Search This Blog

Wednesday, July 11, 2018

वानाडोंगरी नगरपरिषदेसाठी 15 ऐवजी 19 जुलैला मतदान


वानाडोंगरी नगरपरिषदेसाठी
15 ऐवजी 19 जुलैला मतदान
वडगाव, मुक्ताईनगर, बार्शीटाकळी व पारशिवनीत 16 ऐवजी 20 जुलैला मतमोजणी
मुंबई, दि. 11: न्यायालयीन प्रकरणामुळे वानाडोंगरी (जि. नागपूर) नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आता 15 ऐवजी 19 जुलै 2018 रोजी मतदान होणार आहे; तसेच 15 जुलै 2018 रोजी मतदान होणाऱ्या वडगाव (पुणे), मुक्ताईनगर (जळगाव), बार्शीटाकळी (अकोला) आणि पारशिवनी (नागपूर) या नगरपंचायतींसाठी वानाडोंगरीसोबतच 20 जुलै 2018 रोजी मतमोजणी होईल.
राज्य निवडणूक आयोगाने 15 जून 2018 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 15 जुलै 2018 रोजी मतदान होणार होते; परंतु वानाडोंगरी येथील विविध 5 जागांसंदर्भातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील दाखल झाले होते. ते जिल्हा न्यायालयाने 6 व 7 जुलै 2018 रोजी फेटाळले; परंतु निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक कालावधी देणे गरजेचे असल्याने आयोगाने सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे.
सुधारीत कार्यक्रमानुसार आता फक्त वानाडोंगरी नगरपरिषदेकरिता 19 जुलै 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान; तर 20 जुलै 2018 रोजी मतमोजणी होईल. त्यामुळे वडगाव (पुणे), मुक्ताईनगर (जळगाव), बार्शीटाकळी (अकोला) आणि पारशिवनी (नागपूर) या नगरपंचायतींचीदेखील मतमोजणी 16 ऐवजी 20 जुलै 2018 रोजी होईल, असे राज्य निवडणूक आयोगाकडून कळविण्यात आले आहे.