Search This Blog

Friday, January 27, 2017

रविवारीदेखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारणार

रविवारीदेखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारणार
                                                         -राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई, दि. 27: महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या सोयीकरिता रविवारीदेखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली आहे.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, आयोगाने 11 जानेवारी 2017 रोजी घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार महानगरपालिका निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2017 या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत. त्यात रविवारी 29 जानेवारी 2017 रोजी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत, असे नमूद केले होते; परंतु उमेदवारांच्या सोयीसाठी आता या रविवारीदेखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील.
पहिल्या टप्प्यात मतदान होत असलेल्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2017 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीत येणाऱ्या रविवारी 29 जानेवारी 2017 रोजी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत, असे नमूद केले होते; परंतु आता या रविवारीदेखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी 1 ते 6 फेब्रुवारी 2017 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीतील रविवारीसुद्धा (5 फेब्रुवारी 2017) नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार आहेत, अशी माहितीही श्री. सहारिया यांनी दिली.