Search This Blog

Thursday, January 19, 2017

आयोगाचे काम देशभरासाठी मार्गदर्शक

राज्य निवडणूक आयोगाचे काम देशभरातील निवडणुकांसाठी मार्गदर्शक
          -राज्यपालांचे गौरवोद्‌गार
मुंबई, दि. 19: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिकाधिक मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. ती देशभरातील निवडणुकांसाठी मार्गदर्शक ठरतील, असे गौरवोद्‌गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे काढले.
येथील सह्याद्री अतिथिगृहात राज्य निवडणूक आयोगाच्या मतदार जागृतीसाठीच्या बोधचिन्हाचे (Mascot) अनावरण, कॉप मोबाईल ॲप व मिस्ड कॉल सुविधेची सुरुवात; तसेच निवडणूक वार्ताच्या विशेषांकाचे प्रकाशन मा. राज्यपाल यांच्या हस्ते व राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालाचे सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव परिमल सिंह, आयोगाचे सचिव शेखर चन्ने आदी यावेळी उपस्थित होते.
निश्चलिकरणाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका कॅशलेस होतील, असा विश्वास व्यक्त करून मा. राज्यपाल म्हणाले की, या निवडणुकांमध्ये प्रथमच आयकरसह विविध विभागांना सहभागी करण्यात आले आहे. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल. शिवाय निवडणूक प्रक्रिया लोकाभिमूख करण्याचा आयोगाचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे; परंतु शहरी भागातील मतदानाचे प्रमाण कमी असणे ही चिंतेची बाब आहे. त्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने विविध नावीन्यपूर्ण बाबींचा अवलंब करून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी संगणकीय व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे.
मतदार जागृतीसाठी वोटरमित्रा
राज्यातील 10 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा व 283 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका 16 व 21 फेब्रुवारी 2017 रोजी होणार आहेत. या निवडणुकांत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदार जागृतीकरिता बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे. मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी या बोधचिन्हाचा सोशल मीडियावर ॲनिमेशनच्या स्वरूपात वापर करण्यात येणार आहे. सोशल मीडियाद्वारे ध्वनिचित्रफिती, जाहिराती, मान्यवरांचे आवाहन, घोषवाक्य अदींच्या माध्यमातून मतदार जागृती करण्यात येणार आहे.
मिस्ड कॉलचाटबॉट
मतदान करण्यासाठी प्रतिज्ञा करावयाची असल्यास मतदारांनी 9029901901 या क्रमांकावर ही मिस्ड कॉल करावा. हा मिस्ड कॉल म्हणजे संबंधित मतदाराने प्रतिज्ञा केल्याचे समजण्यात येईल. त्यानंतर मतदाराला लघु संदेश (एसएमएस) पाठविण्यात येईल. त्यात लिंकचा समावेश असेल. या लिंकवर गेल्यावर महावोटर नावाने फेसबुकवर चाटबॉट सुविधा उपलब्ध होईल. त्यावर मतदारांना विविध प्रश्नांची उत्तरे मिळतील. त्यात मतदार यादीतील नाव, मतदान केंद्र, मतदानाचा दिनांक, उमेदवारांसंदर्भातील माहिती आदींचा समावेश असेल.
राज्य निवडणूक आयोगाच्या या उपक्रमात बॉट तंत्रज्ञान विकसित करणारी जगप्रसिद्ध गपशप कंपनी, निवडणुकांसंदर्भात कार्यरत असलेली ऑपरेशन ब्लॅक डॉट ही स्वयंसेवी संस्था, सर्व घटकांत लोकप्रिय असलेली फेसबुक कंपनी, विविध विद्यापीठे व महानगरपालिका सहभागी झाल्या आहेत. तरूण आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये हा उपक्रम अधिक लोकप्रिय होऊ शकतो. चाटबॉटच्या माध्यमातून मतदारांशी सुसंवाद साधला जाईल. निवडणूक प्रक्रियेमध्ये आपण सक्रीय सहभागी असून मतदान करणे आवश्यक आहे, याची जाणीव या उपक्रमाच्या माध्यमातून मतदारांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
कॉप मोबाईल ॲप
महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी कॉप (Citizens On Patrol) या मोबाईल ॲपचा वापर केला जाणार आहे. या ॲपच्या नावातच जनतेची गस्त किंवा नजर असा आशय समावला आहे. या ॲपच्या माध्यमातून सर्वसामान्य मतदारही निवडणूक प्रक्रियेवर नजर ठेवू शकतात. आचारसंहिता भंगाच्या तक्रारी घटनेच्या ठिकाणावरून तात्काळ अत्यंत सुलभ व सहज पद्धतीने करता येतील. प्रचाराच्या कालावधीत काही गैरप्रकार आढळल्यास छायाचित्रासह तो ॲपद्वारे तात्काळ निवडणूक यंत्रणांच्या निदर्शनास आणून देता येईल. त्यानंतर निवडणूक संनियंत्रण समिती त्यावर योग्य ती कार्यवाही करेल. या ॲपद्वारे तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्याची व्यवस्था आहे.
निवडणूक वार्ताचा विशेषांक
राज्य निवडणूक आयोगातर्फे निवडणूक वार्ता नावाने सहामाही गृहपत्रिका प्रकाशित केली जाते. या गृहपत्रिकेच्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचातय समिती निवडणूक विशेषांकाचेही मा. राज्यपाल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यात निवडणुकांची तयारी, आचारसंहिता, निवडणूक खर्च, स्वेच्छा निधीचा वापर, मतदार जागृती आदींचा संक्षिप्त आढावा घेतला आहे. या निवडणुकांची पूर्वपीठिकाही यात दिली आहे. नगरपरिषद व नगरपंचायतींच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांचा मागोवा आणि निकालही यात आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात प्रथमच राज्य निवडणूक आयोगाच्या चित्ररथाचा समावेश करण्यात येणार आहे. त्याचीही सचित्र माहिती या अंकात दिली आहे.
संशोधन अहवालाचे प्रकाशन
पुणे येथील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेने नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या वेळी मतदारांना कशा प्रकारचा उमेदवार हवा याबाबत संशोधन केले होते. उमेदवार मतदारांना उपलब्ध असावा, तो प्रभागातील कामे करणारा असावा, उच्चशिक्षित असावा, अशी अपेक्षा मतदारांनी व्यक्त केल्या आहेत. या अहवालाचेही यावेळी मा. राज्यपाल यांच्या हस्ते प्रकाशन झाले.