Search This Blog

Monday, March 27, 2017

महिला सक्षमीकरणाची गरज

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी
महिला सक्षमीकरणाची गरज
     -राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई, दि.  27: राज्यातील सुमारे आठ हजार ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुकांसंदर्भात इच्छूक महिला उमेदवारांचे निवडणूक प्रक्रिया व ग्रामपंचायत कारभाराच्या दृष्टीने अधिकाधिक सक्षमीकरण करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने कार्यक्रमाची आखणी करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिले आहेत.
ग्रामपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात आयोगाच्या कार्यालयात नुकतीच बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामविकास विभागाचे सचिव असीमकुमार गुप्ता, आयोगाचे सचिव शेखर चन्ने, सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, यशदाचे डॉ. अजय सावरीकर, महिला राजसत्ता आंदोलनाचे भीम रासकार, युनिसेफच्या अनुराधा आदी यावेळी उपस्थितीत होते.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील 50 टक्के आरक्षण हे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल ठरत आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. आता सर्वच समाज घटकांतील अधिकाधिक महिलांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढला पाहिजे. त्यासाठी इच्छूक महिला उमेदवारांना निवडणूक प्रक्रिया आणि ग्रामपंचायतीचा कारभार याविषयी माहिती होणे आवश्यक आहे.
 ग्रामपंचायतींचे प्रभागनिहाय विभाजनात सर्व वस्त्या व वाड्यांचा समावेश झाला पाहिजे. कोणही मतदानापासून किंवा निवडणूक लढविण्यापासून वंचित राहू नये. निवडणुकांच्या वेळी मतदार शिक्षण आणि जागृती केली पाहिजे. संगणकीय प्रणालीद्वारे उमेदवारी अर्ज भरण्याबाबत महिला उमेदवारांना प्रशिक्षणदेखील दिले पाहिजे, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
महिलांसाठी केवळ 50 टक्के जागा आरक्षित नसून अन्य जागांवरही महिला निवडणूक लढवू शकतात, याबाबत व्यापकप्रमाणात जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे मत श्री. रासकर यांनी यावेळी व्यक्त केले.