Search This Blog

Friday, December 2, 2016

अंतिम मतदार यादी 21 जानेवारीला

महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका 2017
मतदार यादीवर हरकती व सूचनांसाठी 12 पासून 17 जानेवारीपर्यंत मुदत
अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी 21 जानेवारीला
मुंबई, दि. 2: राज्यातील 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषदा व 296 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तयार करण्यात येणाऱ्या मतदार यादीवर 12 ते 17 जानेवारी 2017 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील; तर अंतिम मतदार यादी 21 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाकडून 1 जानेवारी 2017 च्या अर्हता दिनांकावर आधारीत तयार करण्यात येणारी विधानसभा मतदार संघाचीच मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ही यादी महानगरपालिकांसाठी प्रभागनिहाय, जिल्हा परिषदांसाठी निवडणूक विभागनिहाय; तर पंचायत समित्यांसाठी निर्वाचक गणनिहाय विभागण्यात येईल. भारत निवडणूक आयोगाने 16 सप्टेंबर 2016 रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीचे विभाजन 15 डिसेंबर 2016 पर्यंत करण्यात येईल. त्यानंतर ती मतदार यादी संबंधित महानगरपालिका, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदांच्या संकेतस्थळांवर सर्वांच्या माहितीस्तव प्रसिद्ध केली जाईल.
नवीन मतदार नोंदणीसाठी भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकानुसार 16 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर 2016 या कालावधीत नवीन मतदार नोंदणी; तसेच नाव व पत्त्यांतीतील दुरुस्तीसाठी अर्ज मागविले होते. या कालावधीत प्राप्त झालेले अर्ज विचारात घेऊन भारत निवडणूक आयोग 5 जानेवारी 2017 रोजी विधानसभा मतदार संघांची पुरवणी यादी प्रसिद्ध करणार आहे. या पुरवणी यादीचेही महानगरपालिकांसाठी प्रभागनिहाय, जिल्हा परिषदांसाठी निवडणूक विभागनिहाय; तर पंचायत समित्यांसाठी निर्वाचक गणनिहाय विभाजन करून ती 12 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध केली जाईल. विभाजित करण्यात येणाऱ्या 16 सप्टेंबर 2016 च्या प्रारूप व 5 जानेवारी 2017 च्या पुरवणी मतदार यादीवर 12 ते 17 जानेवारी 2017 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करण्यात येतील. 21 जानेवारी 2017 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. भारत निवडणूक आयोगाकडून 5 जानेवारी 2017 रोजी विधानसभा मतदार संघांची पुरवणी यादी प्रसिद्ध करण्याची तारीख बदलल्यास त्यानुसार महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठीच्या मतदार यादीच्या कार्यक्रमातही बदल होईल, असे त्यांनी सांगितले.
फक्त याच सुधारणा शक्य...
विधानसभा मतदार संघाच्या यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी 21 ऑक्टोबर 2016 पर्यंत अर्ज केलेल्या व त्यास भारत निवडणूक आयोगाने मंजूर केलेल्या नावांचाच महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्याच मतदार यादीत समावेश असेल. विधानसभेच्या मूळ यादीत कोणत्याही दुरुस्त्या करता येणार नाहीत. विधानसभेच्या मतदार यादीचे विभाजन करताना एखादा मतदार मयत, स्थलांतरित अथवा दुबार आढळल्यास किंवा तशा तक्रारी आल्यास अशा मतदारांच्या नावासमोर केवळ नोंद करण्यात येते. अशा मतदाराचे मतदार यादीत छायाचित्र नसल्यास त्याचे अधिक पुरावे तपासूनच त्याला मतदान करण्याची संधी दिली जाते. त्याचबरोबर मतदार यादीचे प्रभाग, निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणनिहाय विभाजन करताना लेखनिकांकडून चूक झाली असल्यास किंवा वेगळ्याच प्रभागात चुकून नावाचा समावेश झाला असल्यास अशा दुरूस्त्या आक्षेपानंतर करण्यात येतात; तसेच संबंधित विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही ते विभाजित मतदार यादीतून वगळले गेले असल्यास त्याचादेखील समावेश करण्यात येतो, असेही श्री. साहारिया यांनी सांगितले.
निवडणुका होणाऱ्या 10 महानगरपालिकांची नावे अशी: 1) बृहन्मुंबई, 2) ठाणे, 3) उल्हासनगर, 4) नाशिक, 5) पुणे, 6) पिंपरी-चिंचवड, 7) सोलापूर, 8) अमरावती, 9) अकोला आणि 10) नागपूर.
निवडणुका होणाऱ्या जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांची संख्या: 1) रायगड- 15, 2) रत्नागिरी-9, 3) सिंधुदुर्ग- 8, 4) नाशिक- 15, 5) जळगाव- 15, 6) अहमदनगर- 14, 7) पुणे- 13, 8) सातारा- 11, 9) सांगली- 10, 10) सोलापूर- 11, 11) कोल्हापूर- 12, 12) औरंगाबाद- 9, 13) जालना- 8, 14) परभणी- 9, 15) हिंगोली- 5, 16) बीड- 11, 17) नांदेड- 16, 18) उस्मानाबाद- 8, 19) लातूर- 10, 20) अमरावती- 10, 21) बुलडाणा- 13, 22) यवतमाळ- 16, 23) नागपूर- 13, 24) वर्धा- 8, 25) चंद्रपूर- 15 आणि 26) गडचिरोली- 12. एकूण जिल्हा परिषदा- 26 व एकूण पंचायत समित्या- 296.
                           महानगरपालिकांचा तपशील:
·         निवडणूक होणाऱ्या महानगरपालिका- 10
·         एकूण लोकसंख्या- 2,57,19,093
·         एकूण प्रभाग- 490
·         एकूण जागा- 1,268 (महिला 636)
·         सर्वसाधारण- 716 (महिला- 353)
·         अनुसूचित जाती- 171 (महिला 88)
·         अनुसूचित जमाती- 38 (महिला 20)
·         नागरिकांचा मागासप्रवर्ग- 343 (महिला 175)
जिल्हा परिषदांचा तपशील:
·         निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदा- 26
·         एकूण लोकसंख्या- 5,26,92,534
·         एकूण जागा- 1,568 (महिला 787)
·         सर्वसाधारण- 781 (महिला 380)
·         अनुसूचित जाती- 200 (महिला 106)
·         अनुसूचित जमाती- 164 (महिला 86)
·         नागरिकांचा मागासप्रवर्ग- 424 (महिला 216) 
पंचायत समित्यांचा तपशील:
·         निवडणूक होणाऱ्या पंचायत समित्या- 296
·         एकूण लोकसंख्या- 5,24,14,683
·         एकूण जागा- 3,116 (महिला 1,558)
·         सर्वसाधारण- 1,574
·         अनुसूचित जाती- 406
·         अनुसूचित जमाती- 308
·         नागरिकांचा मागासप्रवर्ग- 828

