बृहन्मुंबईसह
अन्य स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका
मतदार यादीत
नाव नोंदविण्यासाठी
14
ऑक्टोबरपर्यंत शेवटची संधी
मुंबई, दि. 5: बृहन्मुंबईसह 15
महानगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 296 पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये
मतदान करण्यासाठी मतदार यादीत नावे नोंदविण्याची 14 ऑक्टोबर 2016 पर्यंत शेवटची
संधी उपलब्ध आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दूरदर्शनच्या
सह्याद्री वाहिनीवरील मुलाखतीत दिली.
सह्याद्री
वाहिनीवरील माहिती व जनसंपर्क महासंचालनालय प्रायोजित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मतदार
जागृती या विषयावर श्री. सहारिया यांची ही मुलाखत काल प्रसारित झाली, त्यावेळी त्यांनी
ही माहिती दिली. श्री. हेमत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली होती. श्री. सहारिया
यांनी सांगितले की, 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर आधारीत तयार होणारी विधानसभेची
मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी वापरली
जाणार आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2017 रोजी किंवा तत्पूर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण
करणारे तरूण-तरूणींनी मतदार म्हणून आता नावे नोंदवू शकतात.
नवीन
मतदारांची नावे नोंदविण्याबरोबरच मतदार यादीतील मतदारांच्या नावात दुरूस्त्या
असल्यास त्याही या निमित्ताने करता येतील, त्याचबरोबर स्थलांतरीत, दुबार अथवा मयत
व्यक्तींची नावेदेखील वगळण्याची ही संधी आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या
संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. सहारिया यांनी या मुलाखतीत केले.