Search This Blog

Thursday, January 26, 2017

चित्ररथाद्वारे मतदारांना साद


राज्य निवडणूक आयोगातर्फे चित्ररथाद्वारे
मतदार राजाला मतदानासाठी साद
        मुंबई, दि. 26: भारतीय राज्य घटनेतील 73 आणि 74 व्या दुरुस्तीला 25 वर्षे पूर्ण होत असल्याच्या; तसेच महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या चित्ररथाचा प्रथमच प्रजासत्ताक दिनाच्या आज येथे झालेल्या मुख्य संचलनात समावेश करण्यात आला. त्याद्वारे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदार राजाला साद घालण्यात आली.
        भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील शिवाजी पार्कवर मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला होता. मा. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते यावेळी ध्वजवंदन झाले. त्यानंतर विविध पथकांनी संचलन केल्यावर विविध विभागांच्या चित्ररथांचे सादरीकरण झाले. त्यात राज्य निवडणूक आयोगाच्या चित्ररथाचाही समावेश होता.
       राज्य घटनेतील 73 व 74 व्या दुरुस्तीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणाबरोबरच प्रत्येक राज्यात स्वतंत्र राज्य निवडणूक आयोगाच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली होती. याचे स्मरण आणि मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदार जागृतीच्या दृष्टीने हा चित्ररथ तयार केला आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांची ही संकल्पना असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांच्या पाठपुराव्याने त्याची आज पूर्तता झाली. सर ज. जी. कला महाविद्यालयाने या चित्ररथाची निर्मिती केली आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रा. विजय बोंदर, प्रा. शशिकांत काकडे व प्रशांत इप्ते यांच्या टीमने तो तयार केला आहे.
       चित्ररथाच्या प्रथम दर्शनी भागावर उडत्या श्वेत अश्वाचे शिल्प आहे. ते भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेल्या अशोक स्तंभावरून घेतले आहे. त्याखाली विविध घटकांतील नागरिक मतदारांना साद घालत होते. चित्ररथाच्या मध्यभागी जिवंत देखावा होता. त्याचबरोबर मतदारांच्या हातावर तोललेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रातिनिधिक स्वरुपातील इमारतींचा फिरता देखावा होता. मागील बाजूस एलईडी पडदा असून त्यावर मतदार जागृतीपर संदेश व ध्वनिचित्रफिती दाखविण्यात आल्या. चित्ररथाच्या पुढे एका पथकाचाही समावेश होता. मतदारांना मतदानासाठी आवाहन करीत हे पथक कलात्मक कसरी सादर करत होते. मुख्य संचलन कार्यक्रमानंतर पथकासह हा चित्ररथ दादर पूर्वेलाही नेण्यात आला. तिथेही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
       प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य संचलनासाठी हा चित्ररथ तयार करण्यात आला असला तरी तो मुंबई आणि ठाण्यात फिरविण्यात येणार आहे. कारण बृहन्मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होत आहे. त्यासाठी या दोन्ही महानगरांतील प्रमुख भागात या चित्ररथाद्वारे मतदार जागृती केली जाणार आहे, अशी माहिती श्री. सहारिया यांनी ध्वजवंदन समारंभानंतर दिली.       
मताधिकाराचा आवश्य वापर करा
     ध्वजवंदनानंतर राज्यातील जनतेला संदेश देताना मा. राज्यपाल म्हणाले की, सध्या हानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. संविधानातील 73 व 74 व्या दुरुस्तीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. लोकशाही मूल्यांच्या आचरणातून या संस्थांप्रती आपला विश्वास व बांधिलकी प्रतिबिंबित होते. राज्यातील जनतेने ही मूल्ये बळकट करण्यासाठी शिस्तबद्ध व शांततापूर्ण रितीने आपल्या मताधिकाराचा आवश्य वापर करावा.