Sunday, November 27, 2016

सरासरी 70 टक्के मतदान

नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी सरासरी 70 टक्के मतदान
मुंबई, दि.27: राज्यातील 25 जिल्ह्यांमधील 164 नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 147 थेट नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांसाठी आज सरासरी 70 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, राज्यात पहिल्या टप्प्यातील 147 नगरपरिषदा व 17 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान झाले. नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सदस्य पदाच्या एकूण 3 हजार 705; तर थेट नगराध्यक्ष पदांच्या 147 जागांसाठी मतदारांनी मतदान केले. त्यासाठी 7 हजार 641 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. उद्या (ता. 28) सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीस सुरवात होईल. निकालानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल.
प्राथमिक अंदाजानुसार जिल्हानिहाय झालेल्या मतदानाची सरासरी टक्केवारी अशी (नगरपरिषदा व नगरपंचायतींची संख्या): कोकण विभाग: पालघर (3)- 80, रायगड (9)- 88, रत्नागिरी (5)- 88 व सिंधुदुर्ग (4)- 67. पुणे विभाग: सातारा (14)- 83, सांगली (8)- 84, सोलापूर (9)- 73 व कोल्हापूर (9)- 79. नाशिक विभाग: नाशिक (6)- 79, धुळे (2)- 70, नंदुरबार (1)- 74, जळगाव (13)- 68 व अहमदनगर (8)- 83. औरंगाबाद विभाग: जालना (4)- 59, परभणी (7)- 76, हिंगोली (3)- 68, बीड (6)- 74 व उस्मानाबाद (8)- 68. अमरावती विभाग: अमरावती (9)- 72, अकोला (5)- 67, बुलडाणा (9)- 79, वाशीम (3)- 64, यवतमाळ (8)- 60. नागपूर विभाग: वर्धा (6)- 60, चंद्रपूर (5)- 63. एकूण सरासरी- (164)- 70.

