Search This Blog

Saturday, August 6, 2016

संशोधन अहवाल प्रकाशित

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांबाबत
गोखले संस्थेचा संशोधन अहवाल प्रकाशित
अभ्यासकांसाठी संकेतस्थळावर उपलब्ध
मुंबई, दि. 6: राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकाराने व यशदाच्या मदतीने पुणे येथील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेने तयार केलेला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसंदर्भातील संशोधन अहवाल प्रकाशित करण्यात आला असून तो अभ्यासकांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले, की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत फारच अल्प प्रमाणात संशोधन झाले आहे, ही बाब लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसदर्भात संशोधनाला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली. त्यासाठी राज्यातील नामांकित संस्था आणि विद्यापीठांना संशोधनासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विषय घेण्याचे आवाहन केले होते.
आयोगाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेने महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यान्वयनावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यासया विषयावर संशोधन करून अहवाल प्रकाशित केला आहे. हा अहवाल राज्य निवडणूक आयोगाच्या https://mahasec.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची वैशिष्ट्ये, निवडणूक प्रक्रिया, महिला आरक्षण, उमेदवारांची पार्श्वभूमी, उमेदवार आणि निवडणूक यंत्रणा, आचारसंहितेची अंमलबजावणी आदी विविध पैलूंचा या संशोधनाद्वारे वेध घेण्यात आला आहे. या अहवालातील राज्य निवडणूक आयोगाशी संबंधित शिफारशींबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू आहे, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले. 
https://mahasec.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Electoral%20and%20Functional%20Dynamics%20of%20Zilla%20Parishads%20and%20Panchayat%20Samitis%20in%20Maharashtra.pdf
https://mahasec.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/A%20Tale%20of%20Three%20Villages%20with%20All%20Mahila%20Gram%20Panchayats.pdf