Search This Blog

Sunday, February 19, 2017

सहा महानगरपालिकांच्या प्रारुप मतदार याद्यांची 27 ला प्रसिद्धी

पनवेलसह सहा महानगरपालिकांच्या
प्रारुप मतदार याद्यांची 27 ला प्रसिद्धी
मुंबई, दि. 19: भिवंडी- निजामपूर, मालेगाव, परभणी, लातूर, चंद्रपूर आणि पनवेल या सहा महानगरपालिकांच्या प्रारूप मतदार याद्यांची 27 फेब्रुवारी 2017 रोजी प्रसिद्धी झाल्यानंतर त्यावर 4 मार्च 2017 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, परभणी, लातूर आणि चंद्रपूर या पाच महानगरपालिकांसह नवनिर्मित पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 5 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध झालेली विधानसभेची मतदार यादी या महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 27 फेब्रुवारी 2017 रोजी प्रसिद्ध होतील. तेंव्हापासून 4 मार्च 2017 पर्यंत या याद्यावंर हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 10 मार्च 2017 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होतील.
भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर आधारित विधानसभा मतदार संघाची मतदार यादी 5 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध केली आहे. तीच यादी या निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे. प्रभागनिहाय यादीत नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे, नावांत अथवा पत्त्यांत दुरूस्त्या करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही; परंतु विधानसभेच्या मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करताना झालेल्या चुका, प्रभाग बदल अथवा विधानसभेच्या यादीत नाव असतानाही प्रभागाच्या मतदार यादीतून वगळले गेले, अशा स्वरूपाच्या दुरूस्त्या आक्षेप व सूचनांच्या आधारे केल्या जातील, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.

Thursday, February 16, 2017

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी प्राथमिक अंदाजानुसार 69 टक्के मतदान

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी
प्राथमिक अंदाजानुसार 69 टक्के मतदान
मुंबई, दि.16: राज्यातील 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांसाठी आज सरसरी 69 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अनेक मतदान केंद्रांवर सांयकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
या 15 जिल्हा परिषदांच्या 855 आणि 165 पंचायत समित्यांच्या 1 हजार 712 जागांसाठी मतदान झाले. या सर्व ठिकाणी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ होती. गडचिरोली जिल्ह्यात मात्र सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती.
प्राथमिक अंदाजानुसार जिल्हानिहाय झालेले मतदान: अहमदनगर- 70.83, औरंगाबाद- 66.22, बीड- 68.73, बुलडाणा- 67.31, चंद्रपूर- 71.75, गडचिरोली- 71.45, हिंगोली- 72.49, जळगांव- 64.14, जालना- 74.80, लातूर- 70.31, नांदेड- 71.69, उस्मानाबाद- 71.94, परभणी- 74.94, वर्धा- 64.93 आणि यवतमाळ- 70 एकूण सरासरी- 69.

