Search This Blog

Monday, February 20, 2017

10 महानगरपालिका, 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांसाठी आज मतदान


10 महानगरपालिका, 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांसाठी आज मतदान
3 हजार 210 जागांसाठी 17 हजार 331 उमेदवारांमध्ये लढत
निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज: राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई, दि. 20: राज्यातील 10 महानगरपालिका आणि दुसऱ्या टप्प्यातील 11 जिल्हापरिषदा व त्यांतर्गतच्या 118 पंचायत समित्यांसाठी उद्या (ता.21) मतदान होत असून या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण 3 हजार 210 जागांसाठी 17 हजार 331 उमेदवारांमध्ये लढत होत आहे. त्यासाठी 3 कोटी 77 लाख 60 हजार 812 मतदारांकरिता 43 हजार 160 मतदान केंद्रांची; तसेच 68 हजार 943 कंट्रोल युनिट व 1 लाख 22 हजार 431 बॅलेट युनिटसह यंत्रांची व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर 2 लाख 73 हजार 859 कर्मचाऱ्यांसह आवश्यक तेवढा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
राज्य निवडणूक आयोगाच्या येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आयोगाचे सचिव शेखर चन्ने यावेळी उपस्थित होते. श्री. सहारिया यांनी सांगितले की, 11 जानेवारी 2017 रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यातील 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 16 फेब्रुवारी 2017 रोजी सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडली. दुसऱ्या टप्प्यात 11 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांसाठी मतदान होईल. गडचिरोली जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची दोन टप्प्यात विभागणी करण्यात आली होती. या जिल्ह्यातील 8 पंचायत समित्या व त्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभागांसाठी  पहिल्या टप्प्यात मतदान झाले; तर 4 पंचायत समित्या व त्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभागांसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल.
वर्धा जिल्हा परिषदेच्या 2 आणि यवतमाळ जिल्हा परिषदेच्या 6 जागांबरोबरच त्यांतर्गतच्या पंचायत समितीच्या 16 जागांसाठीदेखील उद्या मतदान होत आहे. न्यायालयीन प्रकरणांमुळे या ठिकाणी पहिल्या टप्प्यात मतदान घेण्यात आले नव्हते, असे स्पष्ट करून श्री. सहारिया म्हणाले की, सर्व 10 महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मात्र सर्व ठिकाणी एकाच दिवशी मतदान होत आहे. महानगरपालिकेच्या 1 हजार 268 जागांसाठी 9 हजार 208 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या 654 जागांसाठी 2 हजार 956; तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 288 जागांसाठी 5 हजार 167 उमेदवारांमध्ये लढत होत आहे. सर्व ठिकाणी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजपर्यंतच मतदानाची वेळ असेल. या सर्व ठिकाणी 23 फेब्रुवारी 2017 रोजी मतमोजणी होईल.
मतदानाचा हक्क बजवा
या सर्व निवडणुकांची तयारी पूर्ण झाली असून राज्य निवडणूक आयोगाची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक तेवढा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडून वेळोवेळी आढावादेखील घेण्यात आला आहे. त्यामुळे मतदारांनी आता निर्भयपणे घराबाहेर पडून मतदानाचा आपला हक्क अवश्य बजवावा, असे आवाहन श्री. सहारिया यांनी केले.
महानगरपालिकानिहाय (कंसात जागा) उमेदवार: बृहन्‍मुंबई (227)- 2,275, ठाणे (131)- 805, उल्हासनगर (78)- 479, पुणे (162)- 1,090, पिंपरी-चिंचवड (128)- 774, सोलापूर (102)- 623, नाशिक (122)- 821 अकोला (80)- 579, अमरावती (87)- 627 आणि नागपूर (151)- 1,135. एकूण (1,268)- 9,208.
            जिल्हा परिषद व पंचायत समितीनिहाय (कंसात एकूण जागा): रायगड (59)- 187, रत्नागिरी (55)- 226, सिंधुदुर्ग (50)- 170, नाशिक (73)- 338, पुणे (75)- 374, सातारा (64)- 285, सांगली (60)- 229, सोलापूर (68)- 278, कोल्हापूर (67)- 322, अमरावती (59)- 417, वर्धा (2)- 8, यवतमाळ (6)- 34 आणि गडचिरोली (16)- 88. एकूण (654)- 2,956. या जिल्हा परिषदांतर्गतच्या 118 पंचायत समित्या (एकूण जागा 1288)- 5,167.
एकूण व्याप्ती
·         एकूण जागा- 3,210
·         उमेदवार- 17,331
·         मतदार- 3,77,60,812
·         मतदान केंद्रे- 43,160
·         मतदान यंत्रे- सीयू 68,943 व बीयू- 1,22,431
·         कर्मचारी- 2,73,859
महानगरपालिका ठळक नोंदी
·         एकूण जागा- 1,268      
·         उमेदवार- 9,208          
·         पुरूष मतदार- 1,04,26,289
·         महिला मतदार- 91,10,165
·         इतर मतदार- 742
·         एकूण मतदार- 1,95,37,196     
·         मतदान केंद्रे- 21,001
·         मतदान यंत्रे- सीयू- 52,277 व बीयू- 56,932     
·         कर्मचारी- 1,29,761
·         वाहने- 6,868
जि. प. आणि पं. स. ठळक नोंदी
·         जि. प. एकूण जागा- 654          
·         जि. प. उमेदवार- 2,956
·         पं.स. एकूण जागा- 1,288
·         पं.स. उमेदवार- 5,167
·         पुरूष मतदार- 94,43,911
·         महिला मतदार- 87,79,604
·         इतर मतदार- 101
·         एकूण मतदार- 1,82,23,616
·         मतदान केंद्रे- 22,159
·         मतदान यंत्रे- सीयू 43,666 व बीयू- 65,499      
·         कर्मचारी- 1,44,098
कायदा व सुव्यवस्थेबाबत कार्यवाही
·         प्रतिबंधात्मक कारवाई-54,025
·         नाकाबंदी- 9,700
·         अवैध शस्त्र जप्त- 211
·         रोकड जप्त- 75,66,980 (प्रकरणे 17)
·         अवैध दारू- 6,81,556 लीटर (प्रकरणे 10,898)
·         आचारसंहिता भंग प्रकरणे- 338
·         मालमत्ता विद्रुपीकरण- 77
·         तडीपार- 371
ट्रु वोटर ॲप
·         ट्रु वोटर ॲप डाऊनलोड- 1,35,000
·         यादीत नाव, प्रभाग व मतदान केंद्रांचा शोध- 9 लाख मतदार
·         मतदान केंद्रांवर पोहचण्यासाठी मार्गक्रमण (मतदार) 98,000
·         प्रभागातील उमेदवाराची माहिती पाहणाऱ्यांची संख्या- 45,000
·         अधिकाऱ्यांची नोंदणी 22,270
कॉप ॲप
·         ॲप डाऊनलोड 20,000 (रेटिंग- 4.1)
·         5,345 अधिकाऱ्यांनी नोंदणी केली
·         5,382 मतदारांनी नोंदणी केली
·         ॲपद्वारे एकूण तक्रारी 501 दाखल
मिस् कॉल प्रतिज्ञा
·         मतदारांसाठी 9029901901 या क्रमांकावर मिस् कॉल सुविधा
·         एकूण 11,13,022 मतदारांकडून मिस् कॉलद्वारे प्रतिज्ञा
·         चॅटबॉट सुविधेचा 12,796 जणांकडून वापर