Search This Blog

Friday, October 27, 2017

2 व 3 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय परिषद

73 आणि 74 व्या घटना दुरुस्तीच्या 25 वर्षांच्या
वाटचालीसंदर्भात 2 व 3 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय परिषद
                              -राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई, दि. 27: भारतीय राज्य घटनेतील 73 आणि 74 व्या दुरुस्तीला 25 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठात 2 व 3 नोव्हेंबर 2017 रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद्घाटन मा. राज्यपाल सी. विद्यासागरराव यांच्या हस्ते; तर समारोप मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
राज्य निवडणूक आयोगाच्या येथील कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आयोगाचे सचिव शेखर चन्ने, मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरू धिरेन पटेल, नगरविकास विभागाचे विशेष कार्याधिकारी ज. ना. पाटील, ग्रामविकास विभागाचे उपसचिव संजय बनकर, प्रा. मृदुल निळे, प्रा. मानसी फडके आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, परिषदेचा विषय 73 व 74 व्या घटना दुरुस्तीची 25 वर्षे: प्रगती आणि भावी वाटचाल असा आहे. या घटना दुरुस्तीच्या तरतुदीनुसारच प्रत्येक राज्यांत स्वंतत्र राज्य निवडणूक आयोगांची स्थापना करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकाराने व राज्य शासनाच्या सहकार्याने मुंबई विद्यापीठ आणि पुणे येथील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेने या परिषदेचे आयोजन केले आहे. मुंबई विद्यापीठातील फिरोजशहा मेहता भवन (विद्यानगरी, कलिना कॅम्पस, सांताक्रुझ पूर्व, मुंबई-98) येथे ही परिषद होईल.
 मा. राज्यपालांच्या हस्ते 2 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता परिषदेचे उद्घाटन होईल. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे प्रमुख पाहुण्या असतील. दिल्ली येथील अकाऊंटिबिलीटी इनिशिएटिव्हचे सल्लागार टी. आर. रघुनंदन यांचे बीजभाषण होईल. मा. मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत 3 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी 3.45 वाजता परिषदेचा समारोप होईल. वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी प्रमुख पाहुणे असतील. नवी दिल्ली येथील इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे संचालक डॉ. जॉर्ज मॅथ्यू यांचे समारोपाचे भाषण होईल. मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि पुणे येथील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेचे संचालक डॉ. राजस परचुरे यावेळी उपस्थित असतील, असे त्यांनी सांगितले.
उद्‌घाटन आणि समारोपाशिवाय सहा वेगवेगळ्या विषयांवरही चर्चासत्र होतील. त्यात निवडणूक सुधारणा, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासन आणि राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्थांचे उल्लेखनीय कार्य, स्थानिक स्वराज्य संस्थामधील महिलांचा प्रभावी सहभाग, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यप्रणाली, निधी व अधिकार आदी विषयांचा समावेश असेल.73 व 74 व्या घटना दुरुस्तीची आतापर्यंतची वाटचाल आणि भावी दिशा काय असावी, याबाबत या परिषदेत विचारमंथन होईल. या परिषदेला स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, अभ्यासक, विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही श्री. सहारिया यांनी दिली.

Monday, October 16, 2017

3,666 ग्रामपंचायतींसाठी 81 टक्के मतदान

राज्यातील 3,666 ग्रामपंचायतींसाठी
 81 टक्के मतदानाचा प्राथमिक अंदाज
मुंबई, दि. 16: राज्यातील विविध 18 जिल्ह्यांमधील सुमारे 3 हजार 666 ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी 81 टक्के मतदान झाले. यात थेट सरपंचपद आणि सदस्यपदांसाठीच्या मतदानाचा समावेश होता, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार आज सुमारे 4 हजार 119 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार होते; परंतु काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्याचबरोबर इतर विविध कारणांमुळे काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आज सुमारे 3 हजार 666 ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्षात मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया शांतता व सुरळीतपणे पार पडली. सर्व ठिकाणी उद्या (ता. 17) मतमोजणी होईल.  
आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी: ठाणे- 33, पालघर- 50, रायगड- 162, रत्नागिरी- 154, सिंधुदुर्ग- 293, पुणे- 168, सोलापूर- 181, सातारा- 256, सांगाली- 425, कोल्हापूर- 435, उस्मानाबाद- 158, अमरावती- 250, नागपूर- 237, वर्धा- 86, चंद्रपूर- 52, भंडारा- 361, गोंदिया- 341 आणि गडचिरोली- 24. एकूण- 3,666.