Saturday, November 26, 2016

नगरपरिषदांसाठी यंत्रणा सज्ज

26 कोटींची रोकड व सव्वा लाख लीटर अवैध मद्य जप्त
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांसाठी यंत्रणा सज्ज: सहारिया
58 लाख 49 हजार मतदार; तर 7 हजार 641 मतदान केंद्रांची व्यवस्था
            मुंबई, दि. 26: राज्यात पहिल्या टप्प्यातील 164 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता. 27) मतदान आहे. त्यासाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज असून सदस्य पदांच्या 3 हजार 705 व थेट नगराध्यक्ष पदांच्या 147 जांगासाठी ही निवडणूक होत आहे. मतदारांची एकूण संख्या 58 लाख 49 हजार 171 इतकी असून त्यासाठी 7 हजार 641 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे; दरम्यान, आचारसंहितेच्या काळात 26 कोटी 4 लाख 47 हजार 250 रुपयांची रोकड आणि 1 लाख 24 हजार 336 लीटर अवैध मद्य जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यात 25 जिल्ह्यांमधील 147 नगरपरिषदा व 18 नगरपंचायतींसाठी (एकूण 165) उद्या मतदान होणार होते; परंतु शिराळा (जि. सांगली) नगरपंचायतीसाठी एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे आता 17 नगरपंचायतींसाठी मतदान होईल; तसेच विविध ठिकाणी 28 उमेदवार बिनविरोध विजयी झाल्यामुळे सदस्य पदाच्या 3 हजार 705 जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होईल. त्यासाठी 15 हजार 826 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नगरपरिषदेच्या 147 थेट नगराध्यक्ष पदांसाठी 1 हजार 13 उमेदवारांमध्ये लढत होईल. या सर्व ठिकाणी उद्या सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 28 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीस सुरवात होईल. निकालानंतर संबंधित ठिकाणाची आचारसंहिता संपुष्टात येईल.
            कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी पुरेशा बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे. गृहरक्षक दलाचे जवानही तैनात असतील. आवश्यकतेनुसार राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्याही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांबाबत पुरेशी काळजी घेतली जाणार आहे. या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासूनच पोलिसांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे. या कालावधीत पोलिसांनी विविध 41 प्रकरणांमध्ये 26 कोटी 4 लाख 47 हजार 250 रुपयांची रोकड जप्त केली आहे. 2 हजार 520 प्रकरणांमध्ये 1 लाख 24 हजार 336 लीटर अवैध मद्यही जप्त केले आहे. त्याचबरोबर संशयित व्यक्तिंविरुद्ध कार्यवाही, प्रतिबंधात्मक उपाय, नाकाबंधी इत्यादी उपाययोजनाही केल्या आहेत, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
चौकट (बाईट)
मतदान आवश्य करा…
नगरपरिषदेची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने होत आहे; तसेच नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांची थेट निवडणूक होत आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराला सदस्य पदासाठी दोन ते तीन आणि आणखी एक मत थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी द्यायचे आहे. नगरपंचायतींची निवडणूक एक सदस्यीय पद्धतीने होत आहे. तिथे प्रत्येक मतदाराला केवळ एक मत द्यायचे आहे. त्यासाठी अधिकाधिक संख्येने मतदार बंधू- भगिनींनी घराबाहेर पडून निर्भीडपणे मतदान करावे आणि लोकशाही बळकट करावी.
श्री. ज. स. सहारिया,
राज्य निवडणूक आयुक्त.
ठळक आकडे
·         एकूण प्रभाग- 1,967
·         सदस्यपदांच्या जागा- 3,705
·         थेट नगराध्यक्षपदांच्या जागा- 147
·         एकूण मतदान केंद्रे- 7,641
·         एकूण मतदार- 58,49,171
·         पुरुष मतदार- 30,20,683
