Search This Blog

Thursday, December 19, 2019

विविध महानगरपालिकांच्या पोटनिवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची 27 डिसेंबरला प्रसिद्धी


विविध महानगरपालिकांच्या पोटनिवडणुकांसाठी
 प्रारूप मतदार याद्यांची 27 डिसेंबरला प्रसिद्धी
मुंबई, दि. 19 (रानिआ): नांदेड- वाघाळा, जळगाव, परभणी आणि अहमदनगर या चार महानगरपालिकांमधील प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीकरिता 27 डिसेंबर 2019 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
श्री. मदान यांनी सांगितले की, यासाठी 4 ऑक्टोबर 2019 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येतील. त्याआधारावर तयार करण्यात येणाऱ्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 27 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्या दिवसापासून त्यावर 3 जानेवारी 2020 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय मतदार याद्या व मतदान केंद्रांच्या याद्या अनुक्रमे 8 व 9 जानेवारी 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. अंतिम मतदार याद्या 11 जानेवारी 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशी माहितीही श्री. मदान यांनी दिली.
पोटनिवडणूक होणारे महानगरपालिकानिहाय प्रभाग: नांदेड- वाघाळा- 13ड, जळगाव- 19अ, परभणी- 14अ, आणि अहमदनगर- 6अ.

Tuesday, December 17, 2019

पालघर जिल्हा परिषदेसाठी 7 जानेवारीला मतदान


पालघर जिल्हा परिषदेसाठी
7 जानेवारीला मतदान
मुंबई, दि. 17 (रानिआ): पालघर जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या 8 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 जानेवारीला मतदान; तर 8 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 18 ते 23 डिसेंबर 2019 या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. 22 डिसेंबर 2019 रोजी सार्वजनिक सुट्‌टी असल्यामुळे नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. छाननी 24 डिसेंबर 2019 रोजी होईल. अपील नसल्यास 30 डिसेंबर 2019 रोजी उमेदवारी मागे घेता येईल. अपील असलेल्या ठिकाणी 1 जानेवारी 2020 रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. मतदान 7 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडेल. मतमोजणी संबंधित ठिकाणी 8 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.
पालघर जिल्हा परिषदेंतर्गत तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, पालघर आणि वसई या आठ पंचायत समित्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 57 जागांसाठी ही निवडणूक होत असून 29 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. आठ पंचायत समित्यांच्या 114 जागांसाठी निवडणूक होईल. त्यातील 57 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत, असेही श्री. मदान यांनी सांगितले.
              निवडणूक कार्यक्रम
·        नामनिर्देशनपत्र सादर करणे- 18 ते 23 डिसेंबर 2019
·        नामनिर्देशनपत्रांची छाननी- 24 डिसेंबर 2019
·        अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 30 डिसेंबर 2019
·        अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- 1 जानेवारी 2020
·        मतदानाचा दिनांक- 7 जानेवारी 2020
·        मतमोजणीचा दिनांक- 8 जानेवारी 2020

