बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 3 ऑक्टोबरला आरक्षण सोडत
उल्हासनगरसाठी 30 सप्टेंबर; तर उर्वरित महानगरपालिकांसाठी 7
ऑक्टोबरला सोडत
मुंबई, दि. 22: उल्हासनगर महानगरपालिकेसाठी 30 सप्टेंबर, बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी
3 ऑक्टोबर; तर उर्वरित ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक,
अकोला, अमरावती व नागपूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 ऑक्टोबर
2016 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येईल. त्यानंतर प्रभाग रचना व आरक्षणाबाबत हरकती व
सूचना दाखल करता येतील, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली
आहे.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, बृहन्मुंबई, ठाणे,
उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती व नागपूर या दहा
महानगरपालिकांची मुदत मार्च/एप्रिल 2017 मध्ये संपत आहे. तत्पूर्वी होणाऱ्या
सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण निश्चितीचे वेळापत्रक राज्य
निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेची सदस्य संख्या अधिनियमात
227 एवढी निश्चित केली आहे. उर्वरित महानगरपालिकांसाठी 2011 च्या लोकसंख्येच्या
आधारे सदस्य संख्या निश्चित केली जाईल. त्यानंतर प्रभाग रचना करण्यात येईल. बृहन्मुंबई
महानगरपालिकेची प्रभाग रचना एकसदस्यीय; तर अन्य सर्व महानगरपालिकांची
प्रभागरचना बहुसदस्यीय पद्धतीने केली जाईल.
राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व महानगरपालिकांच्या प्रारूप
प्रभाग रचनेस 23 सप्टेंबर 2016 पर्यंत मान्यता देण्यात येईल. त्यानंतर संबंधित
तारखांना महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाबाबत सोडत काढण्यात येईल.
आरक्षण आणि प्रभाग रचनेबाबत बृहन्मुंबईसाठी 5 ते 20 ऑक्टोबर; तर
उर्वरित महानगरपालिकांसाठी 10 ते 25 ऑक्टोबर 2016 या कालावधीत संबंधित
महानगरपालिकेत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यावर राज्य निवडणूक आयुक्त किंवा
त्यांनी प्राधिकृत कलेले अधिकारी 4 नोव्हेंबर 2016 पर्यंत सुनावणी देतील.
बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी 5 नोव्हेंबर 2016 पर्यंत सुनावणी देण्यात येईल. 22
नोव्हेंबरला बृहन्मुंबईची; तर उर्वरित महानगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना 25
नोव्हेंबर 2016 रोजी प्रसिद्ध केले जाईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
प्रभागरचनेबाबत तपशील
|
बृहन्मुंबई महानगरपालिका
|
अन्य महानगरपालिका
|
आरक्षण सोडत
|
3 ऑक्टोबर 2016
|
7 ऑक्टोबर 2016*
|
आक्षेपांसाठी कालावधी
|
5 ते 20 ऑक्टोबर 2016
|
10 ते 25 ऑक्टोबर 2016
|
सुनावणी
|
5 नोव्हेंबर 2016 पर्यंत
|
4 नोव्हेंबर 2016 पर्यंत
|
अंतिम प्रभाग रचना
|
22 नोव्हेंबर 2016
|
25 नोव्हेंबर 2016
|
* उल्हासनगरपालिकेसाठी
30 सप्टेंबर 2016
|