कागदपत्रांची
पूर्तता न करणाऱ्या
आठ
मान्यताप्राप्त पक्षांना नोटिस
राज्य
निवडणूक आयुक्त
मुंबई,
दि. 29: वारंवार पत्राद्वारे व दूरध्वनीद्वारे संपर्क साधूनही आयकर विवरण पत्राची
व लेखा परीक्षण लेख्याची प्रत सादर न केल्यामुळे आठ मान्यताप्राप्त राजकीय
पक्षांना राज्य निवडणूक आयोगाने नोटिस बजावली आहे. 9 सप्टेंबर 2016 पर्यंत कागदपत्रे
सादर न केल्यास या पक्षांची राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणी रद्द केली जाईल, अशी
माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री.
सहारिया यांनी सांगितले की, मान्यताप्राप्त 17 राजकीय पक्षांना यापूर्वीच पत्रे
पाठवून संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यापैकी नऊ
पक्षांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. उर्वरित भारतीय जनता
पक्ष, जनता दल (सेक्युलर), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, लोक जनशक्ती पक्ष, राष्ट्रीय
जनता दल, जनता दल (युनायटेड), ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट आणि इंडियन
युनियन मुस्लिम लीग या आठ मान्यताप्राप्त पक्षांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही.
त्यामुळे त्यांना 26 ऑगस्ट 2016 रोजी नोटिस बजावण्यात आली असून कागदपत्रे सादर करण्यासाठी 9 सप्टेंबर 2016 पर्यंतची
मुदत देण्यात आली आहे. मुदतीत कागदपत्रे प्राप्त न झाल्यास किंवा कुठलाही प्रतिसाद
न दिल्यास या पक्षांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारत निवडणूक
आयोगाने त्यांच्यासाठी आरक्षित केलेले चिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणुकीत मिळणार नाही; तसेच मुक्त चिन्ह वाटपातदेखील प्राधान्य मिळणार नाही.
कागदपत्रांची पूर्तता न
करणाऱ्या 326 अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांना यापूर्वीच विविध टप्प्यांमध्ये
नोटिस बजावल्या होत्या. त्यापैकी 78 पक्षांनी कागदपत्रांची पूर्तता केली; परंतु
248 पक्षांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली
आहे, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.