Wednesday, December 11, 2019

आता 190 मुक्त चिन्हे


         राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण 260 राजकीय पक्षांची नोंदणी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता 190 मुक्त चिन्हे
मुंबई, दि. 11 (रा.नि.आ.): राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण 260 राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी 16 मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत. उर्वरित 244 नोंदणीकृत राजकीय पक्ष; तसेच अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आता 48 ऐवजी 190 मुक्त चिन्हे निश्चित केली आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
श्री. मदान यांनी सांगितले की, राज्यातील ग्रामपंचायती वगळता अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षीय पातळीवर लढविल्या जातात. त्यासाठी संबंधित राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे बंधनकारक असते. भारत निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त पक्षाने राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केल्यास संबंधित पक्षाचे निवडणूक चिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीदेखील आरक्षित केले जाते. राज्य निवडणूक आयोगाकडे अशा एकूण 16 पक्षांनी नोंदणी केली आहे. त्यात सहा राष्ट्रीय, दोन महाराष्ट्रातील राज्यस्तरीय; तर आठ इतर राज्यातील राज्यस्तरीय राजकीय पक्षांचा समावेश आहे. उर्वरित 244 नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत. यांच्यासाठी कुठलेही निवडणूक चिन्ह आरक्षित नसते. हे सर्व मिळून आतापर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण 244 राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या 18 जानेवारी 2017 च्या अधिसूचनेनुसार 48 मुक्त चिन्हे निश्चित करण्यात आली होती. त्यात आता 30 नोव्हेंबर 2019 रोजीच्या अधिसूचनेनुसार 142 नव्या चिन्हांची भर घालण्यात आली आहे. त्यामुळे ही संख्या आता 190 झाली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (कणीस आणि विळा), भारतीय जनता पार्टी (कमळ), नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (घड्याळ), भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी (हातोडा विळा व तारा), बहुजन समाज पक्ष (हत्ती), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (हात) या राष्ट्रीय पक्षांसाठी आणि शिवसेना (धनुष्यबाण) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन) या महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पक्षांसाठी; तसेच जनता दल सेक्यूलर (डोक्यावर भारा घेतलेली स्त्री), समाजवादी पार्टी (सायकल), इंडियन युनियन मुस्लिम लीग (शिडी), लोक जनशक्ती पार्टी (बंगला), ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम (दोन पाने), जनता दल युनायटेड (बाण), ऑल इंडिया मजलिस हत्तेहदूल मुस्लिमीन (पतंग) व आम आदमी पार्टी (झाडू) या इतर राज्यातील राज्यस्तरीय पक्षांसाठी संबंधित निवडणूक चिन्हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीदेखील आरक्षित आहेत, असेही श्री. मदान यांनी सांगितले.
राज्य निवडणूक आयोगाच्या 30 नोव्हेंबर 2019 च्या अधिसूचनेनुसार मुक्त चिन्हांची यादी (यातील 48 क्रमांकापर्यंतची चिन्हे यापूर्वीदेखील होती): 1) कपाट, 2) ब्रश, 3) डिझेल पंप, 4) इस्त्री, 5) करवत, 6) तंबू, 7) फुगा, 8) केक, 9) विजेचा खांब, 10) जग, 11) कात्री, 12) व्हायेलीन, 13) टोपली, 14) कॅमेरा, 15) काटा, 16) किटली, 17) शिवणयंत्र, 18) चालण्याची काठी, 19) बॅट, 20) मेणबत्ती, 21) कढई, 22) शटल, 23) शिटी, 24) फलंदाज, 25) छताचा पंखा, 26) गॅस सिलेंडर, 27) पत्रपेटी, 28) पाटी, 29) विजेरी (टॉर्च), 30) कोट, 31) काचेचा पेला, 32) मका, 33) स्टूल, 34) फळा, 35) नारळ, 36) हार्मोनियम, 37) नगारा, 38) टेबल, 39) पाव, 40) कंगवा, 41) हॅट, 42) अंगठी, 43) टेबल लॅम्प, 44) ब्रिफकेस, 45) कपबशी, 46) आईसक्रीम, 47) रोड रोलर 48) दूरदर्शनसंच, 49) एअर कंडिशनर, 50) सफरचंद, 51) ऑटो रिक्षा, 52) पांगुळ गाडा, 53) मण्यांचा हार, 54) पट्टा, 55) बाकडे, 56) सायकल पंप, 57) दुर्बिण, 58) बिस्किट, 59) होडी, 60) पुस्तक, 61) पेटी, 62) ब्रेड टोस्टर, 63) विटा, 64) बादली, 65) बस, 66) गणकयंत्र, 67) ढोबळी मिर्ची, 68) गालिचा, 69) कॅरम बोर्ड, 70) खटारा, 71) फुलकोबी, 72) सीसीटीव्ही कॅमेरा, 73) साखळी, 74) जाते, 75) पोळपाट लाटणे, 76) बुद्धिबळ, 77) चिमणी, 78) चिमटी/ क्लिप, 79) नारळाची बाग, 80) रंगाचा ट्रे व ब्रश, 81) संगणकाचा माऊस, 82) संगणक, 83) क्रेन, 84) घन ठोकळा, 85) हिरा, 86) डिश अँन्टेना, 87) दरवाज्याची घंटी, 88), दरवाज्याची मूठ, 89) ड्रील मशीन, 90) डंबेल्स, 91) कानातले दागिने (कर्णफुले), 92) लिफाफा, 93), एक्सटेंशन बोर्ड, 94) बासुरी, 95) फूटबॉल, 96) कारंजे, 97) नरसाळे, 98) ऊस, 99) भेट वस्तू, 100) आले, 101) चष्मा, 102) द्राक्षे, 103) हिरवी मिरची, 104) हात गाडी, 105) हेड फोन, 106) हेलिकॉप्टर, 107) हेल्मेट, 108) हॉकी, 109) वाळूचे घड्याळ, 110) पाणी गरम करण्याचे हिटर, 111) फणस, 112) चावी, 113) भेंडी, 114) लॅपटॉप, 115) कडी, 116) लाईटर, 117) ल्यूडो, 118) जेवणाचा डब्बा, 119) काडेपेटी, 120) माईक, 121) मिक्सर, 122) नेल कटर, 123) गळ्यातील टाय, 124) कढई, 125) भूईमुग, 126) पेर, 127) वाटाणे, 128) पेन ड्रॉईव्ह, 129) पेनाची नीब, 130) पेन स्टॅंड, 131) कंपास पेटी, 132) पेन्सिल शार्पनर, 133) खलबत्ता, 134) पेट्रोल पंप, 135) फोन चार्जर, 136) उशी, 137) अननस, 138) प्लास्टर थापी, 139) जेवणाची थाळी, 140) घागर, 141) पंचिंग मशीन, 142) फ्रिज, 143) रूम कुलर, 144) रबरी शिक्का, 145) सेफ्टी पीन, 146) करवत, 147) शाळेची बॅग, 148) स्कुटर, 149) बोट, 150) शटर, 151) शितार, 152) दोरी उडी, 153) साबण, 154) मोजे, 155) सोफा, 156) पाना, 157) स्टॅप्लर, 158) स्टेथोस्कोप, 159) स्टम्प, 160) सूर्यफूल, 161) झोका, 162) स्वीच बोर्ड, 163) इंजेक्शन, 164) टीव्ही रिमोट, 165) टॅक्सी, 166) चहाची गाळणी, 167) दूरध्वनी, 168) भाला फेकणारा, 169) नांगर, 170) चिमटा, 171) दातांचा ब्रश, 172) दातांची पेस्ट, 173) टॅक्टर, 174) बिगूल, 175) तुतारी, 176) टाईप रायटर, 177) टायर्स, 178) छत्री, 179) वॅक्यूम क्लिनर, 180) वॉल हूक, 181) पाकिट, 182) अक्रोड, 183) कलिंगड, 184) पाण्याची टाकी, 185) विहीर, 186) पवन चक्की, 187) खिडकी, 188) सूप, 189) कॅन आणि  190) लोकरीचा गुंडा व सुई.

