Search This Blog

Tuesday, November 23, 2021

ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारेदेखील मतदार यादीत नाव नोंदणीची सुविधा

 

ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारेदेखील
मतदार यादीत नाव नोंदणीची सुविधा

मुंबई, दि. 23 (रानिआ): राज्य निवडणूक आयोगाच्या ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारेदेखील आता विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदविता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

श्री. मदान यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष व निवडणूक यंत्रणेला सुविधा व माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ट्रू-व्होटर मोबाईल ॲप विकसित करण्यात आली आहे. या ॲपच्या माध्यमातून विविध सुविधांसह मतदारांना मतदार यादीतील आपले नाव शोधता येते. त्यात आता मतदार नोंदणीच्या सुविधेचीही भर घालण्यात आली आहे. त्यातून भारत निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी संकेतस्थळाच्या लिंकद्वारे मतदार नोंदणी होईल. मतदारांच्या नावांत किंवा पत्त्यांतही दुरूस्ती करता येईल.

भारत निवडणूक आयोगातर्फे 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या निमित्ताने 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना मतदार म्हणून नाव नोंदविण्याची संधी आहे. या कार्यक्रमानंतर 5 जानेवारी 2022 रोजी विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्याच मतदार याद्या 2022 मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरल्या जाणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक पात्र नागरिकांनी नावे नोंदवावित किंवा नावांत अथवा पत्त्यांत बदल असल्यास तोही आता करावा, असे आवाहन श्री. मदान यांनी केले.