Wednesday, February 15, 2017

15 जिल्हा परिषदा व 165 पंचायत समित्यांसाठी आज मतदान

2 हजार 567 जागांसाठी 11,989 उमेदवार
15 जिल्हा परिषदा व 165 पंचायत समित्यांसाठी आज मतदान
यंत्रणा सज्ज: राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई, दि. 15: राज्यातील पहिल्या टप्प्यातील 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता.16) मतदान होत आहे. त्यासाठी एकूण 2 हजार 567 जागांकरिता 11 हजार 989 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून 24 हजार 31 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाची तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने 11 जानेवारी 2017 रोजी 10 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा व 283 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा दोन टप्प्यांतील कार्यक्रम जाहीर केला आहे. पहिल्या टप्प्यांत 15 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 165 पंचायत समित्यांचा; तर दुसऱ्या टप्प्यांत 10 महानगरपालिका आणि 11 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 118 पंचायत समित्यांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेच्या 8 पंचायत समित्या व त्यांतर्गतच्या निवडणूक विभागांचा पहिल्या; तर 4 पंचायत समित्या व त्यांतर्गतच्या निवडणूक विभागांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश आहे.
पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान होत आहे. त्यासाठी 15 जिल्हा परिषदांच्या 855 जागांसाठी 4 हजार 289 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या जिल्हा परिषदांतर्गतच्या 165 पंचायत समित्यांच्या 1 हजार 712 जागांसाठी 7 हजार 700 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण 2 कोटी 4 लाख 4 हजार 300 मतदार असून त्यापैकी 1 कोटी 7 लाख 79 हजार 726 पुरुष, 96 लाख 24 हजार 479 महिला; तर 95 इतर मतदारांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी 24 हजार 31 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान होणार असल्याने 72 हजार 93 बॅलेट युनिट आणि 48 हजार 62 कंट्रोल युनिट उपलब्ध करून दिले आहेत. या सर्वांसाठी 1 लाख 58 हजार 604 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
मतदानाचा हक्क बजवा
मतदान प्रक्रिया सुरळित पार पाडण्यासाठी आवश्यक तेवढ्या मनुष्यबळाबरोबरच कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी वेळोवेळी घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार नियोजन केले आहे. संबंधित जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली आवश्यक तेवढे पोलिसबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण खबरदारी घेण्यात येणार आहे. आता मतदारांनीही आपला हक्क बजावला पाहिजे. मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्यही आहे. प्रत्येकाने मतदान करून लोकशाहीच्या बळकटीकरणास हातभार लावावा, असे आवाहनही श्री. सहारिया यांनी केले.
जिल्हा परिषदा
जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील 8 पंचायत समित्या व त्यांतर्गतचे निवडणूक विभाग.
मतदानाची वेळ
मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. गडचिरोली जिल्ह्यात मात्र सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.
एक दृष्टिक्षेप
·      जिल्हा परिषदा- 15 (जागा 855)
·      जिल्हा परिषदांसाठी उमेदवार- 4,289
·      पंचायत समित्या- 165 (जागा 1,712)
·      पंचायत समित्यांसाठी उमेदवार- 7,700
·      एकूण मतदार- 2,04,04,300
·      पुरुष मतदार- 1,07,79,726
·      महिला मतदार- 96,24,479
·      इतर मतदार- 95
·      एकूण मतदान केंद्रे- 24,031
·      मतदान यंत्रे- 48,062
·   कर्मचारी- 1,58,604 

Monday, February 13, 2017

प्रचार कालावधी समाप्तीनंतर प्रचारविषयक जाहिरातींवर बंदी

प्रचार कालावधी समाप्तीनंतर प्रचारविषयक जाहिरातींवर बंदी
14 फेब्रुवारीनंतर जनमत व मतदानोत्तर चाचण्यांवर निर्बंध
मुंबई, दि. 13: महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर राजकीय पक्ष व उमेदवारांना मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांत प्रचारविषयक जाहिराती प्रसिद्ध करता येणार नाहीत; त्याचबरोबर 14 फेब्रुवारी 2017 रोजी रात्री बारा वाजल्यापासून ते 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान समाप्तीपर्यंत जनमत (ओपिनियन पोल) व मतदानोत्तर (एक्झिट पोल) चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यावर बंदी राहील, असे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे सांगितले.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाच वेगवेगळ्या कायद्यांतील तरतुदीनुसार घेतल्या जातात. त्यानुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा प्रचार मतदान सुरु होण्याच्या दिनांकापूर्वी 24 तास अगोदर बंद होतो. त्यामुळे पहिल्या टप्पात 16 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होत असलेल्या 15 जिल्हा परिषदा व 165 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा जाहीर प्रचार 14 फेब्रुवारी 2017 रोजी रात्री 12 वाजता संपेल. दुसऱ्या टप्प्यात 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होत असलेल्या 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा जाहीर प्रचार 19 फेब्रुवारी 2017 रोजी रात्री 12 वाजता संपेल; परंतु ध्वनिक्षेपाबाबतच्या विहित आदेशांचेही पालन करणे आवश्यक राहील.
महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार मतदान समाप्तीच्या 48 तास अगोदर बंद होतो. त्यामुळे 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणाऱ्या 10 महानगरपालिकांचा जाहीर प्रचार 19 फेब्रुवारी 2017 रोजी सायंकाळी 5.30 वाजता संपेल. जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर आयोगाच्या 14 ऑक्टोबर 2016 च्या आदेशानुसार राजकीय पक्ष किंवा उमेदवारांना मुद्रित अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रचाराच्या जाहिराती प्रसिद्ध करता येणार नाहीत. यात सोशल मीडियाचाही समावेश असेल.
मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील जाहिरातींबाबत समान नियमन असावे, अशी मागणी काही राजकीय पक्षांकडूनदेखील करण्यात आली होती, असे नमूद करून श्री. सहारिया  म्हणाले की, 14 फेब्रुवारी 2017 रोजी रात्री बारापासून ते 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान समाप्तीपर्यंत कुठल्याही माध्यमांद्वारे जनमत (ओपिनियन पोल) व मतदानोत्तर (एक्झिट पोल) चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यावर बंदी राहील. या निवडणुकांचे दोन्ही टप्पे पाठोपाठ असल्याने मतदारांवर पडणारा संभाव्य प्रभाव लक्षात घेऊन, हे स्पष्टीकरण करण्यात आले असल्याचे श्री. सहारिया यांनी सांगितले.
       ·      16 फेब्रुवारी 2017 च्या जि. प. व पं. स. मतदानासाठी प्रचार समाप्ती- 14 फेब्रुवारी रोजी रात्री 12 पासून
       ·      21 फेब्रुवारी 2017 च्या जि. प. व पं. स. मतदानासाठी प्रचार समाप्ती- 19 फेब्रुवारी रोजी रात्री 12 पासून
       ·      21 फेब्रुवारी 2017 च्या महानगरपालिका मतदानासाठी प्रचार समाप्ती- 19 फेब्रुवारी रोजी सायं. 5.30 पासून
       ·      जनमत, मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्धीवर निर्बंध- 14 फेब्रुवारी 2017 रोजी रात्री 12.00 पासून