Tuesday, December 10, 2019

नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी 9 जानेवारी रोजी मतदान


नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी
9 जानेवारी रोजी मतदान
मुंबई, दि. 10 (रा.नि.आ.): कन्हान- पिंपरी (जि. नागपूर) व गडचांदूर (जि. चंद्रपूर) नगरपरिषद आणि लांजा (जि. रत्नागिरी) नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तर इतर विविध नगरपरिषदा/ नगरपंचायतींमधील सहा रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 9 जानेवारी 2020 रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 10 जानेवारी 2020 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
श्री. मदान यांनी सांगितले की, या सर्व संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 डिसेंबर 2019 या कालावधीत सादर करता येतील. त्यांची छाननी 21 डिसेंबर 2019 रोजी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 27 डिसेंबर 2019 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी अपिलाच्या निर्णयानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. मतदान 9 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 10 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.
रिक्तपदांसाठी पोटनिवडणुका होणाऱ्या जागांचा नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय तपशील: तळेगाव दाभाडे (जि. पुणे)- 7ब, देवळा (नाशिक)- 11, भुसावळ (जळगाव)- 24अ, नेवासा (अहमदनगर)- 13, नांदुरा (बुलढाणा)- 7ब आणि कळमेश्वर ब्राम्हणी (नागपूर)- हद्दवाढ क्षेत्रासाठी.

