायाचित्र नसल्यास त्याचे अधिक पुरावे तपासूनच त्याला मतदान करण्याची संधी दिली जाते. त्याचबरोबर मतदार यादीचे प्रभाग, निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणनिहाय विभाजन करताना लेखनिकांकडून चूक झाली असल्यास किंवा वेगळ्याच प्रभागात चुकून नावाचा समावेश झाला असल्यास अशा दुरूस्त्या आक्षेपानंतर करण्यात येतात; तसेच संबंधित विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही ते विभाजित मतदार यादीतून वगळले गेले असल्यास त्याचादेखील समावेश करण्यात येतो, असेही श्री. साहारिया यांनी सांगितले.
निवडणुका होणाऱ्या 10 महानगरपालिकांची नावे अशी: 1) बृहन्मुंबई, 2) ठाणे, 3) उल्हासनगर, 4) नाशिक, 5) पुणे, 6) पिंपरी-चिंचवड, 7) सोलापूर, 8) अमरावती, 9) अकोला आणि 10) नागपूर.
निवडणुका होणाऱ्या जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांची संख्या: 1) रायगड- 15, 2) रत्नागिरी-9, 3) सिंधुदुर्ग- 8, 4) नाशिक- 15, 5) जळगाव- 15, 6) अहमदनगर- 14, 7) पुणे- 13, 8) सातारा- 11, 9) सांगली- 10, 10) सोलापूर- 11, 11) कोल्हापूर- 12, 12) औरंगाबाद- 9, 13) जालना- 8, 14) परभणी- 9, 15) हिंगोली- 5, 16) बीड- 11, 17) नांदेड- 16, 18) उस्मानाबाद- 8, 19) लातूर- 10, 20) अमरावती- 10, 21) बुलडाणा- 13, 22) यवतमाळ- 16, 23) नागपूर- 13, 24) वर्धा- 8, 25) चंद्रपूर- 15 आणि 26) गडचिरोली- 12. एकूण जिल्हा परिषदा- 26 व एकूण पंचायत समित्या- 296.
                           महानगरपालिकांचा तपशील:
·         निवडणूक होणाऱ्या महानगरपालिका- 10
·         एकूण लोकसंख्या- 2,57,19,093
·         एकूण प्रभाग- 490
·         एकूण जागा- 1,268 (महिला 636)
·         सर्वसाधारण- 716 (महिला- 353)
·         अनुसूचित जाती- 171 (महिला 88)
·         अनुसूचित जमाती- 38 (महिला 20)
·         नागरिकांचा मागासप्रवर्ग- 343 (महिला 175)
जिल्हा परिषदांचा तपशील:
·         निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदा- 26
·         एकूण लोकसंख्या- 5,26,92,534
·         एकूण जागा- 1,568 (महिला 787)
·         सर्वसाधारण- 781 (महिला 380)
·         अनुसूचित जाती- 200 (महिला 106)
·         अनुसूचित जमाती- 164 (महिला 86)
·         नागरिकांचा मागासप्रवर्ग- 424 (महिला 216) 
पंचायत समित्यांचा तपशील:
·         निवडणूक होणाऱ्या पंचायत समित्या- 296
·         एकूण लोकसंख्या- 5,24,14,683
·         एकूण जागा- 3,116 (महिला 1,558)
·         सर्वसाधारण- 1,574
·         अनुसूचित जाती- 406
·         अनुसूचित जमाती- 308
·         नागरिकांचा मागासप्रवर्ग- 828