Wednesday, October 11, 2017

नांदेड- वाघाळा महानगरपालिकेसाठी 60 टक्के मतदान

नांदेड- वाघाळा महानगरपालिकेसाठी सरासरी 60 टक्के मतदान
व्हीव्हीपॅटमुळे मतदारांना आपल्या मताची खात्री करणे झाले शक्य
            मुंबई, दि. 11: नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी 60 टक्के मतदान झाले. प्रभाग क्रमांक 2 मधील 31 मतदान केंद्रांवर प्रायोगिक तत्वांवर व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर करण्यात आला. त्यामुळे तेथील मतदारांना आपल्या मतदानाची खात्री करता आली. याचबरोबर बृहन्मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर महानगरपालिकेच्या प्रत्येकी एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान झाले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.
           श्री. सहारिया यांनी सांगितले की, नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या 20 प्रभागांतील 81 जांगासाठी मतदान झाले. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रांवर रांगा होत्या. त्या अनुषंगाने सुमारे 60 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये एकूण 37 मतदान केंद्रे होते. या सर्व केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीच्या माध्यमातून व्हीव्हीपॅटचा वापर करण्याचे नियोजन होते; परंतु तांत्रिक अडचणींमुळे 6 मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅटचा वापर करता आला नाही. त्यासाठी कंपनीच्या अभियंत्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले. अखेर या केंद्रांवर व्हीव्हीपॅटशिवाय मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
           प्रभाग क्रमांक 2 मधील मतदान केंद्र क्रमांक 4, 27, 29 आणि 31 वर व्हीव्हीपॅटद्वारे मतदान प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही; तर मतदान केंद्र क्रमांक 26 आणि 32 वर काही वेळाने व्हीव्हीपॅटची यंत्रणा बंद पडली. त्यामुळे तेथे नंतर व्हीव्हीपॅटशिवाय मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. ही सहा मतदान केंद्रे वगळून व्हीव्हीपॅट वापरण्यात आलेल्या सर्व 31 मतदान केंद्रांवर संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. तेथील मतदारांना आपण दिलेल्या उमेदवारालाच किंवा पक्षालाच आपले मत जात असल्याची खात्री करणे शक्य झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.
          प्रभाग क्रमांक 2 मधील व्हीव्हीपॅटद्वारे मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेल्या मतदान केंद्रांची मतमोजणी त्यातून प्राप्त झालेल्या चिठ्ठ्या व कंट्रोल युनिट या दोन्ही प्रकारे केली जाईल. मात्र सर्व मतदान केंद्रांतील कंट्रोल युनिटद्वारे केल्या जाणाऱ्या मतमोजणीचा निकाल अंतिम असेल. मतमोजणी उद्या (ता. 12) सकाळी 10 वाजता सुरू होईल. मतमोजणी प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांना नांदेड येथे प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेशही श्री. सहारिया यांनी दिले आहेत.
पोटनिवडणुकीसाठी मतदान
          बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 116, पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्र. 21अ, कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्र. 11; तर नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 35अ च्या रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठीदेखील आज मतदान झाले. त्यासाठी बृहन्मुंबई 50.64, पुण्यात 20.78, कोल्हापूरमध्ये 57.66 आणि नागपूरमध्ये 24.33 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या सर्व ठिकाणीदेखील उद्या (ता.  12) रोजी मतमोजणी होईल, अशी माहितीही श्री. सहारिया यांनी दिली.