Monday, December 9, 2019

अमरावती जिल्ह्यातील तीन पंचायत समित्यांचे निकाल


बृहन्मुंबईसह विविध महानगरपालिकांमधील सात रिक्तपदांसाठी 9 जानेवारीला मतदान


बृहन्मुंबईसह विविध महानगरपालिकांमधील
सात रिक्तपदांसाठी 9 जानेवारीला मतदान
मुंबई, दि. 9 (रानिआ): बृहन्मुंबई, नाशिक, मालेगाव, नागपूर, लातूर व पनवेल या सहा महानगरपालिकांमधील सात रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 9 जानेवारीला मतदान; तर 10 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
श्री. मदान यांनी सांगितले की, नामनिर्देशनपत्रे 16 ते 23 डिसेंबर 2019 या कालावधीत दाखल करता येतील. 22 डिसेंबर 2019 रोजी शासकीय सुट्टी असल्यामुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. 24 डिसेंबर 2019 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 26 डिसेंबर 2019 पर्यंत असेल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना 27 जानेवारी 2019 रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. 9 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 10 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.
पोटनिवडणुका होणारे महानगरपालिकानिहाय प्रभाग: नाशिक- 22अ आणि 26अ, मालेगाव- 12 ड, नागपूर- 12ड, लातूर- 11अ, पनवेल- 19ब आणि बृहन्मुंबई- 141.   

Thursday, December 5, 2019

34 ग्रामपंचायतींसाठी 9 जानेवारीला मतदान


 34 ग्रामपंचायतींसाठी
 9 जानेवारीला मतदान
मुंबई, दि. 5 (रा.नि.आ.): राज्यातील विविध 8 जिल्ह्यांमधील 34 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर 9 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 9 जानेवारी 2020 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.
श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व ठिकाणी नामनिर्देशनपत्रे 19 ते 24 डिसेंबर 2019 या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 26 डिसेंबर 2019 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबर 2019 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 9 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 10 जानेवारी 2020 रोजी होईल.
सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: अहमदनगर- 8, नाशिक- 6, ठाणे- 2, जळगाव- 7, यवतमाळ- 4, नागपूर- 2, औरंगाबाद- 2, आणि सातारा- 3. एकूण- 34.

Monday, December 2, 2019

पालघर जि. प. निवडणुकीसाठी मतदार याद्या


पालघर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी
7 डिसेंबरला मतदार याद्यांची प्रसिद्धी
मुंबई, दि. 2 (रा.नि.आ.): पालघर जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या आठ पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 डिसेंबर 2019 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावर 11 डिसेंबर 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.
श्री. मदान यांनी सांगितले की, या निवडणुकांकरिता 4 ऑक्टोबर 2019 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येतील. त्या आधारावर तयार करण्यात येणाऱ्या निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 7 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्या दिवसापासून त्यावर 11 डिसेंबर 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय अंतिम मतदार याद्या 16 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्यादेखील त्याच दिवशी प्रसिद्ध केल्या जातील.
निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशी माहितीही श्री. मदान यांनी दिली.

