Search This Blog

Wednesday, March 2, 2022

राजकीय पक्ष बैठक

 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबत राजकीय पक्षांशी चर्चा
    मुंबई, दि. 2 (रानिआ): राज्यातील 14 महानगरपालिका, 208 नगरपरिषदा, 14 नगरपंचायती, 25 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विचारविनिमय करण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आयोगाच्या कार्यालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निवडणुकांच्या पूर्वतयारीबाबत माहिती देण्यात आली.  
    राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर आणि उपायुक्त अविनाश सणस यांच्यासह भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पार्टी, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), बहुजन समाज पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांची प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करण्यासाठी राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी विविध सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. राजकीय पक्ष नोंदणीपासून तर त्यांचे विविध अहवाल सादर करण्यापर्यंतची सर्व सुविधा लवकरच ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अद्ययावत माहितीकरिता आयोगाच्या संकेतस्थळासह उमेदवारांसाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा असेल. त्याचबरोबर उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्यासाठी, मतदारांना उमेदवारांबाबत माहिती जाणून घेण्यासाठी; तसेच मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी ट्रू व्होटर मोबाईल ॲपचीही सुविधा असेल, असे श्री. मदान यांनी यावेळी सांगितले.

Friday, December 17, 2021

ना. मा. प्रवर्गाच्या जागा अनारक्षित करून 18 जानेवारीला मतदान

 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित करून 18 जानेवारीला मतदान

मुंबई, दि. 17 (रानिआ): सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा आता अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होईल. उर्वरित सर्व जागांसाठी पूर्वनियोजनाप्रमाणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होईल; परंतु मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी एकाच दिवशी 22 डिसेंबर 2021 ऐवजी 19 जानेवारी 2022 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

श्री. मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या आणि 4 हजार 554 ग्रामपंचायतींतील 7 हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. सर्वोच्च न्यायालयाच्या 6 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार मात्र या सर्व निवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. अन्य सर्व जागांची निवडणूक प्रक्रिया पूर्वनियोजितपणे सुरू आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार आता नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या  जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवार्गातून भरण्यासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित केल्याने आता त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी झाल्या आहेत. त्यामुळे या जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित ठेवावयाच्या जागांसाठी संबंधित ठिकाणी सोडत काढण्यात येईल.

चार महानगरपालिकांतील चार जागांच्या पोटनिवडणुकांपैकी केवळ सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीची निवडणूक प्रक्रिया स्थगित केली होती. तेथे आता 18 जानेवारी 2022 रोजी मतदान आणि 19 जानेवारी 2022 रोजी मतमोजणी होईल. धुळे, अहमदनगर आणि नांदेड- वाघाळा या तीन महानगरपालिकांमधील प्रत्येका एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल. 

Tuesday, December 7, 2021

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती

 नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या
जागांवरील निवडणुकांना स्थगिती

मुंबई, दि. 7 (रानिआ): सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 21 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

श्री. मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या आणि 4 हजार 554 ग्रामपंचायतींतील 7 हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकांच्या अधीन राहूनच या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या.

सर्वोच्च न्यायालयाच्या 6 डिसेंबर 2021 च्या आदेशानंतर आता या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुका आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आल्या आहेत; परंतु अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण जागांसाठीची निवडणूक पूर्व घोषित कार्यक्रमानुसार पुढे सुरू राहील. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग जागांच्या स्थगित निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री. मदान यांनी सांगितले.

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा

·         भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद- 23 (एकूण जागा 105)

·         भंडारा व गोंदियातील 15 पंचायत समित्या- 45 (एकूण जागा 210)

·         राज्यातील 106 नगरपंचायती- 344 (एकूण जागा 1,802)

·         महानगरपालिका पोटनिवडणुका- 1 (एकूण 4 जागा)

Monday, December 6, 2021

जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

 जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीत
जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

मुंबई, दि. 6 (रानिआ): जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे; परंतु जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाचा पुरावा आणि विहीत नमुन्यातील हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

श्री. मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी आज (ता. 6) दुपारी 3 वाजेपर्यंत होता. तो आता सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जातवैधता पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा त्यासंदर्भातील कोणताही पुरावा आणि विहीत नमुन्यातील हमीपत्र सादर करण्यासाठी उद्या (ता. 7) दुपारी 12 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. निवडून आल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत हे हमीपत्र असेल.

नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते; परंतु राज्य शासनाने 6 डिसेंबर 2021 रोजीच्या अध्यादेशान्वये संबंधित कायद्यात सुधारणा केली आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकांकरिता जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 12 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे, असेही श्री. मदान यांनी सांगितले. 

     

Wednesday, December 1, 2021

मतदार नोंदणीसाठी मुदतवाढ

मतदार नोंदणीसाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

                          -राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई, दि. 1 (रानिआ): भारत निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा कालावधी वाढविण्यात आला असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आता पुन्हा 5 डिसेंबर 2021 पर्यंत पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी प्राप्त झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
         श्री. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगातर्फे 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. त्या आधारावर 5 जानेवारी 2022 रोजी विधानसभा मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्याच मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. त्याबाबत विविध माध्यमातून जनजागृतीही करण्यात आली आहे; परंतु या आगामी निवडणुकांची मोठी संख्या लक्षात घेवून संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास मुदतवाढ देण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्फत भारत निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार या कार्यक्रमास 5 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
          संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास मुदतवाढ मिळाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आता पुन्हा 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना 5 डिसेंबर 2021 पर्यंत मतदार यादीत नावे नोंदविण्याची संधी प्राप्त झाली आहे. ऑनलाईन पद्धतीनेदेखील www.nvsp.in या संकेतस्थळावर नाव नोंदविणे, नावाची पडताळणी करणे किंवा नावांतील, पत्त्यांतील तपशिलांत दुरुस्त्याही करता येतील. त्यासाठी विधानसभा मतदरसंघांच्या 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांतील आपल्या नावांचीही खात्री करुन घ्यावी. नाव नसल्यास ते त्वरीत नोंदवून घ्यावे; तसेच विहित पद्धतीने मृत व्यक्तींची किंवा दुबार नावेदेखील वगळावित, असे आवाहनही श्री. मदान यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी चॅटबॉट
            राज्य निवडणूक आयोग आणि गपशप संस्थेने मतदार नोंदणीची सुविधा आणि त्यांसदर्भातील संपूर्ण माहिती 'महाव्होटर चॅटबॉट'या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी http://bit.ly/mahavoter या दुव्यावर (लिंक) क्लिक करून किंवा +917669300321 या व्हॉट्सॲप क्रमांकावर hi करून माहिती मिळवू शकतो अथवा https://mahavoter.in या संकेत स्थळालाही भेट देऊ शकता.

Friday, November 26, 2021

भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांसाठी 21 डिसेंबरला मतदान

 भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांसाठी 21 डिसेंबरला मतदान

मुंबई, दि. 26 (रानिआ): भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदा; तसेच त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान आणि 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.

भंडारा जिल्हा परिषदेच्या 52 आणि त्यांतर्गतच्या 7 पंचायत समित्यांच्या 104; तर गोंदिया जिल्हा परिषदेच्या 53 आणि त्यांतर्गतच्या 8 पंचायत समित्यांच्या 106 जागांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. नामनिर्देशनपत्रे 1 ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत स्वीकारले जातील. 5 डिसेंबर 2021 रोजी सुट्टी असल्यामुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. 7 डिसेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता सुरू  होईल.

सार्वत्रिक निवडणुका होणाऱ्या जि. प. आणि पं. स. ची नावे: भंडारा जिल्हा परिषद- त्यांतर्गतच्या पंचायत समित्या- तुमसर, मोहाडी, भंडारा, साकोली, लाखनी, पवनी आणि लाखांदूर. गोंदिया जिल्हा परिषद- त्यांतर्गतच्या पंचायत समित्या- गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, आमगाव, सालेकसा, सडकअर्जुनी, अर्जुनी मोरगाव आणि देवरी.