Tuesday, October 10, 2017

नांदेड- वाघाळा महानगरपालिकेसाठी आज मतदान

नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या
सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान
पहिल्यांदाच होणार व्हीव्हीपॅटचा वापर
मुंबई, दि. 10: नांदेड- वाघाळा महानगपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या (ता. 11) मतदान होत असून 81 जागांसाठी 578 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 2 मध्ये प्रायोगिक तत्वावर व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर केला जाणार आहे. मतदानासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.
महापालिकेच्या एकूण 20 प्रभागांतील 81 जागांसाठी मतदान होणार आहे. एकूण 891 उमेदवारांनी वैध नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. त्यातील 313 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात आता 578 उमेदवार आहेत. व्हीव्हीपॅटचा वापर होत असलेल्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये 26 उमेदवार आहेत. उद्या सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 12 ऑक्टोबर 2017 रोजी मतमोजणी होईल.
एकूण 20 पैकी 19 प्रभाग चार सदस्यांचे आहेत. एक प्रभाग 5 सदस्यांचा आहे. एकूण 3 लाख 96 हजार 872 मतदार असून त्यांच्यासाठी 550 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभाग क्र.2 वगळता अन्य सर्व प्रभागांतील एका मतदान केंद्रावर सरासरी 734 मतदार असतील. व्हीव्हीपॅटचा वापर होत असलेल्या प्रभाग क्र.2 मध्ये मतदारांची एकूण संख्या 20 हजार 307 इतकी आहे. त्यांच्यासाठी 37 मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. या प्रभागात एका मतदान केंद्रावर सरासरी 550 मतदार असतील.

Saturday, October 7, 2017

ग्रामपंचायतींसाठी सरासरी 79 टक्के मतदान

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी
सरासरी 79 टक्के मतदान
मुंबई, दि. 7: विविध 16 जिल्ह्यांमधील 3 हजार 131 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासह सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, सध्या राज्यातील सुमारे साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. उर्वरित 3 हजार 131 ग्रामपंचायतींसाठी आज सरासरी 79 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्व ठिकाणी 9 ऑक्टोबर 2017 रोजी मतमोजणी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात विविध 18 जिल्ह्यांतील सुमारे 4 हजार 119 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 16 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होईल.
आज मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी: नाशिक- 150, धुळे- 96, जळगाव- 101, नंदुरबार- 42, अहमदनगर- 194, औरंगाबाद- 196, बीड- 655, नांदेड- 142, परभणी- 126, जालना- 221, लातूर- 324, हिंगोली- 46, अकोला- 247, यवतमाळ- 80, वाशीम- 254 आणि बुलडाणा- 257. एकूण- 3,131.

Thursday, October 5, 2017

ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रारूप मतदार याद्यांची 10 ऑक्टोबरला प्रसिद्धी

ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या
प्रारूप मतदार याद्यांची 10 ऑक्टोबरला प्रसिद्धी
17 ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत
मुंबई, दि. 5: ठाणे जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच अन्य जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी प्रभागनिहाय (निवडणूक विभाग व निर्वाचक गण) प्रारूप मतदार याद्या 10 ऑक्टोबर 2017 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर त्यावर 17 ऑक्टोबर 2017 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य‍ संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्रपणे मतदार याद्या तयार करीत नाही. भारत निवडणूक आयोगाकडून तयार केल्या जाणाऱ्या विधानसभेच्याच मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरल्या जातात. ठाणे जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक आणि अन्य पोट निवडणुकांसाठी 3 ऑक्टोबर 2017 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या ग्राह्य धरल्या जाणार आहेत.
विधानसभा मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन केल्यावर त्या प्रारूप स्वरुपात 10 ऑक्टोबर 2017 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर त्यावर 17 ऑक्टोबर 2017 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 31 ऑक्टोबर 2017 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांतील लेखनिकांच्या चुका, चुकून अन्य प्रभागात समाविष्ट झालेले एखाद्या मतदाराचे नाव, विधानसभा मतदार यादीत नाव असूनही संबंधित प्रभागाच्या मतदार यादीतून वगळलेले नाव इत्यादी स्वरूपाच्या हरकती व सूचनांचीच दखल घेण्यात येईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
मतदार याद्या प्रसिद्ध होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुका: जिल्हा परिषद- ठाणे. पंचायत समित्या- 1) शहापूर, 2) मुरबाड, 3) कल्याण, 4) भिवंडी, 5) अंबरनाथ.
मतदार याद्या प्रसिद्ध होत असलेल्या पोटनिवडणुका: जिल्हा परिषद निवडणूक विभाग- पांगरी नवघरे (जि. वाशीम, ता. मालेगाव). पंचायत समिती निवडणूक विभाग- चाणजे (उरण, जि. रायगड), माटणे (दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग), पानेवाडी (नांदगाव, जि. नाशिक), कोठली खु. (नंदुरबार, जि. नंदुरबार), किल्लारी (औसा, जि. लातूर), मलकापूर-1 (अकोला, जि. अकोला) आणि मार्डी (मारेगाव, जि. यवतमाळ).

