Search This Blog

Friday, October 27, 2017

2 व 3 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय परिषद

73 आणि 74 व्या घटना दुरुस्तीच्या 25 वर्षांच्या
वाटचालीसंदर्भात 2 व 3 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय परिषद
                              -राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई, दि. 27: भारतीय राज्य घटनेतील 73 आणि 74 व्या दुरुस्तीला 25 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठात 2 व 3 नोव्हेंबर 2017 रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद्घाटन मा. राज्यपाल सी. विद्यासागरराव यांच्या हस्ते; तर समारोप मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
राज्य निवडणूक आयोगाच्या येथील कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आयोगाचे सचिव शेखर चन्ने, मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरू धिरेन पटेल, नगरविकास विभागाचे विशेष कार्याधिकारी ज. ना. पाटील, ग्रामविकास विभागाचे उपसचिव संजय बनकर, प्रा. मृदुल निळे, प्रा. मानसी फडके आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, परिषदेचा विषय 73 व 74 व्या घटना दुरुस्तीची 25 वर्षे: प्रगती आणि भावी वाटचाल असा आहे. या घटना दुरुस्तीच्या तरतुदीनुसारच प्रत्येक राज्यांत स्वंतत्र राज्य निवडणूक आयोगांची स्थापना करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकाराने व राज्य शासनाच्या सहकार्याने मुंबई विद्यापीठ आणि पुणे येथील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेने या परिषदेचे आयोजन केले आहे. मुंबई विद्यापीठातील फिरोजशहा मेहता भवन (विद्यानगरी, कलिना कॅम्पस, सांताक्रुझ पूर्व, मुंबई-98) येथे ही परिषद होईल.
 मा. राज्यपालांच्या हस्ते 2 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता परिषदेचे उद्घाटन होईल. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे प्रमुख पाहुण्या असतील. दिल्ली येथील अकाऊंटिबिलीटी इनिशिएटिव्हचे सल्लागार टी. आर. रघुनंदन यांचे बीजभाषण होईल. मा. मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत 3 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी 3.45 वाजता परिषदेचा समारोप होईल. वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी प्रमुख पाहुणे असतील. नवी दिल्ली येथील इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे संचालक डॉ. जॉर्ज मॅथ्यू यांचे समारोपाचे भाषण होईल. मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि पुणे येथील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेचे संचालक डॉ. राजस परचुरे यावेळी उपस्थित असतील, असे त्यांनी सांगितले.
उद्‌घाटन आणि समारोपाशिवाय सहा वेगवेगळ्या विषयांवरही चर्चासत्र होतील. त्यात निवडणूक सुधारणा, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासन आणि राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्थांचे उल्लेखनीय कार्य, स्थानिक स्वराज्य संस्थामधील महिलांचा प्रभावी सहभाग, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यप्रणाली, निधी व अधिकार आदी विषयांचा समावेश असेल.73 व 74 व्या घटना दुरुस्तीची आतापर्यंतची वाटचाल आणि भावी दिशा काय असावी, याबाबत या परिषदेत विचारमंथन होईल. या परिषदेला स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, अभ्यासक, विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही श्री. सहारिया यांनी दिली.