Search This Blog

Monday, June 25, 2018

सांगली-मिरज-कुपवाड व जळगाव महानगरपालिकेसाठी 1 ऑगस्टला मतदान


सांगली-मिरज-कुपवाड व जळगाव महानगरपालिकेसाठी 1 ऑगस्टला मतदान
वसई-विरार महानगरपालिकेच्या एका रिक्त पदासाठीदेखील मतदान
-राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई, दि. 25: सांगली-मिरज-कुपवाड व जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तसेच वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी 1 ऑगस्ट 2018 रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 3 ऑगस्ट 2018 रोजी होईल. त्यासाठी संबंधित क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.
            श्री. सहारिया यांनी सांगितले की, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेची मुदत 13 ऑगस्ट 2018 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 5 लाख 2 हजार 793 असून मतदारांची संख्या सुमारे 4 लाख 23 हजार 366 इतकी आहे. एकूण 20 प्रभागांतील 78 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 39 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 11, अनुसूचित जमातीसाठी 1, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 21 जागा राखीव आहेत.
            जळगाव महानगरपालिकेची मुदत 19 सप्टेंबर 2018 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 4 लाख 60 हजार 228 असून मतदारांची संख्या सुमारे 3 लाख 65 हजार 15 इतकी आहे. एकूण 19 प्रभागातील 75 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 38 जागा राखीव आहेत.अनुसूचित जातीसाठी 5, अनुसूचित जमातीसाठी 4; तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 20 जागा राखीव आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
            वसई-विरार शहर महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 97 च्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठीदेखील 1 ऑगस्ट 2018 रोजी मतदान होईल. या सर्व ठिकाणी 4 जुलै 2018 पासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरुवात होईल. 1 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी  3 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 10 वा. सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.

निवडणूक कार्यक्रम
·         नामनिर्देशनपत्रे दाखल करणे      :           4 ते 11 जुलै 2018
·         नामनिर्देशनपत्रांची छाननी          :           12 जुलै 2018
·         उमेदवारी मागे घेणे                    :           17 जुलै 2018 पर्यंत
·         निवडणूक चिन्ह वाटप               :           18 जुलै 2018
·         मतदान                                    :           1 ऑगस्ट 2018
·         मतमोजणी                               :           3 ऑगस्ट 2018
·         निकालाची राजपत्रात प्रसिध्दी     :           6 ऑगस्ट 2018 पर्यंत