·         स्त्री मतदार- 28,28,263
·         इतर मतदार- 225
·         सदस्यपदांसाठी उमेदवार- 15,826
·         बिनविरोध विजयी सदस्य- 28
·         थेट नगराध्यक्ष पदांसाठीचे उमेदवार- 1,013
·         मतदानाची वेळ- स. 7.30 ते सा. 5.30
·         मतमोजणी- 28 नोव्हेंबर 2016
·         मतमोजणीची वेळ- सकाळी  10 पासून
ठळक नोंदी
·         रोकड जप्त- 26,04,47,250
·         अवैध दारु जप्त- 1,24,336
·         अवैध शस्त्रे जप्त- 9
·         आचारसंहिता भंगांच्या तक्रारी- 69
·         मालमत्ता विद्रुपीकरण तक्रारी- 30
·         संशयित व्यक्तिंविरुद्ध कार्यवाही- 16,810
·         शांततेसाठी जामीनपत्रे घेतलेल्या व्यक्ती- 8,741
·         प्रतिबंधात्मक कार्यवाही- 3,173
·         नाकाबंदी- 4,718
पहिल्या टप्प्यात उद्या मतदान होत असलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतींची नावे: पालघर: 1) विक्रमगड (नवीन न.पं.), 2) तलासरी (नवीन न.पं.) व 3) मोखाडा (नवीन न.पं.). रायगड: 1) खोपोली, 2) उरण, 3) पेण, 4) अलिबाग, 5) मुरूड-जंजिरा, 6) रोहा, 7) श्रीवर्धन, 8) महाड, व 9) माथेरान. रत्नागिरी: 1) चिपळूण, 2) रत्नागिरी, 3) दापोली न.पं., 4) खेड व 5) राजापूर. सिंधुदुर्ग: 1) वेंगुर्ले, 2) सावंतवाडी, 3) मालवण व 4) देवगड-जामसांडे (नवीन न.पं.). सोलापूर: 1) बार्शी, 2) पंढरपूर, 3) अक्कलकोट, 4) करमाळा, 5) कुर्डूवाडी, 6) सांगोला, 7) मंगळवेढा, 8) मैंदर्गी व 9) दुधनी. कोल्हापूर: 1) इचलकरंजी, 2) जयसिंगपूर, 3) मलकापूर, 4) वडगाव-कसबा, 5) कुरूंदवाड, 6) कागल, 7) मुरगुड, 8) गडहिंग्लज व 9) पन्हाळा. सांगली: 1) इस्लामपूर, 2) विटा, 3) आष्टा, 4) तासगाव, 5) कवठे-महांकाळ (नवीन न.पं.), 6) कडेगाव (नवीन न.पं.) 7) खानापूर (नवीन न.पं.) व 8) पलूस (नवीन नगर परिषद). सातारा: 1) सातारा, 2) फलटण, 3) कराड, 4) वाई, 5) म्हसवड, 6) रहिमतपूर, 7) महाबळेश्वर, 8) पाचगणी, 9) कोरेगाव (नवीन न.पं.), 10) मेढा (नवीन न.पं.), 11) पाटण (नवीन न.पं.), 12) वडूज (नवीन न.पं.), 13) खंडाळा (नवीन न.पं.)  व 14) दहिवडी (नवीन न.पं.). नाशिक: 1) मनमाड, 2) सिन्नर, 3) येवला, 4) सटाणा, 5) नांदगाव व 6) भगूर. अहमदनगर: 1) संगमनेर, 2) कोपरगाव, 3) श्रीरामपूर, 4) शिर्डी, 5) रहाता, 6) पाथर्डी, 7) राहुरी व 8) देवळाली प्रवरा. नंदुरबार: 1) शहादा. धुळे: 1) शिरपूर-वरवाडे व 2) दोंडाईचा-वरवाडे. जळगाव: 1) भुसावळ, 2) चोपडा, 3) अंमळनेर, 4) चाळीसगाव, 5) पाचोरा, 6) यावल, 7) फैजपूर, 8) सावदा, 9) रावेर, 10) एरंडोल, 11) धरणगाव, 12) पारोळा व 13) बोदवड (नवीन न.पं.). जालना: 1) जालना, 2) भोकरदन, 3) अंबड व 4) परतूर. परभणी: 1) गंगाखेड, 2) सेलू, 3) जिंतूर, 4) मानवत, 5) पाथरी, 6) सोनपेठ व 7) पूर्णा. हिंगोली: 1) हिंगोली, 2) बसमतनगर व 3) कळमनुरी. बीड: 1) बीड, 2) माजलगाव, 3) परळी-वैजनाथ, 4) अंबेजोगाई, 5) गेवराई व 6) धारूर. उस्मानाबाद: 1) उस्मानाबाद, 2) परांडा, 3) भूम, 4) कळंब, 5) तुळजापूर, 6) नळदुर्ग, 7) मुरूम व 8) उमरगा. यवतमाळ: 1) यवतमाळ, 2) दिग्रस, 3) पुसद, 4) उमरखेड, 5) वणी, 6) घाटंजी, 7) आर्णी व 8) दारव्हा. अकोला: 1) अकोट, 2) बाळापूर, 3) मूर्तिजापूर, 4) तेल्हारा व 5) पातूर. वाशीम: 1) कारंजा, 2) वाशीम व 3) मंगरूळपीर. अमरावती: 1) अचलपूर, 2) अंजनगावसूर्जी, 3) वरूड, 4) चांदुरबाजार, 5) मोर्शी, 6) शेंदुरजनाघाट, 7) दर्यापूर, 8) चांदूर रेल्वे व 9) धामणगाव. बुलडाणा: 1) शेगाव, 2) नांदुरा, 3) मलकापूर, 4) खामगाव, 5) मेहकर, 6) चिखली, 7) बुलडाणा, 8)  जळगाव-जामोद व 9) देऊळगाव राजा. वर्धा: 1) वर्धा, 2) हिंगणघाट, 3) आर्वी, 4) सिंदी, 5) पुलगांव व 6) देवळी. चंद्रपूर: 1) बल्लारपूर, 2) वरोरा, 3) मूल, 4) राजुरा व 5) सिंदेवाही (नवीन न.पं.). 

