Search This Blog

Monday, November 7, 2016

लोकराज्याची मदत


निवडणूक प्रक्रियेबद्दल माहिती प्रभावीपणे पोहचविण्यासाठी लोकराज्याची मदत                                                                              -राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई दि. 3: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वसामान्यांपर्यंत माहिती पोहचविण्यासाठी आणि मतदार जागृतीकरिता लोकराज्य मासिकचा चांगला उपयोग होऊ शकेल, असे गौरवोद्‌गार राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी गुरुवारी (ता. 3) येथे काढले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होणाऱ्या लोकराज्य मासिकाच्या नोव्हेंबर-2016 च्या निवडणूक विशेषांकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, आयोगाचे सचिव शेखर चन्ने, माहिती संचालक अजय अंबेकर, देवेंद्र भुजबळ आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिकाधिक मुक्त, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासास आयोगाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. निवडणूक प्रक्रियेत मतदार हा सर्वात महत्वाचा घटक असतो. त्यांच्यापर्यंत सर्व माहिती जाणे आवश्यक असते. ते काम लोकराज्याच्या माध्यमातून होईल.
            लोकराज्य मासिकाद्वारे निवडणुकबाबतची संपूर्ण माहिती पुढील अंकामध्येही समाविष्ट करण्यात येईल, जेणेकरुन निवडणुकीबद्दलची सजगता वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन श्री. सिंह यांनी केले.
            राज्यातील 192 नगरपरिषदा व 20 नगरपंचायतींच्या निवडणूकांबद्दलची सविस्तर माहिती या अंकात देण्यात आली आहे. श्री. सहारिया यांच्या मुलाखतीचा यात समावेश आहे. नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीची संपूर्ण माहितीही वाचकांसाठी देण्यात आली आहे.
            सर्व जिल्हा माहिती कार्यालयांमध्ये;  तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-400 032 येथे हा अंक उपलब्ध आहे. अंकाची किंमत 10 रुपये असून वार्षिक वर्गणी रुपये 100 आहे.