2 हजार 567 जागांसाठी 11,989 उमेदवार
15 जिल्हा परिषदा व 165 पंचायत समित्यांसाठी आज मतदान
यंत्रणा सज्ज: राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई, दि. 15: राज्यातील पहिल्या टप्प्यातील 15 जिल्हा परिषदा आणि
165 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता.16) मतदान होत आहे.
त्यासाठी एकूण 2 हजार 567 जागांकरिता 11 हजार 989 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून
24 हजार 31 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाची तयारी पूर्ण झाली
असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स.
सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, राज्य
निवडणूक आयोगाने 11 जानेवारी 2017 रोजी 10 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा व 283
पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा दोन टप्प्यांतील कार्यक्रम जाहीर केला
आहे. पहिल्या टप्प्यांत 15 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 165 पंचायत समित्यांचा; तर दुसऱ्या टप्प्यांत 10 महानगरपालिका आणि 11 जिल्हा
परिषदा व त्यांतर्गतच्या 118 पंचायत समित्यांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्हा
परिषदेच्या 8 पंचायत समित्या व त्यांतर्गतच्या निवडणूक विभागांचा पहिल्या; तर 4 पंचायत समित्या व त्यांतर्गतच्या निवडणूक
विभागांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश आहे.
पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान होत
आहे. त्यासाठी 15 जिल्हा परिषदांच्या 855 जागांसाठी 4 हजार 289 उमेदवार निवडणूक
रिंगणात आहेत. या जिल्हा परिषदांतर्गतच्या 165 पंचायत समित्यांच्या 1 हजार 712 जागांसाठी
7 हजार 700 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण 2 कोटी 4 लाख 4 हजार 300 मतदार
असून त्यापैकी 1 कोटी 7 लाख 79 हजार 726 पुरुष, 96 लाख 24 हजार 479 महिला; तर 95 इतर मतदारांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी 24
हजार 31 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व ठिकाणी इलेक्ट्रॉनिक
मतदान यंत्राद्वारे मतदान होणार असल्याने 72 हजार 93 बॅलेट युनिट आणि 48 हजार 62
कंट्रोल युनिट उपलब्ध करून दिले आहेत. या सर्वांसाठी 1 लाख 58 हजार 604 अधिकारी,
कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
मतदानाचा हक्क बजवा
मतदान प्रक्रिया सुरळित पार
पाडण्यासाठी आवश्यक तेवढ्या मनुष्यबळाबरोबरच कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस
बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी वेळोवेळी घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार
नियोजन केले आहे. संबंधित जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली आवश्यक तेवढे
पोलिसबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण खबरदारी
घेण्यात येणार आहे. आता मतदारांनीही आपला हक्क बजावला पाहिजे. मतदान हा आपला हक्क
आणि कर्तव्यही आहे. प्रत्येकाने मतदान करून लोकशाहीच्या बळकटीकरणास हातभार लावावा,
असे आवाहनही श्री. सहारिया यांनी केले.
जिल्हा परिषदा
जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी,
हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि
गडचिरोली जिल्ह्यातील 8 पंचायत समित्या व त्यांतर्गतचे निवडणूक विभाग.
मतदानाची वेळ
मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते
सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. गडचिरोली जिल्ह्यात मात्र सकाळी 7.30 ते दुपारी 3.00
वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.
एक दृष्टिक्षेप
·
जिल्हा परिषदा- 15 (जागा 855)
·
जिल्हा परिषदांसाठी उमेदवार- 4,289
·
पंचायत समित्या- 165 (जागा 1,712)
·
पंचायत समित्यांसाठी उमेदवार- 7,700
·
एकूण मतदार- 2,04,04,300
·
पुरुष मतदार- 1,07,79,726
·
महिला मतदार- 96,24,479
·
इतर मतदार- 95
·
एकूण मतदान केंद्रे- 24,031
·
मतदान यंत्रे- 48,062
· कर्मचारी- 1,58,604