Friday, November 29, 2019

चंदगड, हातकणंगले व ढाणकी नगरपंचायतींसाठी 29 डिसेंबरला मतदान


चंदगड, हातकणंगले व ढाणकी नगरपंचायतींसाठी 29 डिसेंबरला मतदान
विविध नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान
मुंबई, दि. 29 (रा.नि.आ.): कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व हातकणंगले आणि यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी या नवनिर्मित 3 नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक; तसेच 26 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील विविध 22 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 29 डिसेंबर 2019 रोजी मतदान; तर 30 डिसेंबर 2019 रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांसाठी 4 ते 12 डिसेंबर 2019 या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. 8 डिसेंबर 2019 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. छाननी 13 डिसेंबर 2019 रोजी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 18 डिसेंबर 2019 रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी न्यायालयाचा निकाल आल्यानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 29 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 30 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल.
नगरपरिषद/ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुका: मोर्शी, धरणगाव, रत्नागिरी आणि सावंतवाडी.
नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय पोटनिवडणूक होणाऱ्या जागांचा तपशील: गडहिंग्लज- हद्दवाढ क्षेत्रासाठी, मलकापूर- 7ब, वाई- 8अ, खानापूर- 7, बार्शी- 5अ, मनमाड- 1ब, भुसावळ- 4अ, भडगाव- 3ड, नवापूर- 6अ आणि 7अ, परंडा- 7ब, कळंब- 8ब, उमरेड- 11अ, भिवापूर- 4, सिंधी (रेल्वे)- 8क, मोहाडी- 4, 9 आणि 12, साकोली- 6ब, कोरपणा- 16, भामरागड- 5 आणि 16.

Tuesday, November 19, 2019

नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूक


नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या
सार्वत्रिक निवडणुकीसाठी 7 जानेवारीला मतदान
मुंबई, दि.19 (रानिआ): नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 36 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 जानेवारीला मतदान; तर 8 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या सर्व निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2019 पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरूवात होईल. मतदान 7 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडेल. मतमोजणी संबंधित ठिकाणी 8 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.

              निवडणूक कार्यक्रम
·        नामनिर्देशनपत्र सादर करणे- 18 ते 23 डिसेंबर 2019
·        नामनिर्देशनपत्रांची छाननी- 24 डिसेंबर 2019
·        अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 30 डिसेंबर 2019
·        अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- 1 जानेवारी 2020
·        मतदानाचा दिनांक- 7 जानेवारी 2020
·        मतमोजणीचा दिनांक- 8 जानेवारी 2020

विविध जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 12 डिसेंबरला मतदान


विविध जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील
रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 12 डिसेंबरला मतदान
मुंबई, दि.19 (रानिआ): रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर, नांदेड, लातूर, यवतमाळ आणि गडचिरोली या 11 जिल्हा परिषदांमधील 15 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध 12 पंचायत समित्यांमधील 13 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता 12 डिसेंबर 2019 रोजी मतदान; तर 13 डिसेंबर 2019 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
श्री. मदान यांनी सांगितले की, या पोटनिवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 22 ते 27 नोव्हेंबर 2019 या कालावधीत स्वीकारली जातील. 24 नोव्हेंबर 2019 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. मतदान 12 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.
पोटनिवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदनिहाय निवडणूक विभाग असे: रायगड- 45-निजामपूर (ता. माणगाव), सिंधुदुर्ग- 25-आंब्रड (कुडाळ), रत्नागिरी- 39-धामापूर तर्फे संगमेश्वर (संगमेश्वर), नाशिक- 19-मानूर (कळवण), 29- खेडगाव (दिंडोरी) व 59 गोवर्धन गट्टा (नाशिक), सांगली- 22 सावळज (तासगाव) व 48-कोकरूड (शिराळा), सातारा- 34-कुडाळ (जावली), कोल्हापूर- 28-दत्तवाड (शिरोळ), नांदेड- 50-पेठवडज (कंधार), लातूर- 6-सावरगाव रोकडा (अहमदपूर) व 25-वडवळ नागनाथ (चाकूर), यवतमाळ- 58-ढाणकी (उमरखेड) आणि गडचिरोली- 18-पेंढरी गट्टा (धानोरा).
पोटनिवडणूक होणाऱ्या पंचायत समितीनिहाय निर्वाचक गण असे: रोहा (जि. रायगड)- 80-आंबेवाडी, हवेली (पुणे)- 89-धायरी, नांदगाव (नाशिक)- 76-न्यायडोंगरी, निफाड (नाशिक)- 94-नांदुडी, पैठण (औरंगाबाद)- 121-पिंगळवाडी (पि.), उमरगा (उस्मानाबाद)- 94-माडज, उमरखेड (यवतमाळ)- 115-ढाणकी, उमरखेड (यवतमाळ)- 116-ब्राम्हणगाव, अहमदपूर (लातूर)- 01-खंडाळी, लाखांदूर (भंडारा)- 101-मोहरणा, भंडारा (भंडारा)- 59-पांढराबोडी, हिंगणघाट (वर्धा)- 96-शिरूड आणि वरोरा (चंद्रपूर)- 48-आबामक्ता.
        निवडणूक कार्यक्रमाचा तपशील
·         नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 22 ते 27 नोव्हेंबर 2019
·         नामनिर्देशनपत्रांची छाननी- 28 नोव्हेंबर 2019
·         अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 4 डिसेंबर 2019
·         अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- 7 डिसेंबर 2019
·         मतदानाचा दिनांक- 12 डिसेंबर 2019
·         मतमोजणीचा दिनांक- 13 डिसेंबर 2019

