राज्यातील
3,666 ग्रामपंचायतींसाठी
81 टक्के मतदानाचा प्राथमिक अंदाज
मुंबई, दि. 16: राज्यातील विविध 18 जिल्ह्यांमधील सुमारे
3 हजार 666 ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी 81 टक्के मतदान झाले.
यात थेट सरपंचपद आणि सदस्यपदांसाठीच्या मतदानाचा समावेश होता, अशी माहिती राज्य निवडणूक
आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने
जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार आज सुमारे 4 हजार 119 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक
निवडणुकांसाठी मतदान होणार होते; परंतु काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या.
त्याचबरोबर इतर विविध कारणांमुळे काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत.
त्यामुळे आज सुमारे 3 हजार 666 ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्षात मतदान झाले. किरकोळ अपवाद
वगळता सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया शांतता व सुरळीतपणे पार पडली. सर्व ठिकाणी उद्या
(ता. 17) मतमोजणी होईल.
आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची
जिल्हानिहाय संख्या अशी: ठाणे- 33, पालघर- 50, रायगड- 162,
रत्नागिरी- 154, सिंधुदुर्ग- 293, पुणे- 168, सोलापूर-
181, सातारा- 256, सांगाली- 425, कोल्हापूर- 435, उस्मानाबाद-
158, अमरावती- 250, नागपूर- 237, वर्धा- 86, चंद्रपूर-
52, भंडारा- 361, गोंदिया- 341 आणि गडचिरोली- 24. एकूण-
3,666.