Wednesday, November 24, 2021

नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबरला मतदान

 राज्यातील 105 नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबरला मतदान

 मुंबई, दि. 24 (रानिआ): विविध 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
            श्री. मदान यांनी सांगितले की, राज्यातील एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत संपलेल्या 81 आणि डिसेंबर 2021 मध्ये मुदत संपणाऱ्या 18; तसेच नवनिर्मित 6 अशा एकूण 105 नगरपंचायतींच्या प्रत्येकी 17 सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होईल. त्यासाठी 1 ते 7 डिसेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. 4 व 5 डिसेंबर 2021 रोजी सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 8 डिसेंबर 2021 रोजी होईल. मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.
        राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर कोविड-19 संदर्भात केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार व आवश्यक त्या उपाययोजना करून या निवडणुकांचा कार्यक्रम राबवावा. त्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर 2020 रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी, असेही निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहितीही श्री. मदान यांनी दिली.

सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे: ठाणे- मुरबाड व शहापूर, पालघर- तलासरी, विक्रमगड, मोखाडा, रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित), रत्नागिरी- मंडणगड, दापोली, सिंधुदुर्ग- कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ, पुणे- देहू (नवनिर्मित), सातारा- लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी, सांगली- कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ, सोलापूर- माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित), नाशिक- निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा, धुळे- साक्री, नंदुरबार- धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ, अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी, जळगाव- बोदवड, औरंगाबाद- सोयगाव, जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित), परभणी- पालम, बीड- केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी, लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ, उस्मानाबाद- वाशी, लोहारा बु., नांदेड- नायगाव, अर्धापूर, माहूर, हिंगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ, अमरावती- भातकुली, तिवसा, बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा, यवतमाळ- महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी जामणी, वाशीम- मानोरा, नागपूर- हिंगणा, कुही, वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर, भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर, गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, देवरी, सावली, चंद्रपूर- पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही, मुलचेरा, गडचिरोली- एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड.

पोटनिवडणुकांसाठीही मतदान

विविध जिल्ह्यातील सात नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या रिक्त जागांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. शिरोळ (6 अ), नागभीड (4 अ), जत (5 ब), सिल्लोड (12 अ), फुलंब्री (2 आणि 8), वानाडोंगरी ( 6 अ) आणि ढाणकी (12 आण 13) या नगरपरिषद/ नगरपंचायतींतील सदस्यपदांच्या रिक्तपदांसाठी या पोटनिवडणुका होत आहे.

महानगरपालिकांतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान

 चार महानगरपालिकांतील रिक्तपदांच्या
पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबरला मतदान

मुंबई, दि. 24 (रानिआ): धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
        श्री. मदान यांनी सांगितले की, या पोटनिवडणुकांसाठी संबंधित प्रभागात आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. नामनिर्देशनपत्रे 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत स्वीकारले जातील. 5 डिसेंबर 2021 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. 7 डिसेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 9 डिसेंबर 2021 पर्यंत असेल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना 10 डिसेंबर 2021 रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 22 डिसेंबर 2021 रोजी होईल.
       पोटनिवडणूक होत असलेली महानगरपालिकानिहाय रिक्तपदे अशी: धुळे- 5ब,  अहमदनगर- 9क, नांदेड वाघाळा- 13अ आणि सांगली मिरज कुपवाड- 16अ.