Friday, November 15, 2019

तिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पंचायत समितीसाठी 8 डिसेंबरला मतदान


तिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पंचायत समितीसाठी 8 डिसेंबरला मतदान
मुंबई, दि. 15 (रा.नि.आ.): अमरावती जिल्ह्यातील तिवसा, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या तीन पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 8 डिसेंबर 2019 रोजी मतदान; तर 9 डिसेंबर 2019 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

श्री. मदान यांनी सांगितले की, या पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2019 या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. त्यांची छाननी 25 नोव्हेंबर 2019 रोजी होईल. छाननीनंतर त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध जिल्हा न्यायाधिशांकडे 28 नोव्हेंबर 2019 पर्यंत अपील दाखल करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी 30 नोव्हेंबर 2019 रोजी; तर अपील असलेल्या ठिकाणी 4 डिसेंबर 2019 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 8 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 9 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

Thursday, October 31, 2019

नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला व वाशीम जिल्हा परिषद निवडणूक


नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला व वाशीम जिल्हा परिषद निवडणूक
प्रारूप मतदार याद्यांची 2 नोव्हेंबरला प्रसिद्धी
मुंबई, दि. 31 (रा.नि.आ.): नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला व वाशीम या पाच जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 36 पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 नोव्हेंबर 2019 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावर 6 नोव्हेंबर 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.
श्री. मदान यांनी सांगितले की, या निवडणुकांकरिता आयोगाच्या 31 मे 2019 च्या पत्रान्वये 10 एप्रिल 2019 या अधिसूचित दिनांकावर आधारित मतदार याद्या तयार करण्यात आल्या होत्या; परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने 4 ऑक्टोबर 2019 पर्यंत विधानसभा मतदारसंघाच्या आद्या अद्ययावत केल्या आहेत. जुन्या याद्यांमुळे 11 एप्रिल 2019 ते 4 ऑक्टोबर 2019 या कालावधीत नोंदणी झालेले मतदार जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांत मतदानापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे या निवडणुकांसाठी नव्याने मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 
नव्या कार्यक्रमानुसार 4 ऑक्टोबर 2019 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येतील. त्या आधारावर तयार करण्यात येणाऱ्या निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 2 नोव्हेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्या दिवसापासून त्यावर 6 नोव्हेंबर 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय अंतिम मतदार याद्या 8 नोव्हेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 11 नोव्हेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशी माहितीही श्री. मदान यांनी दिली.

