पनवेलसह सहा महानगरपालिकांच्या
प्रारुप मतदार याद्यांची 27 ला प्रसिद्धी
मुंबई, दि. 19: भिवंडी- निजामपूर,
मालेगाव, परभणी, लातूर, चंद्रपूर आणि पनवेल या सहा महानगरपालिकांच्या प्रारूप
मतदार याद्यांची 27 फेब्रुवारी 2017 रोजी प्रसिद्धी झाल्यानंतर त्यावर 4 मार्च
2017 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.
स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की,
भिवंडी-निजामपूर, मालेगाव, परभणी, लातूर आणि चंद्रपूर या पाच महानगरपालिकांसह नवनिर्मित
पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी
मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 5 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध झालेली
विधानसभेची मतदार यादी या महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाणार
आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 27 फेब्रुवारी
2017 रोजी प्रसिद्ध होतील. तेंव्हापासून 4 मार्च 2017 पर्यंत या याद्यावंर हरकती व
सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 10 मार्च 2017 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध
होतील.
भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी
2017 या अर्हता दिनांकावर आधारित विधानसभा मतदार संघाची मतदार यादी 5 जानेवारी
2017 रोजी प्रसिद्ध केली आहे. तीच यादी या निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे. प्रभागनिहाय
यादीत नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे, नावांत अथवा पत्त्यांत दुरूस्त्या
करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही; परंतु विधानसभेच्या मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन
करताना झालेल्या चुका, प्रभाग बदल अथवा विधानसभेच्या यादीत नाव असतानाही
प्रभागाच्या मतदार यादीतून वगळले गेले, अशा स्वरूपाच्या दुरूस्त्या आक्षेप व सूचनांच्या
आधारे केल्या जातील, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.