Sunday, February 12, 2017

महानगरपालिकांसाठी 9,199 उमेदवार निवडणूक रिंगणात

महानगरपालिकांसाठी 9,199 उमेदवार निवडणूक रिंगणात
पहिल्या टप्प्यातील 15 जि.प.साठी 4,278; तर 165 पं.स.साठी 7,693 उमेदवार
मुंबई, दि. 12: राज्यातील 10 महानगरपालिकांच्या 1 हजार 268 जागांसाठी 9 हजार 199 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत; तसेच पहिल्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या 15 जिल्हा परिषदेच्या 855 जागांसाठी 4 हजार 278; तर 165 पंचायत समित्यांच्या एकूण 1 हजार 712 जागांसाठी 7 हजार 693 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
राज्यातील 10 महानगरपालिकांसाठी 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणार आहे. जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी दोन टप्प्यांत मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात 16 फेब्रुवारी 2017 रोजी 15 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 165 पंचायत समित्यांसाठी मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात 11 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 118 पंचायत समित्यांसाठी 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणार आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेचा दोन्ही टप्प्यात समावेश असून पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यातील 8; तर दुसऱ्या टप्प्यात 4 पंचायत समित्या व त्यातील निवडणूक विभागांचा समावेश आहे. मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी 23 फेब्रुवारी 2017 रोजी होईल.
दुसऱ्या टप्प्यातील 11 जिल्हा परिषदांच्या 654 जागासांठी छाननीनंतर 6 हजार 367 नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत. 118 पंचायत समित्यांच्या 1 हजार 288 जागांसाठी 10 हजार 879 नामनिर्देनशपत्रे वैध ठरली आहेत. काही उमेदवार एकापेक्षा जास्त नामनिर्देशनपत्रे दाखल करतात; परंतु एखाद्याने कितीही नामनिर्देशनपत्रे दाखल केली असली तरी अंतिमत: प्रत्येकाचा एकच उमेदवारी अर्ज गृहीत धरला जातो. त्यामुळे नामनिर्देशनपत्रांच्या माघारीच्या अंतिम मुदतीनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल. ही मुदत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 13 फेब्रुवारी 2017; तर अपील असलेल्या ठिकाणी 15 फेब्रुवारी 2017 पर्यंत असेल.
महानगरपालिकानिहाय (कंसात एकूण जागा) उमेदवारांची संख्या: बहन्मुंबई (227)- 2,271, ठाणे (131)- 1,134, उल्हासनगर (78)- 821, नाशिक (122)- 1,089, पुणे (162)- 623, पिंपरी-चिंचवड (128)- 804, सोलापूर (102)- 478, अकोला (80)- 579, अमरावती (87)- 626 आणि नागपूर (151)- 774. एकूण (1,268)- 9,199.
पहिल्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदनिहाय (कंसात एकूण जागा) उमेदवारांची संख्या: अहमदनगर (72)- 303, औरंगाबाद (62)- 323, बीड (60)- 440, बुलडाणा (60)- 333, चंद्रपूर (56)- 314, गडचिरोली (35)- 176, हिंगोली (52)- 245, जळगांव (67)- 244, जालना (56)- 266, लातूर (58)- 231, नांदेड (63)- 374, उस्मानाबाद (55)- 254, परभणी (54)- 276, वर्धा (50)- 293 आणि  यवतमाळ (55)- 306. एकूण जागा (855)- 4,278. या जिल्हा परिषदांतर्गतच्या 165 पंचायत समित्या (1712)- 7,693.

