Search This Blog

Wednesday, January 25, 2017

लोकचळवळीची आवश्यकता

मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी लोकचळवळीची आवश्यकता
                                                                                                 -राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई, दि. 25: बृहन्मुंबईसह अन्य महानगरपालिकांच्या निवडणुकीतील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्यासाठी विविध संस्था, संघटना, माध्यमे, विद्यापीठ आदींना आवाहन करण्यात आले असून त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे; परंतु आता ही लोकचळवळ होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केले.
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई विद्यापीठ व सीआयआय (Confederation of Indian Industry) यांच्या वतीने मतदार दिनानिमित्त औचित्य साधून मुंबई राईज, मुंबई वोटया कार्यक्रमाचे विद्यापीठात आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख, सीआयआयचे प्रदेशाध्यक्ष सुनील खन्ना, उपाध्यक्ष निनाद कर्पे आदी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय मतदार दिवसाच्या शुभेच्छा देवून श्री. सहारिया म्हणाले की, मतदार यादीत नाव असूनही मुंबईसारख्या शहरात 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतदार मतदान करत नाहीत, हे फार मोठे आवाहन आहे. त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याबरोबरच युवक व महिला मतदारांनीदेखील मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करायला हवे. याकरिता मतदार जागृतीसाठी पारंपरिक पद्धतीबरोबरच सोशल मीडियाचाही प्रभावी वापर केला जाणार आहे.
श्री. खन्ना म्हणाले की, आम्ही आमच्या परिनेदेखील मतदान जागृतीसाठी प्रयत्न करणार आहोत. मतदान हा आपला हक्क आहे आणि कर्तव्यदेखील आहे. ते आपण बजावलेच पाहिजे. सोशल मीडियावर त्याबाबत आपणही व्यापक प्रमाणावर जनजागृती केली पाहिजे.
मत ही आपली ताकद
राज्य घटनेने मतदानाचा आपल्याला हक्क दिला आहे. तो आपण बजावलाच पाहिजे. कारण मत ही आपली ताकद आहे. स्वत: मतदान करण्याबरोबरच इतरांनादेखील मतदान करण्यासाठी प्रेरीत करायला हवे, असे मत यावेळी झालेल्या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.
मुंबई विद्यापीठाच्या महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. अनिल पाटील, टाटा सन्सच्या उपमहाव्यवस्थापक धारना धमिजा, आदित्य बिरला समूहाचे जेष्ठ अध्यक्ष तथा मुख्य अर्थतज्‍ज्ञ डॉ. अजित रानडे, टाटा कॅपिटल फायनान्सच्या बिझनेस डेव्हलपमेंट हेड कश्मिरा मेवावाला आणि पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स ॲन्ड इकॉनॉमिक्सच्या प्रा. मानसी फडके चर्चासत्राला उपस्थित होते. श्री. कर्पे चर्चासत्राचे समन्वयक होते.