Friday, November 25, 2016

पुणे व लातूर जिल्ह्यातील 1 हजार 704 नामनिर्देनपत्रे

पुणे व लातूर जिल्ह्यातील 14 नगरपरिषदांसाठी 1 हजार 704 नामनिर्देनपत्रे
शंभर टक्के नामनिर्देशनपत्रे संगणक प्रणालीद्वारे
मुंबई, दि.25: नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील 10 व लातूर जिल्ह्यातील 4 अशा एकूण 14 नगरपरिषदांच्या 324 जागांसाठी 1 हजार 704; तर थेट नगराध्यक्षपदाच्या 14 जागांसाठी एकूण 162 नामनिर्देनपत्रे दाखल झाली आहेत. सर्व म्हणजे शंभर टक्के नामनिर्देनपत्रे संगणकीय प्रणालीद्वारे प्राप्त झाली आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, दुसऱ्या टप्प्यातील 14 नगरपरिषदांसाठी 14 डिसेंबर 2016 रोजी मतदान होत आहे. त्यासाठी नामनिर्देनपत्रे दाखल करण्याची मुदत संपली आहे. नामनिर्देनपत्रे माघारीची अंतिम मुदत 1 डिसेंबर 2016 पर्यंत आहे. त्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल.
पहिल्या टप्प्यात 164 नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी सुमारे 70 टक्के नामनिर्देनपत्रे संगणक प्रणालीद्वारे प्राप्त झाली होती. पहिल्या टप्प्यात काही ठिकाणी वीज पुरवठा व इंटरनेट संदर्भात स्थानिक पातळीवर अडचणी येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्या लक्षात घेवून कोणीही नामनिर्देशनपत्रे भरण्यासापासून वंचित राहू नये म्हणून पारंपरिक पद्धतीने नामनिर्देशनपत्रे भरण्याची मूभा देण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यासाठी मदत कक्ष, ई-म्युटेशन सुविधा इत्यादी उपाययोजना अधिक प्रभावी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे 100 टक्के नामनिर्देशनपत्रे संगणकी प्रणालीद्वारे प्राप्त झाली आहेत, असे श्री. सहारिया यांनी सांगितले.