Friday, October 18, 2019

मतदार याद्यांची प्रसिद्धी


ग्रामपंचायत निवडणुकांसाठी
 1 नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या
मुंबई, दि. 18 (रा.नि.आ.): राज्यातील विविध जिल्ह्यांतील सुमारे 108 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर विविध ठिकाणच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 1 नोव्हेंबर 2019 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
श्री. मदान यांनी सांगितले की, सार्वत्रिक निवडणुकांमध्ये 14 डिसेंबर 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 108 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यासह पोटनिवडणुकांसाठी विधानसभा मतदार संघांच्या 4 ऑक्टोबर 2019 रोजी अस्तित्वात आलेल्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येतील. त्या आधारावर तयार करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्या 1 नोव्हेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 5 नोव्हेंबर 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार याद्या 6 नोव्हेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

Thursday, September 5, 2019

राज्य निवडणूक आयुक्तपदी यू. पी. एस. मदान

नवनियुक्त राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांचे स्वागत करताना आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर.

यू. पी. एस. मदान यांनी राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला

मुंबई, दि. 5 (रा.नि.आ.): राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून श्री. यू. पी. एस. मदान यांनी आज पदभार स्वीकारला असून मा. राज्यपाल यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.
श्री. मदान 1983 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू झाले होते. राज्याच्या मुख्य सचिवपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली आहे. तत्पूर्वी त्यांनी राज्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व मंत्रालयात अपर मुख्य सचिव म्हणून सेवा बजावली. त्याचबरोबर त्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे काम पाहिले आहे. मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) आयुक्त आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत होते. आयोगाचे सचिव श्री. किरण कुरुंदकर यांनी श्री. मदान यांचे स्वागत केले. आयोगातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. श्री. ज. स. सहारिया यांचा राज्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यकाळ काल (ता. 4) पूर्ण झाला.

Friday, August 30, 2019

‘राज्य निवडणूक आयोग: रौप्य महोत्सवी वाटचाल’चे पुण्यात प्रकाशन


                                         निवडणूक सुधारणा ही निरंतर चालणारी प्रक्रिया: सहारिया
पुणे, दि. 30 (रा.नि.आ.): निवडणूक सुधारणा ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने विविध सुधारणा हाती घेतल्या आहेत. या सुधारणांच्या माध्यमातून निर्भय, मुक्त व पारदर्शक निवडणुका पार पाडणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे केले.
राज्य निवडणूक आयोगाच्या 25 वर्षेपूर्तीनिमित्त राज्य निवडणूक आयोग: रौप्यमहोत्सवी वाटचालया पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे प्रकाशन श्री. सहारिया यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे यावेळी उपस्थित होत्या. श्री. सहारिया यांचे 'निवडणूक सुधारणा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका' या विषयावर यावेळी व्याख्यानही झाले.
श्री. सहारिया म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाने गेल्या 5 वर्षांच्या काळात व्यापक सुधारणा केल्या आहेत. त्यात उमेदवारांच्या शपथपत्रातील माहितीला व्यापक प्रसिद्धी देणे, उत्पन्नाचे स्रोत जाहीर करणे व त्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्धी देणे, ‘नोटाजिंकल्यास फेरनिवडणूक घेणे, खर्चाचा हिशेब न देणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करणे, लोकशाही पुरस्कार आदींचा समावेश आहे. भविष्यात यात निश्चितच आणखी भर घालावी लागेल.
आयोगाचे सहायक आयुक्त (जनसंपर्क) जगदीश मोरे आणि पत्रकार सुनील चव्हाण यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. डॉ. बर्वे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संजय तांबट, प्रा. योगेश बोराटे, आयोगाचे कक्ष अधिकारी अतुल जाधव, श्री. मोरे, श्री. चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते. श्री. निनाद भोंडे यांनी सूत्रसंचालन केले. राज्य निवडणूक आयोगाच्या 25 वर्षांच्या वाटचालीचा या ग्रंथात आढावा घेण्यात आला आहे. 
पुणे येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांच्या हस्ते 'राज्य निवडणूक आयोग: रौप्यमहोत्सवी वाटचाल' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. याप्रसंगी डावीकडून उपस्थित प्रा. संजय तांबट, अतुल जाधव, जगदीश मोरे, श्री. सहारिया, सुनील चव्हाण, प्रा. योगेश बोराटे. (छायाचित्रः मयूर वाघ)