Search This Blog

Thursday, October 27, 2016

नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याच्या सूचना


नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक
स्थानिक सुट्टी असली तरीही 29 ऑक्टोबरला
नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याच्या सूचना

            मुंबई, दि. 27: काही जिल्ह्यांमध्ये 29 ऑक्टोबर 2016 रोजी दिवाळीनिमित्त स्थानिक सुट्टी असली तरीही त्या दिवशी नगरपरिषद, नगरपंचायत व नगरपरिषदेच्या थेट अध्यक्षपदाच्या निवडणुकांसाठीचे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात यावीत, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगातर्फे सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
          राज्य निवडणूक आयोगाने 212 नगरपरिषद, नगरपंचायतीच्या व नगरपरिषदेच्या थेट अध्यक्षपदासाठी चार टप्प्यातला निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. पहिल्या टप्प्यात 25 जिल्ह्यांतील 147 नगरपरिषदा व 18 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका; तसेच 147 नगरपरिषदांमधील अध्यक्षपदाच्या थेट निवडणुकांसाठी 27 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे भरण्याची 29 ऑक्टोबर 2016 ही अंतिम मुदत आहे. या दिवशी काही जिल्ह्यांमध्ये दिवाळीनिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
          जिल्हाधिकाऱ्यांना 16 जानेवारी 1958 च्या शासन निर्णयानुसार स्थानिक सुट्ट्या देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. या निर्णयातील परिच्छेद 5 मधील तरतूद लक्षात घेता स्थानिक सुट्ट्या निवडणूक नियमांतर्गत [नियम 2 (बी-1)] सार्वजनिक सुट्ट्या म्हणून गणल्या जात नाही. त्यामुळे 29 ऑक्टोबर 2016 रोजी स्थानिक सुट्टी असली तरीही नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात यावी, असेही आयोगाच्या पत्रकात नमूद केले आहे.