निर्भय व
पारदर्शक निवडणुकांसाठी आचारसंहितेची काटकोर अंमलबजावणी करा
-राज्य निवडणूक आयुक्त
सांगली, दि. 19, (जि. मा. का.): सांगली
मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक निर्भय व पारदर्शी वातावरणात पार
पाडण्यामध्ये या प्रक्रियेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
त्यामुळे त्यांनी आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी अत्यंत दक्ष राहावे.
तसेच, निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का गतवेळच्या तुलनेत अधिक वाढावा, यासाठी यंत्रणांनी
विविध मार्गांनी जनजागृती करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी
आज येथे दिले.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर
तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी वि. ना. काळम,
पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, निवडणूक निरीक्षक नंदकुमार काटकर आणि प्रवीणकुमार देवरे,
राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव नि. ज. वागळे, उपायुक्त राजाराम झेंडे, महानगरपालिका
आय़ुक्त रवींद्र खेबुडकर यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय
अधिकारी, विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
लोकशाहीच्या बळकटीकरणामध्ये निवडणूक
प्रक्रिया अत्यंत पारदर्शी व निर्भय वातावरणात होणे आवश्यक असल्याचे सांगून राज्य निवडणूक
आयुक्त ज. स. सहारिया म्हणाले, निवडणुकीत मतदारांना प्रलोभन देण्यात येणार नाही अथवा
त्यांच्यावर दबाव आणला जाणार नाही, याची काळजी घेण्यासाठी व सरकार निवडीच्या प्रक्रियेबाबत
सर्वसामान्य मतदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आदर्श आचारसंहितेची काटेकोर
अंमलबजावणी करावी. गतवेळच्या निवडणुकीत 63 टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाचा
टक्का अधिक वाढावा, यासाठी विविध मार्गांनी यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे निर्देशही
त्यांनी यावेळी दिले.
उमेदवारांबद्दल लोकांना माहिती व्हावी,
यासाठी मतदान केंद्रांच्या बाहेर दर्शनी भागात, प्रमुख चौकांमध्ये फलक लावा. तसेच,
वर्तमानपत्रांमध्ये ठळकपणे माहिती द्या, असे सांगून ज. स. सहारिया यांनी सर्व मतदान
केंद्रे सुस्थितीत असतील, याची दक्षता घ्या. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांना मतदानासाठी
कोणतीही अडचण येणार नाही, याबाबत खबरदारी घ्या, असे निर्देश दिले. तसेच, ट्रू व्होटर
ऍ़प व कॉप ऍ़प या मोबाईल ऍ़पबद्दल लोकांमध्ये जागृती करा व याचा वापर अधिकाधिक होईल,
यासाठी प्रयत्न करा, असे त्यांनी सांगितले.
ज. स. सहारिया यांनी यावेळी महानगरपालिका
निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा पाच लाख रुपये आहे. पण, प्रत्यक्षात यापेक्षा
जास्त खर्च होण्याची शक्यता असते. निवडणुकीत पैशांच्या होणाऱ्या गैरवापराला प्रतिबंध
करण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिक दक्ष राहावे व खर्च मर्यादा ओलांडल्यास
निदर्शनास आणून द्यावे, अशा सूचना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले,
निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि पोलीस
विभाग यासह सर्व यंत्रणा एकजुटीने काम करत आहेत. आचारसंहितेचा भंग करण्याचा प्रयत्न
करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून, कायद्याचे राज्य असल्याची जाणीव करून देण्यात आली आहे.
आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यात येत असून, निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी
पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले
आहे. अभूतपूर्व रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली आहे. त्यामुळे गतवेळच्या पेक्षा या
वेळी मतदान निश्चितपणे जास्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी
तडीपार केसेस, जप्त केलेली रोकड यासह आचारसंहिता भंगाबाबत दाखल झालेल्या प्रकरणांबद्दल
माहिती दिली.
महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर
म्हणाले, महानगरपालिका निवडणुकीसाठी 20 प्रभागांतून 78 सदस्य निवडून द्यावयाचे आहेत.
त्यापैकी अनुसूचित जाती 11, अनुसूचित जमाती 1, ना. मा. प्र. 21, सर्वसाधारण 45 असे
आरक्षण आहे. स्त्रियांसाठी 39 आरक्षित पदे आहेत. 544 मतदान केंद्रे ही 100 टक्के आदर्श
मतदान केंद्रे करण्याचे नियोजन आहे. या निवडणुकीत 4 लाख, 24 हजार, 179 मतदार मतदान
करणार असून, यात 2 लाख, 15 हजार 547 पुरूष मतदार तर 2 लाख 8 हजार 595 स्री मतदार आणि
37 इतर मतदार आहेत, असे सांगून त्यांनी मतदान केंद्रे, इमारती, वाहतूक व्यवस्था, मतदान
यंत्रे, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, मतदार जनजागृतीसाठी करण्यात आलेले विविध उपक्रम
याबाबत सविस्तर माहिती दिली. मतदान प्रक्रियेसाठी एकूण 3 हजार 60 कर्मचारी व मतमोजणीसाठी
एकूण 3 हजार 34 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.