Search This Blog

Friday, December 17, 2021

ना. मा. प्रवर्गाच्या जागा अनारक्षित करून 18 जानेवारीला मतदान

 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित करून 18 जानेवारीला मतदान

मुंबई, दि. 17 (रानिआ): सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा आता अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होईल. उर्वरित सर्व जागांसाठी पूर्वनियोजनाप्रमाणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होईल; परंतु मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी एकाच दिवशी 22 डिसेंबर 2021 ऐवजी 19 जानेवारी 2022 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

श्री. मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या आणि 4 हजार 554 ग्रामपंचायतींतील 7 हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. सर्वोच्च न्यायालयाच्या 6 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार मात्र या सर्व निवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. अन्य सर्व जागांची निवडणूक प्रक्रिया पूर्वनियोजितपणे सुरू आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार आता नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या  जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवार्गातून भरण्यासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित केल्याने आता त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी झाल्या आहेत. त्यामुळे या जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित ठेवावयाच्या जागांसाठी संबंधित ठिकाणी सोडत काढण्यात येईल.

चार महानगरपालिकांतील चार जागांच्या पोटनिवडणुकांपैकी केवळ सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीची निवडणूक प्रक्रिया स्थगित केली होती. तेथे आता 18 जानेवारी 2022 रोजी मतदान आणि 19 जानेवारी 2022 रोजी मतमोजणी होईल. धुळे, अहमदनगर आणि नांदेड- वाघाळा या तीन महानगरपालिकांमधील प्रत्येका एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल. 

Tuesday, December 7, 2021

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती

 नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या
जागांवरील निवडणुकांना स्थगिती

मुंबई, दि. 7 (रानिआ): सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 21 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

श्री. मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या आणि 4 हजार 554 ग्रामपंचायतींतील 7 हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकांच्या अधीन राहूनच या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या.

सर्वोच्च न्यायालयाच्या 6 डिसेंबर 2021 च्या आदेशानंतर आता या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुका आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आल्या आहेत; परंतु अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण जागांसाठीची निवडणूक पूर्व घोषित कार्यक्रमानुसार पुढे सुरू राहील. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग जागांच्या स्थगित निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री. मदान यांनी सांगितले.

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा

·         भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद- 23 (एकूण जागा 105)

·         भंडारा व गोंदियातील 15 पंचायत समित्या- 45 (एकूण जागा 210)

·         राज्यातील 106 नगरपंचायती- 344 (एकूण जागा 1,802)

·         महानगरपालिका पोटनिवडणुका- 1 (एकूण 4 जागा)

Monday, December 6, 2021

जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

 जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीत
जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

मुंबई, दि. 6 (रानिआ): जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे; परंतु जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाचा पुरावा आणि विहीत नमुन्यातील हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

श्री. मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी आज (ता. 6) दुपारी 3 वाजेपर्यंत होता. तो आता सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जातवैधता पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा त्यासंदर्भातील कोणताही पुरावा आणि विहीत नमुन्यातील हमीपत्र सादर करण्यासाठी उद्या (ता. 7) दुपारी 12 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. निवडून आल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत हे हमीपत्र असेल.

नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते; परंतु राज्य शासनाने 6 डिसेंबर 2021 रोजीच्या अध्यादेशान्वये संबंधित कायद्यात सुधारणा केली आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकांकरिता जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 12 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे, असेही श्री. मदान यांनी सांगितले. 

     

Wednesday, December 1, 2021

मतदार नोंदणीसाठी मुदतवाढ

मतदार नोंदणीसाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

                          -राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई, दि. 1 (रानिआ): भारत निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा कालावधी वाढविण्यात आला असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आता पुन्हा 5 डिसेंबर 2021 पर्यंत पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी प्राप्त झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
         श्री. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगातर्फे 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. त्या आधारावर 5 जानेवारी 2022 रोजी विधानसभा मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्याच मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. त्याबाबत विविध माध्यमातून जनजागृतीही करण्यात आली आहे; परंतु या आगामी निवडणुकांची मोठी संख्या लक्षात घेवून संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास मुदतवाढ देण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्फत भारत निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार या कार्यक्रमास 5 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
          संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास मुदतवाढ मिळाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आता पुन्हा 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना 5 डिसेंबर 2021 पर्यंत मतदार यादीत नावे नोंदविण्याची संधी प्राप्त झाली आहे. ऑनलाईन पद्धतीनेदेखील www.nvsp.in या संकेतस्थळावर नाव नोंदविणे, नावाची पडताळणी करणे किंवा नावांतील, पत्त्यांतील तपशिलांत दुरुस्त्याही करता येतील. त्यासाठी विधानसभा मतदरसंघांच्या 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांतील आपल्या नावांचीही खात्री करुन घ्यावी. नाव नसल्यास ते त्वरीत नोंदवून घ्यावे; तसेच विहित पद्धतीने मृत व्यक्तींची किंवा दुबार नावेदेखील वगळावित, असे आवाहनही श्री. मदान यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी चॅटबॉट
            राज्य निवडणूक आयोग आणि गपशप संस्थेने मतदार नोंदणीची सुविधा आणि त्यांसदर्भातील संपूर्ण माहिती 'महाव्होटर चॅटबॉट'या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी http://bit.ly/mahavoter या दुव्यावर (लिंक) क्लिक करून किंवा +917669300321 या व्हॉट्सॲप क्रमांकावर hi करून माहिती मिळवू शकतो अथवा https://mahavoter.in या संकेत स्थळालाही भेट देऊ शकता.