Search This Blog

Tuesday, November 7, 2017

ठाणे जिल्हा परिषदेसाठी 13 डिसेंबरला मतदान

ठाणे जिल्हा परिषदेसाठी
13 डिसेंबरला मतदान
मुंबई, दि.07: ठाणे जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पाच पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच इतर विविध ठिकाणच्या आठ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांकरिता 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषण राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, ठाणे जिल्हा परिषदेच्या 53; तर त्यांतर्गतच्या शहापूर (जागा 28), मुरबाड (16), कल्याण (12), भिवंडी (42) आणि अंबरनाथ (8) या पाच पंचायत समित्यांच्या एकूण 106 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. मतदान केंद्रांची यादी व मतदार केंद्रनिहाय मतदार यादी 20 नोव्हेंबर 2017 रोजी प्रसिद्ध होईल. नामनिर्देशनपत्रे 23 नोव्हेंबर 2017 ते 28 नोव्हेंबर 2017 या कालावधीत स्वीकारली जातील. नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी संकेतस्थळाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
वाशीम जिल्हा परिषदेच्या पांगरी नवघरे (ता. मालेगांव) निवडणूक विभागाच्या रिक्त पदासाठीदेखील 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होत आहे. चाणजे (ता. उरण, जि. रायगड), माटणे (ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग), पानेवाडी (ता. नांदगाव, जि. नाशिक), कोठली खु. (ता. नंदुरबार, जि. नंदुरबार), किल्लारी (ता. औसा, जि. लातूर), मलकापूर (ता. अकोला, जि. अकोला) आणि मार्डी (ता. मारेगाव, जि. यवतमाळ) या निर्वाचक गणांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
निवडणूक कार्यक्रमाचा तपशील:
·         मतदान केंद्रे व मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिद्धी करणे- 20 नोव्हेंबर 2017
·         नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 23 नोव्हेंबर 2017 ते 28 नोव्हेंबर 2017
·         नामनिर्देशनपत्रांची छाननी- 29 नोव्हेंबर 2017
·         अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 04 डिसेंबर 2017
·         अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- 07 डिसेंबर 2017
·         मतदानाचा दिनांक- 13 डिसेंबर 2017
·         मतमोजणीचा दिनांक- 14 डिसेंबर 2017