Wednesday, October 4, 2017

मतदान यंत्रासह व्हीव्हीपॅटच्या चिठ्यांद्वारेही मतमोजणी

मतदान यंत्रासह व्हीव्हीपॅटच्या चिठ्यांद्वारेही मतमोजणी
                        -राज्य निवडणूक आयुक्त 
मुंबई, दि. 4: नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 11 ऑक्टोबर 2017 रोजी होणाऱ्या मतदानाकरिता एका प्रभागात प्रायोगिक तत्वावर व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर करण्यात येणार आहे; तसेच या प्रभागात नेहमीच्या मतदान यंत्राबरोबरच व्हीव्हीपॅटच्या चिठ्यांद्वारेदेखील मतमोजणी केली जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
राज्य निवडणूक आयोगाच्या येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आयोगाचे सचिव शेखर चन्ने यावेळी उपस्थित होते. श्री. सहारिया यांनी सांगितले की, नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या एकूण 20 पैकी चार सदस्य संख्या असलेल्या 19 प्रभागांतून सोडतीद्वारे प्रभाग क्र. 2 ची व्हीव्हीपॅट वापरण्यासाठी निवड करण्यात आली आहे. या प्रभागाच्या सर्व 37 मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅटचा प्रायोगिक तत्वावर वापर केला जाईल. हा वापर प्रायोगिक व प्रथमच असल्यामुळे या प्रभागातील मतमोजणी नेहमीच्या मतदान यंत्रासह व्हीव्हीपॅटमधून प्राप्त होणाऱ्या चिठ्ठ्यांद्वारेदेखील केली जाणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी टप्प्याटप्प्याने व्हीव्हीपॅटचा वापर करण्यास सुरूवात करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2013 मध्ये दिले. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने देशात काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर या यंत्राचा वापर सुरू केला आहे. त्याच धर्तीवर नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत या यंत्राचा वापर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 400 व्हीव्हीपॅट खरेदी तत्वावर उपलब्ध करून देण्याबाबत इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीला कळविले होते; त्यानुसार कंपनीने 400 व्हीव्हीपॅट उपलब्ध करून देण्याचे मान्य केले होते; परंतु तांत्रिक अडचणीमुळे खरेदी तत्वावर व्हीव्हीपॅट पुरविण्यास कंपनीने नंतर असमर्थता दर्शविली. मात्र या निवडणुकीत प्रायोगिक तत्वांवर काही व्हीव्हीपॅटच्या वापरास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी द्यावी, अशी विनंती कंपनीने केली होती, अशी माहिती श्री. सहारिया यांनी दिली.
कंपनीच्या विनंतीचा सखोल विचार करुन नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या एका प्रभागात हे व्हीव्हीपॅट प्रायोगिक तत्वावर वापरण्यास कंपनीला परवानगी देण्याचा निर्णय आयोगाने घेतला. त्यानुसार कंपनीने 70 व्हीव्हीपॅट 20 सप्टेंबर 2017 रोजी नांदेड महानगरपालिकेकडे पाठविले. व्हीव्हीपॅटच्या वापरासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांनी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची व इतर मान्यवरांची बैठक घेतली होती. या बैठकीतच सर्वांच्या उपस्थितीत सोडतीद्वारे प्रभाग क्रमांक 2 ची निवड करण्यात आली. या व्हीव्हीपॅटच्या वापराबाबतचे सर्व तांत्रिक प्रशिक्षण व त्यांची देखरेख कंपनीचे अधिकारी महानगरपालिका आयुक्तांशी सल्लामसलत करुन करणार आहेत. मतमोजणीसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. या समितीची मतमोजणी प्रक्रियेवर बारकाईने नजर असेल. मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर हे सर्व व्हीव्हीपॅट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया परत घेऊन जाणार आहे, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
नांदेड- वाघाळा महानगरपालिकेत एकूण 20 प्रभाग आणि 81 जागा आहेत. 19 प्रभाग चार सदस्यांचे आहेत. एक प्रभाग 5 सदस्यांचा आहे. एकूण 3 लाख 96 हजार 872 मतदार असून त्यांच्यासाठी 550 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभाग क्र.2 वगळता अन्य सर्व प्रभागांतील एका मतदान केंद्रावर सरासरी 734 मतदार असतील. व्हीव्हीपॅटचा वापर होत असलेल्या प्रभाग क्र.2 मध्ये मतदारांची एकूण संख्या 20 हजार 307 इतकी आहे. त्यांच्यासाठी 37 मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. या प्रभागात एका मतदान केंद्रावर सरासरी 550 मतदार असतील, असे ते म्हणाले.
81 जागांसाठी 578 उमेदवार
 एकूण 81 जागांसाठी 891 उमेदवारांनी वैध नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. त्यातील 313 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात आता 578 उमेदवार आहेत. व्हीव्हीपॅटचा वापर होत असलेल्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये 26 उमेदवार आहेत. 11 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 12 ऑक्टोबर 2017 रोजी मतमोजणी होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.