Wednesday, February 8, 2017

टाटा, गोयंका, महिंद्रा आदींकडून मतदार जागृतीसाठी प्रतिसाद

टाटा, गोयंका, महिंद्रा आदींकडून
मतदार जागृतीसाठी सकारात्मक प्रतिसाद
               -राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई, दि. 8: महानगरपालिका निवडणुकीतील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मतदार जागृती मोहिमेला प्रोत्साहन देण्‍यासाठी उद्योग जगतातील मान्यवरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यात श्री. रतन टाटा, श्री. आनंद महिंद्रा, श्री. हर्ष गोयंका आदींचा समावेश आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, ग्रामीण भागाच्या तुलनेत महानगरपालिकांमध्ये मतदानाचे प्रमाण तुलनेने कमी असते. ते वाढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे जाहिराती, होर्डिंग पथनाट्य, विद्यार्थ्यांच्या जनजागृती फेऱ्या, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सहकार्य, सोशल मीडिया, कम्युनिटी रेडिओ इत्यादींद्वारे व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात आहे. यात विविध उद्योग समूहांनीही सक्रिय सहभागी व्हावे यादृष्टीने आयोगातर्फे सर्व संबंधितांना आवाहन करण्यात आले होते.
आयोगाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन श्री. रतन टाटा, श्री. आनंद महिंद्रा, श्री. हर्ष गोयंका यांनी वेगवेगळ्या वेळी स्वत: आयोगाच्या कार्यालयात भेट देऊन प्रत्यक्ष चर्चा केली आहे. आपापल्या उद्योगसमूहातील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी वेळेची सवलत दिली जाईल. त्याचबरोबर त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. उद्योगसमूहाच्या सर्व ठिकाणी मतदार जागृतीबाबत फलक लावण्यात येतील. त्याचबरोबर इतर काही उपक्रम शक्य असल्यास तेही राबविले जातील, असे या तिघांनी चर्चेच्या वेळी सांगितले आहे. अशा पद्धतीने मतदार जागृती मोहिमेला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त होणे आवश्यक आहे, असे मतही श्री. सहारिया यांनी व्यक्त केले आहे.