Tuesday, November 23, 2021

ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारेदेखील मतदार यादीत नाव नोंदणीची सुविधा

 

ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारेदेखील
मतदार यादीत नाव नोंदणीची सुविधा

मुंबई, दि. 23 (रानिआ): राज्य निवडणूक आयोगाच्या ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारेदेखील आता विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदविता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

श्री. मदान यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष व निवडणूक यंत्रणेला सुविधा व माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ट्रू-व्होटर मोबाईल ॲप विकसित करण्यात आली आहे. या ॲपच्या माध्यमातून विविध सुविधांसह मतदारांना मतदार यादीतील आपले नाव शोधता येते. त्यात आता मतदार नोंदणीच्या सुविधेचीही भर घालण्यात आली आहे. त्यातून भारत निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी संकेतस्थळाच्या लिंकद्वारे मतदार नोंदणी होईल. मतदारांच्या नावांत किंवा पत्त्यांतही दुरूस्ती करता येईल.

भारत निवडणूक आयोगातर्फे 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या निमित्ताने 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना मतदार म्हणून नाव नोंदविण्याची संधी आहे. या कार्यक्रमानंतर 5 जानेवारी 2022 रोजी विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्याच मतदार याद्या 2022 मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरल्या जाणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक पात्र नागरिकांनी नावे नोंदवावित किंवा नावांत अथवा पत्त्यांत बदल असल्यास तोही आता करावा, असे आवाहन श्री. मदान यांनी केले.

Monday, November 22, 2021

चॅटबॉट

मतदार नोंदणीबाबत प्रश्नांची उत्तरे आता 'चॅटबॉट'द्वारे एका क्लिकवर

राज्य निवडणूक आयुक्तांच्या हस्ते प्रारंभ

मुंबई, दि. 22 (रानिआ): राज्य निवडणूक आयोग आणि गपशप संस्थेने 'महाव्होटर चॅटबॉट'द्वारे मतदार नोंदणीची सुविधा आणि त्यासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे आता एका क्लिकवर उपलब्ध करून दिली आहेत. त्याचा प्रारंभ राज्य राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांच्या हस्ते आज झाला.

राज्य निवडणूक आयोगाने 2017मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी जगात पाहिल्यांदा निवडणूक प्रक्रियेत ही सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यात प्रत्यक्ष मतदानाबाबतच्या सर्व माहितीचा समावेश होता. भारत निवडणूक आयोगातर्फे 30 नोव्हेबर 2021 पर्यंत राबविण्यात येत असलेल्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने आता मतदार नोंदणीसंदर्भातील सर्व प्रकारची माहिती आणि प्रश्नांची उत्तरे मिळतील.

महाव्होटर चॅटबॉटच्या http://bit.ly/mahavoter या दुव्यावर (लिंक) क्लिक केल्यास मराठी आणि इंग्रजी भाषेचा पर्याय उपलब्ध होईल. त्यानंतर आपल्या मनातील सर्व शंकांचे निरसन वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या माध्यमातून (एफएक्यू) सहज आणि सुलभरीत्या होईल. मतदार यादीतील आपल्या नावाचा शोध घेणे, मतदार यादीत नाव नोंदविणे, त्यासाठीचे आवश्यक कागदपत्रे, तांत्रिक स्वरूपाची माहिती, नावात किंवा पत्त्यात दुरुस्ती करणे, नाव वगळणे आदींसंदर्भातील एफएक्यूंचा त्यात समावेश आहे.

यादीतील आपल्या नावाचा शोध घेण्यासाठी, नव्याने नाव नोंदविण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी थेट लिंक उपलब्ध होईल. त्याद्वारे तिथल्या तिथे आपण अपेक्षित कार्यवाही करू शकतो. याशिवाय आपण +917669300321 या व्हॉट्सॲप क्रमांकावर Hi करून माहिती मिळवू शकतो किंवा https://mahavoter.in या संकेत स्थळालाही भेट देऊ शकता.

मतदार म्हणून आता विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यात नाव नोंदविल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांत मतदान करता येईल. महाव्होटर चॅटबॉटने तर मतदार नोंदणीचे काम अधिक सुलभ झाले आहे. तरुणांना ते नक्कीच आवडेल. त्यामुळे मतदारांनी 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. मदान यांनी केले आहे.