नगरपरिषद निवडणुकांसाठी मतदार
यादीत
नाव नोंदणीकरिता शेवटचा
पंधरवडा
31 ऑगस्टपर्यंत नावे नोंदविण्याचे
आवाहन
मुंबई,
दि. 1६: राज्यात डिसेंबर 2016 ते फेब्रुवारी 2017 मध्ये मुदत
संपणाऱ्या 195 व 1९ नवनिर्मित नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक
निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नावे
नोंदविण्याची मुदत ३१ ऑगस्ट 2016 पर्यंतच असल्यामुळे आता शेवटचा पंधरवडा शिल्लक
आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी त्वरित नावे नोंदवावित, असे आवाहन राज्य निवडणूक
आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केले.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, नगरपरिषद व
नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांसाठी 10 सप्टेंबर 2016 रोजी अस्तित्त्वात येणारी
विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी वापरली जाणार आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2016 रोजी
किंवा तत्पूर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या पात्र नागरिकांनी 31 ऑगस्ट 2016
पर्यंत विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदविणे आवश्यक आहे. तरच त्यांना
नगरपरिषद व नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदान करता येईल; तसेच यापूर्वीच मतदार
यादीत नावे असलेल्या मतदारांच्या नावांत किंवा पत्त्यांतील तपशिलात बदल असल्यास
त्यासाठीदेखील अर्ज करता येईल. त्याचबरोबर दुबार नावे, स्थलांतरितांची नावे अथवा
मृत व्यक्तींची नावे वगळण्यासाठीसुद्धा अर्ज करता येईल.
निवडणूक होणाऱ्या नगरपरिषद/नगरपंचायतींची विभागनिहाय संख्या: कोकण- २२, पुणे- ५१, नाशिक- ३०, औरंगाबाद- ४८, अमरावती- ३४, नागपूर- २९, एकूण- 214.