Search This Blog

Wednesday, September 28, 2016

मतदार यादीत 14 ऑक्टोबरपर्यंत नावे नोंदवा

महानगरपालिका, जि. प. आणि पं. स. निवडणुकांमध्ये
मतदान करण्यासाठी 14 ऑक्टोबरपर्यंत नावे नोंदवा
                  -राज्य निवडणूक आयुक्तांचे आवाहन
           मुंबई, दि. 28: बृहन्मुंबईसह 15 महानगरपालिका, 26 जिल्हा परिषदा व 296 पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी नागरिकांनी 14 ऑक्टोबर 2016 पर्यंत मतदार यादीत नावे नोंदवावित; तसेच दुबार, स्थलांतरीत व मयत व्यक्तीची नावे वगळावित, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले.
          श्री. सहारिया यांनी सांगितले की, बृहन्मुंबईसह 10 महानगरपालिका, 26 जिल्हा परिषदा व 296 पंचायत समित्यांची मुदत मार्च-एप्रिल 2017 पर्यंत संपत आहेत; तर पाच महानगरपालिकांची मुदत मे व जून 2017 मध्ये संपत आहे. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी 1 जानेवारी 2017 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या तरूण तरूणींना 14 ऑक्टोबर 2016 पर्यंत विधानसभेच्या मतदार यादीत मतदार म्हणून नाव नोंदविण्याची अंतिम संधी आहे. कारण 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर आधारीत तयार होणारी विधानसभेचीच मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे.
          भारत निवडणूक आयोगातर्फे 16 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2016 या कालावधीत मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. त्याचे औचित्य साधून राज्य निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांना व्यापक प्रमाणावर जनजागृती मोहीम राबविण्याबाबत आदेश दिले आहेत. मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात नवीन मतदारांची नावे नोंदविण्याबरोबरच मतदार यादीतील आपले नावाबाबत अथवा पत्त्यातील तपशिलांत दुरूस्त्या करावयाच्या असल्यास त्यादेखील करता येतील; तसेच दुबार किंवा आपल्या कुटुंबातील मयत व्यक्तीचे नावदेखील वगळता येईल, असेही त्यांनी सांगितले.
मार्च- एप्रिल 2017 पर्यंत मुदत संपणाऱ्या महानगरपालिका:
1) बृहन्मुंबई, 2) ठाणे, 3) उल्हासनगर, 4) पुणे, 5) पिंपरी-चिंचवड, 6) सोलापूर, 7) नाशिक, 8) अकोला, 9) अमरावती आणि 10) नागपूर.
मे- जून 2017 पर्यंत मुदत संपणाऱ्या महानगरपालिका:
1)   भिवंडी- निजामपूर, 2) मालेगाव, 3) लातूर, 4) परभणी आणि 5) चंद्रपूर.
मार्च 2017 पूर्वी मुदत संपणाऱ्या जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची संख्या:
1)रायगड- 15, 2)रत्नागिरी- 9, 3)सिंधुदुर्ग- 8, 4)नाशिक- 15, 5)जळगाव- 15, 6)अहमदनगर- 14, 7)पुणे- 13, 8)सातारा- 11, 9)सांगली- 10, 10)सोलापूर- 11, 11)कोल्हापूर- 12, 12)औरंगाबाद- 9, 13)जालना- 8, 14)परभणी- 9, 15)हिंगोली- 5, 16)बीड- 11, 17)नांदेड- 16, 18)उस्मानाबाद- 8, 19)लातूर- 10, 20)अमरावती- 10, 21)बुलढाणा- 13, 22)यवतमाळ- 16, 23)नागपूर- 13, 24)वर्धा- 8, 25)चंद्रपूर- 15, आणि 26)गडचिरोली- 12.
मतदार जागृतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम:
  • ·        विद्यापीठे व महाविद्यालयांचा मतदार जागृतीत सहभाग
  • ·        विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मतदार नोंदणीची व्यवस्था
  • ·        मान्यवर व्यक्तींच्या माध्यमातून मतदारांना आवाहन
  • ·        सहकारी गृहनिर्माण संस्थांना 100 टक्के मतदार नोंदणीचे आवाहन
  • ·        मतदार जागृतीसाठी मोबाईल कंपन्यांकडून जनहितार्थ एसएमएस
  • ·        उद्योजक, बॅंक व कंपन्यांना मतदार जागृतीसाठी आवाहन
  • ·        कम्युनिटी रेडिओच्या माध्यमांतून मतदार जागृती
  • ·        सोशल मीडियाचा मतदार जागृतीसाठी वापर
  • ·        विद्यार्थ्यांसाठी निबंध, पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन
  • ·        नाटकांच्या मध्यंतरात थिएटरमध्ये मतदार जागृतीची उद्‌घोषणा