मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृह येथे बुधवारी झालेल्या स्थानिक स्वराज्य
संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील कार्यशाळेत मार्गदर्शन करताना राज्य निवडणूक
आयुक्त ज. स. सहारिया. डावीकडून मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमीत मल्लिक, मुख्य
सचिव स्वाधीन क्षत्रिय, अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी, पोलीस महासंचालक सतीश
माथूर, आयोगाचे सचिव शेखर चन्ने आदी.
निवडणुकीत अनुचित प्रकार टाळण्यासाठी
सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवाव
-राज्य
निवडणूक आयुक्त
मुंबई,
दि. 26: स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत प्रलोभनाच्या स्वरूपातील वस्तू, पैसे व मद्याच्या
वाटपाला प्रतिबंध करावा. त्याचबरोबर बँका व आयकर विभागाच्या मदतीने रोख रकमांच्या मोठ्या
व्यवहारांवर लक्ष ठेवावे; तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी सोशल मीडियावरदेखील बारकाईने
नजर ठेवावी, असे आदेश राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणुकांच्या पर्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगातर्फे सह्याद्री अतिथिगृह येथे
आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, गृह
विभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मल्लिक,
पोलीस महासंचालक सतीश माथूर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता, मुंबईचे पोलिस
आयुक्त डी. डी. पडसलगीकर, आयोगाचे सचिव शेखर चन्ने, विविध विभागांचे सचिव, विभागीय
आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त आदींसह आयकर विभाग,
राज्य उत्पादन शुल्क, विक्रीकर विभाग व राज्यस्तरीय बँकर्स समितीचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, कुख्यात
गुन्हेगारांची यादी करणे, अवैध शस्त्रे जमा करणे, भरारी पथके नियुक्ती करणे, नाका
तपासणी करणे आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. लोकसभा व विधानसभा
निवडणुकांप्रमाणे सर्व काळजी घ्यावी. क्षेत्रीय यंत्रणेने आचारसंहितेची प्रभावी
अंमलबजावणी करावी. पेड न्यूजबाबत दक्षता घ्यावी. सोशल मीडियावरील अफवा अथवा अनुचित
स्वरुपातील मजकुरावरही (पोष्ट) बारकाईने लक्ष ठेवावे व त्याला वेळीच आळा घालावा. बँका
आयकर विभागाच्या मदतीने रोख रकमांच्या व्यवहाराव लक्ष ठेवतानाच बस स्थानके, रेल्वे
स्थानके, विमानतळ आदी ठिकाणांबाबतही सतर्कता बाळगावी.
श्री. क्षत्रिय यांनी सांगितले की, मुक्त,
निर्भय व पारदर्शक वातावरणात निवडणुका पार पाडण्याची आपल्या राज्याची परंपरा वाखाणण्याजोगी
आहे. ही परंपरा कायम राखण्यासाठी न्यायालयांचे विविध निर्देश, कायद्यातील तरतुदी आणि आयोगाच्या आदेशांप्रमाणे संपूर्ण
यंत्रणेने कार्यवाही करावी.
संविधानातील तरतुदींनुसार सर्व कार्यवाही
करावी, असे श्री. बक्षी यांनी सांगितले; तर राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार व कार्यकक्षेबाबत श्री.
मलिक यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या अभिप्रायानुसार राज्य निवडणूक
आयोग स्वतंत्र आणि भारत निवडणूक आयोगाशी समकक्ष आहे. आयोगाच्या सूचनांचे आणि
आदेशांचे पालन करणे संबंधितांना बंधनकारक आहे.
कायदा व सुव्यवस्थेबाबत ग्वाही देताना
श्री. माथूर म्हणाले की, प्रचारसभा किंवा फेऱ्या काढण्यासाठी लागणाऱ्या विविध
प्रकारच्या परवानग्यांकरिता एक खिडकीसारखी व्यवस्था करावी. त्यामुळे प्रशासकीय
कार्यवाही सुलभ होते व पोलीस यंत्रणेवरील ताणही कमी होऊ शकतो. कायदा व सुव्यवस्था
राखण्यासाठी पोलीस दलातर्फे आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील.
|