Search This Blog

Thursday, July 19, 2018

जळगाव महानगरपालिका निवडणूक बैठक 18 जुलै 2018

मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात निवडणुकीसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक
     -राज्य निवडणूक आयुक्त
जळगाव, दि. 18: मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असून सोशल मीडियावरील खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. अशा अनुचित प्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर आणि आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही केली जाईल, असा इशारा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिला.
जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीची आढावा बैठक घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेस विविध अधिकारी आदी उपस्थित होते. श्री. सहारिया यांनी सांगितले की, जळगाव महानगरपालिकेची निवडणूक मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आयोगाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत व सोशल मीडियाबाबत विशेष दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. 
आजच्या  बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस अधिकारीदेखील उपस्थित होते. मतदान आणि मतमोजणीसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची पूर्तता झाली आहे. पोलीस बंदोबस्ताचेही पुरेसे नियोजन झाले आहे. आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणीसाठी पोलीसांसोबतच आयकर, विक्रीकर, वन विभाग, बँका, रेल्वे, सहकार, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क आदी विविध विभागांचे सहकार्य घेण्यात येत आहे. आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळण्यासाठी आणि पैसे, वस्तू, दारू आदींची अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी या विभागांची मदत होईल.
 मतदारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे. याबाबत कुठलाही अनुचित प्रकार आढळून येत असेल तर आपण निर्धास्तपणे तक्रार करू शकता. त्यासाठी कॉप हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. त्यावरून अनुचित प्रकाराची किंवा आचारसंहिता भंगाची माहिती देणाऱ्याचे नाव गोपनिय ठेवले जाईल. कॉपसोबतच मतदार, उमेदवार व राजकीय पक्षांच्या सोयीसाठी ट्रू-व्होटर हे दुसरे ॲपदेखील उपलब्ध करून दिले आहे. या ॲपद्वारे मतदारांना आपले नाव, मतदान केंद्रदेखील शोधता येते. उमेदवारांना व राजकीय पक्षांना निवडणूक खर्च सादर करता येतो, अशी माहितीही श्री. सहारिया यांनी दिली.
एकूण प्रभाग- 19
एकूण जागा- 75
एकूण मतदार- 3,65,072
एकूण मतदान केंद्रे- 469
निवडणूक कर्मचारी संख्या- 2,787