Search This Blog

Friday, April 21, 2017

नागभीड नगरपरिषद, रेणापूर, नेवासा, शिराळा व धारणीत 24 मे रोजी मतदान

नागभीड नगरपरिषद, रेणापूर, नेवासा आणि शिराळा नगरपंचायती
व धारणी पंचायत समितीसाठी 24 मे रोजी मतदान
मुंबई, दि. 21: नवनिर्मित नागभीड (जि. चंद्रपूर) नगरपरिषद अध्यक्ष व सदस्य पदांबरोबरच नेवासा (जि. अहमदनगर), रेणापूर (जि. लातूर) व शिराळा (जि. सांगली) नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच विविध 18 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील रिक्त पदांच्या पोट निवडणुकांबरोबरच धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीदेखील 24 मे 2017 रोजी मतदान घेण्यात येईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नगरपरिषदा  व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी 28 एप्रिल ते 5 मे 2017 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 6 मे 2017 रोजी होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध अपील नसलेल्या ठिकाणी 11 मे 2017 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी अपिलाच्या निर्णयापासून तीन दिवसांपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 24 मे 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 26 मे 2017 रोजी मतमोजणी होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.
जिल्हानिहाय नगरपरिषद व नगरपंचायतींच्या रिक्त पदांच्या पोट निवडणुका: पालघर: जव्हार- 1 क, 3 ब, 4अ, 4 ब व 4 इ, रायगड: मुरुड जंजिरा- 7 अ आणि श्रीवर्धन- 6 अ, रत्नागिरी: चिपळूण- 9 अ, सिंधुदुर्ग: कसई दोडामार्ग- 7, सातारा: मेढा- 3, सोलापूर: दुधनी- 2 अ, नाशिक: देवळा- 14, जळगाव: यावल- 1 ब, नंदुरबार: धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु.- 11, नंदुरबार- 2 क, उस्मानाबाद: उस्मानाबाद- 11 ब, लातूर: औसा- 10 अ आणि अमरावती: अचलपूर- 19 ब.
धारणीचा निवडणूक कार्यक्रम
       धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 4 मे ते 9 मे 2017 या कालावधीत नामनिर्देनपत्रे दाखल करता येतील. 11 मे 2017 रोजी नामनिर्देनपत्रांची छाननी होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे 14 मे 2017 पर्यंत अपील करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी 16 मे 2017 हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक असेल. अपील असलेल्या ठिकाणी 19 मे 2017 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. मतदान केंद्रांची यादी 18 मे 2017 रोजी प्रसिद्ध केली जाईल. 24 मे 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची मुदत असेल. 26 मे 2017 रोजी मतमोजणी होईल.