Tuesday, January 31, 2017

सुधारित निवडणूक खर्च मर्यादा

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 6 ते 4 लाखांची खर्च मर्यादा
महानगरपालिका निवडणुकांसाठी 10 ते 5 लाखांची खर्च मर्यादा
मुंबई, दि. 1: महानगरपालिका निवडणुकांतील उमेदवारांसाठी खर्चाची सुधारीत मर्यादा 10 ते 5 लाख रुपयापर्यंत करण्यात आली आहे; तसेच जिल्हा परिषदांच्या उमेदवारांसाठी 6 ते 4 लाख आणि पंचायत समित्यांच्या उमेदवारांकरिता 4 ते 3 लाख रुपयापर्यंत खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, सुधारीत खर्च मर्यादेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उमेदवारांसाठी 10 लाख रुपये एवढी खर्च मर्यादा असेल. अन्य महानगरपालिकांच्या बाबतीत संबंधित महानगरपालिकेच्या एकूण सदस्य संख्येच्या प्रमाणानुसार उमेदवारांकरिता खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीदेखील याच सूत्राप्रमाणे उमेदवारांकरिता खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
आयोगाच्या 30 जुलै 2011 च्या आदेशानुसार यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांकरिता खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार वर्ग महानगरपालिकेच्या उमेदवारांसाठी 5, वर्ग महानगरपालिकेसाठी 4; तर वर्ग महानगरपालिकेसाठी 3 लाख रुपये खर्च मर्यादा होती. जिल्हा परिषदांसाठी 3 लाख; तर पंचायत समित्यांच्या उमेदवारांसाठी 2 लाख रुपये खर्च मर्यादा पूर्वी होती, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
सुधारित खर्च मर्यादा
स्थानिक स्वराज्य संस्था
खर्च मर्यादा (लाखांत)
बृहन्मुंबई महानगरपालिका
10
महानगरपालिका- सदस्य संख्या 151 ते 175
10
महानगरपालिका- सदस्य संख्या 116 ते 150
8
महानगरपालिका- सदस्य संख्या 86 ते 115
7
महानगरपालिका- सदस्य संख्या 65 ते 85
5
जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्या
जिल्हा परिषदा
पंचायत समित्या
71 ते 75 निवडणूक विभाग असलेले जिल्हे
6
4
61 ते 70 निवडणूक विभाग असलेले जिल्हे
5
3.5
50 ते 60 निवडणूक विभाग असलेले जिल्हे
4
3

चित्ररथाला मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद


चित्ररथाद्वारे मतदार जागृतीला
मुंबईत ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि. 31: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे चित्ररथाद्वारे शहरात ठिकठिकाणी मतदार जागृती करण्यात येत असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील शिवाजी पार्कवर झालेल्या संचलनात या चित्ररथाचा समावेश होता.  73 आणि 74 व्या  राज्य घटना दुरुस्तीला 25 वर्षे होत असल्याच्या आणि सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. सर ज. जी. कला महाविद्यालयाने त्याची निर्मिती केली आहे. इतर विविध माध्यमांतूनही मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयन्त केल जात आहे. चित्ररथ त्याचाच एक भाग आहे. चित्ररथाची आकर्षक रचना व रंगसंगतीमुळे त्याकडे लक्ष वेधले जात आहे. चित्ररथावर एलएडी पडता असून त्यावर विविध ध्वनिचित्रफिती व जागृतीपर संदेशही दाखविण्यात येत आहेत.  
प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कवर संचलन झाल्यानंतर हा चित्ररथ गेट वे ऑफ इंडिया, हजी अली व दादर येथे नेण्यात आला होता. आज तो वांद्रे (पूर्व) येथे असून या सर्व ठिकाणी नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. हा चित्ररथ 6 फेब्रुवारी 2017 पर्यंत मुंबईत असेल त्यानंतर ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदार जागृतीसाठी नेण्यात येईल.
येथे असेल चित्ररथ
1 फेब्रुवारी 2017:  बॅन्डस्टँड (वांद्रे पश्चिम)
2 फेब्रुवारी 2017: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (बोरिवली)
3 फेब्रुवारी 2017: जुहू चौपाटी (सांताक्रुझ)
4 फेब्रुवारी 2017: सागर कुटीर (वर्सोवा चौपाटी)
5 फेब्रुवारी 2017: डायमंड गार्डन (चेंबुर)
6 फेब्रुवारी 2017: मुलुंड
मतदान करा... इतरांनाही सांगा!
चित्ररथाच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या मतदार जागृतीस मुंबईत ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे; परंतु 21 फेब्रुवारी 2017 रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी आपण सर्वांनी नक्की मतदान करावे आणि इतरांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करावे.
ज. स. सहारिया, राज्य निवडणूक आयुक्त

Friday, January 27, 2017

रविवारीदेखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारणार

रविवारीदेखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारणार
                                                         -राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई, दि. 27: महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या सोयीकरिता रविवारीदेखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली आहे.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, आयोगाने 11 जानेवारी 2017 रोजी घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार महानगरपालिका निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2017 या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत. त्यात रविवारी 29 जानेवारी 2017 रोजी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत, असे नमूद केले होते; परंतु उमेदवारांच्या सोयीसाठी आता या रविवारीदेखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील.
पहिल्या टप्प्यात मतदान होत असलेल्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2017 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीत येणाऱ्या रविवारी 29 जानेवारी 2017 रोजी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत, असे नमूद केले होते; परंतु आता या रविवारीदेखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी 1 ते 6 फेब्रुवारी 2017 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीतील रविवारीसुद्धा (5 फेब्रुवारी 2017) नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार आहेत, अशी माहितीही श्री. सहारिया यांनी दिली.

