Search This Blog

Wednesday, June 29, 2022

Municipal Corporation's draft voter lists

 

Extension till 3rd July for objections on Municipal Corporation's draft voter lists

Deadline for filing objections and suggestions on ward wise draft voter lists published for general elections of 14 different Municipal Corporations has been extended till 3rd July 2022 instead of till 1st July 2022.

Brihanmumbai, Thane, Navi Mumbai, Kalyan- Dombivali, Ulhasnagar, Vasai- Virar, Pune, Pimpri- Chinchwad, Solapur, Kolhapur, Nashik, Akola, Amravati and Nagpur Municipal corporation general election`s ward wise draft voter lists have been published. Ward wise draft voter lists are also available on the respective Municipal Corporations, their websites and the True Voter Mobile App.

Objections and suggestions can also be lodged at the Municipal Corporation`s office or at the place authorized by them and also through the True Voter mobile app. The True Voter mobile app can be downloaded on the mobile phone from the Play Store.  Accordingly, a name can be found in the ward wise draft voter list and if there is any objection, it can also be filed.  After clicking on the ‘Voter List Search’ menu, one can enter his/ her name and mobile number and proceed. Once the name is found, your full details appear on the mobile screen.

महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी 3 जुलैपर्यंत मुदतवाढ

 महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी 3 जुलैपर्यंत मुदतवाढ

 

मुंबई, दि. 29 (रानिआ): विविध 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी असलेली 1 जुलै 2022 पर्यंतची मुदत आता 3 जुलै 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित महानगरपालिका, त्यांचे संकेतस्थळ आणि ट्रू- व्होटर मोबाईल ॲपवरही उपलब्ध आहेत. त्यावर 1 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत होती; परंतु ही मुदत आता 3 जुलै 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यासाठी रविवार व शनिवारच्या सुट्टीच्या दिवशीदेखील आवश्यक ती व्यवस्था करण्यात येणार आहे.

महानगरपालिका कार्यालय किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या ठिकाणी आणि ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारेदेखील हरकती व सूचना दाखल करता येतील. ट्रू- व्होटर मोबाईल ॲप प्ले स्टोअरवरून आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करता येईल. त्याआधारे प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीत आपले नाव शोधून त्याबाबत हरकत असल्यास तीही दाखल करता येईल. व्होटर लीस्ट सर्च या मेनूवर क्लिक केल्यावर आपले नाव व मोबाईल नंबर टाकून पुढे जाता येईल. नाव शोधल्यावर आपला संपूर्ण तपशील दिसू शकेल. त्यासंदर्भातील हरकतीसाठी व्होटर लीस्ट ऑबजेक्शन यावर क्लिक करून व्होटर लीस्ट इलेक्शन प्रोग्राम 2022 निवडून पुढे योग्य त्या पर्यायावर जाऊन आपली हरकत नोंदविता येईल.

विधानसभा मतदारसंघाची यादी प्रभागनिहाय विभाजित करताना त्यात नवीन नावांचा समावेश करणे किंवा नावे वगळण्याचा राज्य निवडणूक आयोगाला अधिकार नाही. एखाद्या मतदारास चुकीचा प्रभाग वाटप झाल्यास किंवा विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही महानगरपालिकेच्या मतदार यादीत नाव नसल्यास, हरकत दाखल करता येते. हरकती व सूचना दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असली तरी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 9 जुलै 2022 रोजीच प्रसिद्ध करण्यात येतील.

271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्टला मतदान

 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्टला मतदान   

 

मुंबई, दि. 29 (रानिआ): पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 62 तालुकांत्यातील 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्ट 2022 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. त्यानुसार संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 5 ऑगस्ट 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक  आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.  

श्री. मदान यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या 17 मे 2022 रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले 62 तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित तहसीलदार 5 जुलै 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे 12 ते 19 जुलै 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे 16 आणि 17 जुलै 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 20 जुलै 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 22 जुलै 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतदान 4 ऑगस्ट 2022 रोजी  सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 5 ऑगस्ट 2022 रोजी होईल.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या: नाशिक: बागलाण- 13, निफाड- 1, सिन्नर- 2, येवला- 4, चांदवड- 1, देवळा- 13 आणि नांदगाव- 6. धुळे: धुळे- 2, साक्री- 49 आणि शिंदखेडा- 1. जळगाव: रावेर- 12, अमळनेर- 1, एरंडोल- 2, पारोळा- 3 आणि चाळीसगाव- 6. अहमदनगर: अहमदनगर- 3, श्रीगोंदा- 2, कर्जत- 3,  शेवगाव- 1, राहुरी- 3 आणि संगमनेर- 3. पुणे: हवेली- 5, शिरुर- 6, बारामती- 2, इंदापूर- 4 आणि पुरंदर- 2. सोलापूर: सोलापूर- 2, बार्शी- 2, अक्कलकोट- 3, मोहोळ- 1, माढा- 2,  करमाळा- 8, पंढरपूर- 2, माळशिरस- 1 आणि मंगळवेढा- 4. सातारा: कराड- 9 आणि फलटण- 1. सांगली: तासगाव- 1. औरंगाबाद: औरंगाबाद- 1, पैठण- 7, गंगापूर- 2, वैजापूर- 2, खुलताबाद- 1, सिल्लोड- 3, जालना- 6, परतूर- 1, बदनापूर- 19 आणि मंठा- 2. बीड: बीड- 3, गेवराई- 5 आणि अंबेजोगाई- 5. लातूर: रेणापूर- 4, देवणी- 1 आणि शिरूर अनंतपाळ- 4. उस्मानाबाद: तुळजापूर- 2, कळंब- 1, उमरगा- 5, लोहारा- 2 आणि वाशी- 1. परभणी: सेलू- 3. बुलढाणा: खामगाव- 2 आणि मलकापूर- 3.  एकूण- 271.        

Monday, June 27, 2022

मतदार यादीसाठी ट्रू- व्होटर मोबाईल ॲपमुळे नाव शोधणे आणि हरकती दाखल करण्याची सुविधा

आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध
ट्रू- व्होटर मोबाईल ॲपमुळे नाव शोधणे आणि हरकती दाखल करण्याची सुविधा

मुंबई, दि. 27 (रानिआ): राज्यातील विविध 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यातील मतदारांची नावे तपासण्याची आणि हरकती दाखल करण्याची सुविधा ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.  

 श्री. मदान यांनी सांगितले की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात आल्या आहेत. त्यावर 1 जुलै 2022 पर्यंत हरकती सूचना दाखल करता येतील.

 प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित महानगरपालिकेत किंवा त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यात आपले नाव तपासता येईल. ती सुविधा आता ट्रू- व्होटर मोबाईल ॲपमध्येही उपलब्ध करून देण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघाची यादी प्रभागनिहाय विभाजित करताना त्यात नवीन नावांचा समावेश करणे किंवा नावे वगळण्याचा राज्य निवडणूक आयोगाला अधिकार नाही. एखाद्या मतदारास चुकीचा प्रभाग वाटप झाल्यास किंवा विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही महानगरपालिकेच्या मतदार यादीत नाव नसल्यास, हरकत दाखल करता येते. या हरकतींचा लवकर निपटारा होण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने एक नमुना अर्ज तयार केला आहे. त्याद्वारे आपण हरकत घेऊ शकतो आणि ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारेही सोप्या पद्धतीने हरकत दाखल करता यते, असेही श्री. मदान यांनी सांगितले