Search This Blog

Wednesday, May 11, 2022

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांसाठी 5 जूनला मतदान

                             जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांसाठी 5 जूनला मतदान

मुंबई, दि. 11 (रानिआ): पालघर, धुळे, नंदुरबार, वाशीम, नागपूर आणि अकोला जिल्हा परिषदेतील 2 निवडणूक विभागांच्या आणि पंचायत समितीतील 6 निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 जून 2022 रोजी मतदान; तर 6 जून 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज केली.

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या चितवी (ता. नवापूर) आणि अकोला जिल्हा परिषदेच्या हातरुण (ता. बाळापूर) या निवडणूक विभागासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. पोशेरा (मोखडा, जि. पालघर), हिसाळे (शिरपूर, जि. धुळे), हट्टी खु. (साक्री, जि. धुळे), असली (अक्राणी, जि. नंदुरबार), ब्राम्हणवाडा न- मारसुळ (मालेगाव, जि. वाशीम) आणि चणकापूर (सावनेर, जि. नागपूर) या पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान होईल. संबंधित निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणांत आजपासून आचारसंहिता लागू झाली असून निकाल जाहीर होईपर्यंत ती लागू राहील. नामनिर्देशनपत्र 17 ते 23 मे 2022 या कालावधीत दाखल करता येतील. 22 मे 2022 रोजी रविवारच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 24 मे 2022 रोजी होईल. 5 जून 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 6 जून 2022 रोजी सकाळी दहा वाजता सुरू होईल.

Friday, May 6, 2022

नगरपरिषद/नगरपंचायतींच्या प्रभाग रचनेवरील हरकती व सूचनांसाठी 14 मे पर्यंत मुदत

नगरपरिषद/नगरपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील
हरकती व सूचनांसाठी 14 मे पर्यंत मुदत

मुंबई, दि. 06 (रानिआ): राज्यातील विविध 216 नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर 10 ते 14 मे 2022 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाकडून आज जाहीर करण्यात आले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची कार्यवाही 10 मार्च 2022 रोजी असलेल्या टप्प्यांपासून पुढे सुरू करावी, असा आदेश 4 मे 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने ही कार्यवाही सुरू केली आहे. यात 208 नगरपरिषदा व 8 नगरपंचायतींचा समावेश आहे. त्यांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 10 ते 14 मे 2022 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यावर जिल्हाधिकारी 23 मे 2022 पर्यंत सुनावणी देतील. प्रभाग रचनेचे प्रारूप 10 मार्च 2022 रोजीच प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावेळी प्राप्त झालेल्या व आता नव्याने प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांवर ही एकत्रित सुनावणी देण्यात येईल. अंतिम प्रभाग रचना 7 जून 2022 पर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल, असेही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.