50 ग्रामपंचायतींसाठी 28 डिसेंबरला मतदान

विविध जिल्ह्यांतील 50 ग्रामपंचायतींसाठी 28 डिसेंबरला मतदान
              राज्य निवडणूक आयुक्त
            मुंबई, दि.25: जानेवारी ते मे 2017 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापन होणाऱ्या विविध जिल्ह्यांतील 50 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 28 डिसेंबर 2016 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
            श्री. सहारिया यांनी सांगितले की, या ग्रामपंचायतींसाठी 6 ते 13 डिसेंबर 2016 या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार आहेत. 14 डिसेंबर 2016 रोजी छाननी होणार असून 16 डिसेंबर 2016 रोजीपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची मुदत असेल. त्याच दिवशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे प्रसिद्ध करून त्यांना निवडणूक चिन्हाचे वाटप केले जाईल.
            मतदानाच्या दिवशीच म्हणजे तसेच 28 डिसेंबर 2016 रोजी लगेचच मतमोजणी होणार आहे. यासंबंधात मतमोजणीचे ठिकाण व वेळ संबंधित जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने संबंधित तहसिलदार निश्चित करतील, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
        निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 5, पालघर- 3, रायगड- 1, रत्नागिरी- 1, नाशिक- 10, अहमदनगर- 1, धुळे- 3, नंदुरबार- 1, पुणे- 6, सोलापूर- 2, औरंगाबाद- 1, नांदेड- 2, बीड- 1, अमरावती- 2, यवतमाळ- 3, बुलडाणा- 2, वर्धा- 2, भंडारा- 3 व गडचिराली- 1. 

Saturday, November 19, 2016

15 हजार 827 उमेदवार रिंगणात

नगरपरिषद, नगरपंचायतींच्या सदस्य पदांसाठी 15 हजार 827 उमेदवार निवडणूक रिंगणात
147 थेट नगराध्यक्ष पदांसाठी 1 हजार 13 उमेदवारांमध्ये लढत
            मुंबई, दि. 19: राज्यात पहिल्या टप्प्यात मतदान होत असलेल्या 164 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सदस्य पदांच्या 3 हजार 706 जागांसाठी एकूण 15 हजार 827 उमेदवार निवडणूक रिंगणात असून 27 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत; तर 147 थेट नगराध्यक्ष पदांसाठी 1 हजार 13 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
            श्री. सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यातील 25 जिल्ह्यांमधील 147 नगरपरिषदा व 18 नगरपंचायतींच्या (एकूण 165) सार्वत्रिक निवडणुकांसाठी 27 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होणार होते; परंतु  विविध ठिकाणी 27 उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने आणि शिराळा (जि. सांगली) नगरपंचायतीसाठी एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे आता 164 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 3 हजार 706 जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होईल. सदस्य पदांसाठी दाखल झालेल्या एकूण 24 हजार 191 पैकी 20 हजार 716 नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. त्यातील 4 हजार 889 उमेदवारांनी माघार घेतल्याने प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात 15 हजार 827 उमेदवार शिल्लक राहिले आहेत.
            सदस्य पदाबरोबरच 147 थेट नगराध्यक्ष पदांसाठी दाखल झालेल्या एकूण 2 हजार 374 पैकी 1 हजार 533 नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. त्यातील 520 उमेदवारांनी माघार घेतल्याने प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात 1 हजार 13 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. या सर्व ठिकाणी 27 नोव्हेंबरला मतदानानंतर दुसऱ्या दिवशी 28 नोव्हेंबर 2016 रोजी मतमोजणी होईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
एक दृष्टिक्षेप
·         164 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान
·         सदस्य पदांच्या 3 हजार 706 जागांसाठी लढत
·         सदस्य पदांसाठी 15 हजार 827 उमेदवार रिंगणात
·         विविध ठिकाणी 27 उमेदवार बिनविरोध
·         147 थेट नगराध्यक्षपदांसाठी लढत
·         थेट नगराध्यक्षपदासाठी 1 हजार 13 उमेदवार रिंगणात

