Search This Blog

Monday, April 17, 2017

साडेसहापर्यंत मतदानाची वेळ

चंद्रपूर, परभणी व लातूर महानगरपालिकेसाठी
सायंकाळी साडेसहापर्यंत मतदानाची वेळ
मुंबई, दि.  17: ऊन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदारांच्या सोयीसाठी चंद्रपूर, परभणी व लातूर महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदानाची वेळ सायंकाळी 6.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, चंद्रपूर, परभणी व लातूर या तीन महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 19 एप्रिल 2017 रोजी मतदान होत आहे. त्यासाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली होती; परंतु ऊन्हाच्या तीव्रतेमुळे मतदानाची वेळ वाढवून देण्याची विनंती काही राजकीय पक्षांनी केली होती. त्यानुसार मतदारांना आता सायंकाळी 5.30 ऐवजी सायंकाळी 6.30 पर्यंत मतदानाचा हक्क बजावता येईल. त्याचबरोबर ऊन्हाचा कडाका लक्षात घेता सर्व मतदान केंद्रांवर पुरेशी सावली व पाण्याची व्यवस्थादेखील करण्यात येणार आहे.
अकोल्यातही मतदानाच्या वेळत वाढ
अकोला जिल्हा परिषदेचा दानापूर निवडणूक विभाग आणि अकोट (जि. अकोला) पंचायत समितीच्या कुटासा निर्वाचक गणाच्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठीदेखील 19 एप्रिल 2017 रोजी मतदान होत आहे. या दोन्ही ठिकाणीदेखील उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदानाची वेळ सायंकाळी 5.30 ऐवजी 6.30 वाजेपर्यंत वाढवून देण्यात आली आहे, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.