Tuesday, October 3, 2017

‘दिलखुलास’मध्ये राज्य निवडणूक आयुक्तांची मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात आजपासून
राज्य निवडणूक आयुक्तांची मुलाखत
        मुंबई, दि. 3:  आकाशवणीच्या अस्मिता वाहिनीवरील माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांची उद्या (ता. 4) आणि गुरुवारी (ता. 5) सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत मुलाखत प्रसारित होणार आहे.
        ‘नांदेड- वाघाळा महानगरपालिका आणि राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी’ हा मुलाखतीचा विषय आहे. नांदेड- वाघाळा महानगरपालिका निवडणुकीतील व्हीव्हीपॅटचा प्रायोगिक तत्वांवरील वापर आणि ग्रामपंचायत निवडणुकांसाठीची सज्जता आदी विविध विषयांबाबत श्री. सहारिया यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

'जय महाराष्‍ट्र'मध्ये आज राज्य निवडणूक आयुक्त

'जय महाराष्‍ट्र'मध्ये आज
राज्य निवडणूक आयुक्त
            मुंबई, दि. 3:  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित सह्याद्री वाहिनीवरील 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांची आज (ता. 3) सायंकाळी 7.30 वाजता मुलाखत प्रसारित होणार आहे.
         'नांदेड- वाघाळा महानगरपालिका आणि राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी' हा मुलाखतीचा विषय आहे. ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी ही मुलाखत घेतली आहे. उमेदवारांसाठी नवी खर्च मर्यादा, मतदान जागृती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नांदेड- वाघाळा महानगरपालिकेत व्हीव्हीपॅटचा प्रायोगिक तत्वांवरील वापर आदींबाबत श्री. सहारिया यांनी मुलाखतीत तपशीलवार माहिती दिली आहे.