Thursday, January 26, 2017

चित्ररथाद्वारे मतदारांना साद


राज्य निवडणूक आयोगातर्फे चित्ररथाद्वारे
मतदार राजाला मतदानासाठी साद
        मुंबई, दि. 26: भारतीय राज्य घटनेतील 73 आणि 74 व्या दुरुस्तीला 25 वर्षे पूर्ण होत असल्याच्या; तसेच महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या चित्ररथाचा प्रथमच प्रजासत्ताक दिनाच्या आज येथे झालेल्या मुख्य संचलनात समावेश करण्यात आला. त्याद्वारे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदार राजाला साद घालण्यात आली.
        भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील शिवाजी पार्कवर मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला होता. मा. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते यावेळी ध्वजवंदन झाले. त्यानंतर विविध पथकांनी संचलन केल्यावर विविध विभागांच्या चित्ररथांचे सादरीकरण झाले. त्यात राज्य निवडणूक आयोगाच्या चित्ररथाचाही समावेश होता.
       राज्य घटनेतील 73 व 74 व्या दुरुस्तीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणाबरोबरच प्रत्येक राज्यात स्वतंत्र राज्य निवडणूक आयोगाच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली होती. याचे स्मरण आणि मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदार जागृतीच्या दृष्टीने हा चित्ररथ तयार केला आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांची ही संकल्पना असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांच्या पाठपुराव्याने त्याची आज पूर्तता झाली. सर ज. जी. कला महाविद्यालयाने या चित्ररथाची निर्मिती केली आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रा. विजय बोंदर, प्रा. शशिकांत काकडे व प्रशांत इप्ते यांच्या टीमने तो तयार केला आहे.
       चित्ररथाच्या प्रथम दर्शनी भागावर उडत्या श्वेत अश्वाचे शिल्प आहे. ते भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेल्या अशोक स्तंभावरून घेतले आहे. त्याखाली विविध घटकांतील नागरिक मतदारांना साद घालत होते. चित्ररथाच्या मध्यभागी जिवंत देखावा होता. त्याचबरोबर मतदारांच्या हातावर तोललेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रातिनिधिक स्वरुपातील इमारतींचा फिरता देखावा होता. मागील बाजूस एलईडी पडदा असून त्यावर मतदार जागृतीपर संदेश व ध्वनिचित्रफिती दाखविण्यात आल्या. चित्ररथाच्या पुढे एका पथकाचाही समावेश होता. मतदारांना मतदानासाठी आवाहन करीत हे पथक कलात्मक कसरी सादर करत होते. मुख्य संचलन कार्यक्रमानंतर पथकासह हा चित्ररथ दादर पूर्वेलाही नेण्यात आला. तिथेही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
       प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य संचलनासाठी हा चित्ररथ तयार करण्यात आला असला तरी तो मुंबई आणि ठाण्यात फिरविण्यात येणार आहे. कारण बृहन्मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होत आहे. त्यासाठी या दोन्ही महानगरांतील प्रमुख भागात या चित्ररथाद्वारे मतदार जागृती केली जाणार आहे, अशी माहिती श्री. सहारिया यांनी ध्वजवंदन समारंभानंतर दिली.       
मताधिकाराचा आवश्य वापर करा
     ध्वजवंदनानंतर राज्यातील जनतेला संदेश देताना मा. राज्यपाल म्हणाले की, सध्या हानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. संविधानातील 73 व 74 व्या दुरुस्तीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. लोकशाही मूल्यांच्या आचरणातून या संस्थांप्रती आपला विश्वास व बांधिलकी प्रतिबिंबित होते. राज्यातील जनतेने ही मूल्ये बळकट करण्यासाठी शिस्तबद्ध व शांततापूर्ण रितीने आपल्या मताधिकाराचा आवश्य वापर करावा.