Search This Blog

Wednesday, December 1, 2021

मतदार नोंदणीसाठी मुदतवाढ

मतदार नोंदणीसाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

                          -राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई, दि. 1 (रानिआ): भारत निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा कालावधी वाढविण्यात आला असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आता पुन्हा 5 डिसेंबर 2021 पर्यंत पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी प्राप्त झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
         श्री. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगातर्फे 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. त्या आधारावर 5 जानेवारी 2022 रोजी विधानसभा मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्याच मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. त्याबाबत विविध माध्यमातून जनजागृतीही करण्यात आली आहे; परंतु या आगामी निवडणुकांची मोठी संख्या लक्षात घेवून संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास मुदतवाढ देण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्फत भारत निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार या कार्यक्रमास 5 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
          संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास मुदतवाढ मिळाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आता पुन्हा 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना 5 डिसेंबर 2021 पर्यंत मतदार यादीत नावे नोंदविण्याची संधी प्राप्त झाली आहे. ऑनलाईन पद्धतीनेदेखील www.nvsp.in या संकेतस्थळावर नाव नोंदविणे, नावाची पडताळणी करणे किंवा नावांतील, पत्त्यांतील तपशिलांत दुरुस्त्याही करता येतील. त्यासाठी विधानसभा मतदरसंघांच्या 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांतील आपल्या नावांचीही खात्री करुन घ्यावी. नाव नसल्यास ते त्वरीत नोंदवून घ्यावे; तसेच विहित पद्धतीने मृत व्यक्तींची किंवा दुबार नावेदेखील वगळावित, असे आवाहनही श्री. मदान यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी चॅटबॉट
            राज्य निवडणूक आयोग आणि गपशप संस्थेने मतदार नोंदणीची सुविधा आणि त्यांसदर्भातील संपूर्ण माहिती 'महाव्होटर चॅटबॉट'या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी http://bit.ly/mahavoter या दुव्यावर (लिंक) क्लिक करून किंवा +917669300321 या व्हॉट्सॲप क्रमांकावर hi करून माहिती मिळवू शकतो अथवा https://mahavoter.in या संकेत स्थळालाही भेट देऊ शकता.