Thursday, November 10, 2016

70 टक्के नामनिर्देशनपत्रे संगणकप्रणालीद्वारे


सुमारे 70 टक्के नामनिर्देशनपत्रे संगणकप्रणालीद्वारे प्राप्त
नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी 20716 तर नगराध्यक्षपदासाठी 1533 अर्ज वैध
           मुंबई, दि. 10: राज्यातील पहिल्या टप्प्यात मतदान होत असलेल्या 165 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 3 हजार 750 जागांसाठी एकूण 24 हजार 191 नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली असून त्यापैकी 20 हजार 716 नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत; तर थेट नगराध्यक्ष पदाच्या 147 जागांसाठी 2 हजार 374 नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली. त्यापैकी 1 हजार 533 नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत. यातील सुमारे 70 टक्के नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे संगणक प्रणालीद्वारे प्राप्त झाली आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
          श्री. सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकूण 192 नगरपरिषदा व 20 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार चार टप्प्यात या निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यातील 25 जिल्ह्यांमधील 147 नगरपरिषदा व 18 नगरपंचायतींसाठी 27 नोव्हेंबर, 2016 रोजी मतदान होत आहे. त्यासाठी 29 ऑक्टोबर 2016 पर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत होती. बहिष्कारामुळे शिराळा (जि. सांगली) नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले नाही.
नामनिर्देशनपत्रे संगणक प्रणालीद्वारे भरण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता; परंतु काही ठिकाणी वीज पुरवठा आणि इंटरनेटबाबत अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यांची दखल घेऊन कोणीही नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यापासून वंचित राहून नये, यासाठी अखेरचे दोन दिवस पारंपरिक पद्धतीने नामनिर्देशनपत्रे सादर करण्याची मुभा देण्यात आली होती. आता उर्वरित तीन टप्प्यांसाठी मदत कक्ष, ई-म्युटेशन सुविधा इत्यादी उपाययोजना अधिक प्रभावी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्रे भरण्यासाठी कोणत्याही अडचणी उद्‌भवणार नाहीत, असा विश्वासही श्री. सहारिया यांनी व्यक्त केला. 

Monday, November 7, 2016

लोकराज्याची मदत


निवडणूक प्रक्रियेबद्दल माहिती प्रभावीपणे पोहचविण्यासाठी लोकराज्याची मदत                                                                              -राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई दि. 3: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वसामान्यांपर्यंत माहिती पोहचविण्यासाठी आणि मतदार जागृतीकरिता ‘लोकराज्य’ मासिकचा चांगला उपयोग होऊ शकेल, असे गौरवोद्‌गार राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी गुरुवारी (ता. 3) येथे काढले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होणाऱ्या लोकराज्य मासिकाच्या नोव्हेंबर-2016 च्या निवडणूक विशेषांकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, आयोगाचे सचिव शेखर चन्ने, माहिती संचालक अजय अंबेकर, देवेंद्र भुजबळ आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिकाधिक मुक्त, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासास आयोगाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. निवडणूक प्रक्रियेत मतदार हा सर्वात महत्वाचा घटक असतो. त्यांच्यापर्यंत सर्व माहिती जाणे आवश्यक असते. ते काम लोकराज्याच्या माध्यमातून होईल.
            लोकराज्य मासिकाद्वारे निवडणुकबाबतची संपूर्ण माहिती पुढील अंकामध्येही समाविष्ट करण्यात येईल, जेणेकरुन निवडणुकीबद्दलची सजगता वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन श्री. सिंह यांनी केले.
            राज्यातील 192 नगरपरिषदा व 20 नगरपंचायतींच्या निवडणूकांबद्दलची सविस्तर माहिती या अंकात देण्यात आली आहे. श्री. सहारिया यांच्या मुलाखतीचा यात समावेश आहे. नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीची संपूर्ण माहितीही वाचकांसाठी देण्यात आली आहे.
            सर्व जिल्हा माहिती कार्यालयांमध्ये;  तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-400 032 येथे हा अंक उपलब्ध आहे. अंकाची किंमत 10 रुपये असून वार्षिक वर्गणी रुपये 100 आहे.