Search This Blog

Thursday, October 5, 2017

ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रारूप मतदार याद्यांची 10 ऑक्टोबरला प्रसिद्धी

ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या
प्रारूप मतदार याद्यांची 10 ऑक्टोबरला प्रसिद्धी
17 ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत
मुंबई, दि. 5: ठाणे जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच अन्य जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी प्रभागनिहाय (निवडणूक विभाग व निर्वाचक गण) प्रारूप मतदार याद्या 10 ऑक्टोबर 2017 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर त्यावर 17 ऑक्टोबर 2017 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य‍ संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्रपणे मतदार याद्या तयार करीत नाही. भारत निवडणूक आयोगाकडून तयार केल्या जाणाऱ्या विधानसभेच्याच मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरल्या जातात. ठाणे जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक आणि अन्य पोट निवडणुकांसाठी 3 ऑक्टोबर 2017 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या ग्राह्य धरल्या जाणार आहेत.
विधानसभा मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन केल्यावर त्या प्रारूप स्वरुपात 10 ऑक्टोबर 2017 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर त्यावर 17 ऑक्टोबर 2017 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 31 ऑक्टोबर 2017 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांतील लेखनिकांच्या चुका, चुकून अन्य प्रभागात समाविष्ट झालेले एखाद्या मतदाराचे नाव, विधानसभा मतदार यादीत नाव असूनही संबंधित प्रभागाच्या मतदार यादीतून वगळलेले नाव इत्यादी स्वरूपाच्या हरकती व सूचनांचीच दखल घेण्यात येईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
मतदार याद्या प्रसिद्ध होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुका: जिल्हा परिषद- ठाणे. पंचायत समित्या- 1) शहापूर, 2) मुरबाड, 3) कल्याण, 4) भिवंडी, 5) अंबरनाथ.
मतदार याद्या प्रसिद्ध होत असलेल्या पोटनिवडणुका: जिल्हा परिषद निवडणूक विभाग- पांगरी नवघरे (जि. वाशीम, ता. मालेगाव). पंचायत समिती निवडणूक विभाग- चाणजे (उरण, जि. रायगड), माटणे (दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग), पानेवाडी (नांदगाव, जि. नाशिक), कोठली खु. (नंदुरबार, जि. नंदुरबार), किल्लारी (औसा, जि. लातूर), मलकापूर-1 (अकोला, जि. अकोला) आणि मार्डी (मारेगाव, जि. यवतमाळ).