Search This Blog

Friday, September 11, 2020

देवराम चौधरी यांचे निधन

 राज्य निवडणूक आयोगाच्या उभारणीत
देवराम चौधरी यांचा मोलाचा वाटा
 -यू. पी. एस. मदान
        मुंबई, दि. 2: महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्य निवडणूक आयुक्त देवराम चौधरी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पारदर्शक निवडणुकांच्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाची भक्कम पायाभरणी केली आहे, अशा शब्दांत राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
         भारतीय राज्यघटनेतील 73 आणि 74 व्या घटना दुरुस्तीला अपेक्षित अशा राज्य निवडणूक आयोगाची उभारणी करण्यात श्री. चौधरी यांचा मोलाचा वाटा आहे. ते स्वतः कायदेतज्ज्ञ असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधिकाधिक निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी यथोचित आदेश त्यांच्या मार्गदर्शनाखाली निर्गमित करण्यात आले होते. ते आदेश आजही मार्गदर्शक आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाबाबत मतदार, उमेदवार आणि राजकीय पक्षांमध्ये विश्वासाची भावना निर्माण होण्यास मदत झाली, असेही श्री. मदान यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Thursday, July 16, 2020

नीला सत्यनारायण यांचे निधन

नीला सत्यनारायण यांच्या निधनाने
संवेदनशील अधिकारी, लेखिका हरपल्या
                                 -यू. पी. एस. मदान
         मुंबई, दि. 16: माजी राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या निधनाने एक संवेदनशील अधिकारी आणि लेखिका हरपल्या आहेत, अशा शब्दांत राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
राज्याच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला होतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांनी लोकशाही बळकटीस प्राधान्य दिले होते. त्यांच्या कारकर्दीत निवडणूक प्रक्रियेत माहिती व तंत्रज्ञानाचा वापरास प्रारंभ झाला होता. ‘क्रांतिज्योती’ प्रकल्प, मतदारांसाठी ‘नोटा’ची सुविधा, मतदारांच्या बोटावर मतदानाची निशाणी करण्यासाठी शाईऐवजी मार्कर पेनचा वापर आदींची सुरूवात त्यांच्याच काळात झाली होती. प्रशासकीय अधिकारी आणि साहित्यिक क्षेत्रातही त्यांनी आपली वेगळी ओळख प्रस्थापित केली होती, असेही श्री. मदान यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे.

Tuesday, March 17, 2020

निवडणूक प्रक्रिया स्थगित


राज्य निवडणूक आयोगाकडून
सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित
मुंबई, दि. 17 (रानिआ): करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत, असे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे जाहीर केले.
श्री. मदान यांनी सांगितले की, राज्यात करोना विषाणूचा (कोव्हिड- 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगास केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा 10 ऑगस्ट 2005 रोजीच्या निकालानुसार नैसर्गिक आपत्ती अथवा आकस्मिक परिस्थिती उद्‌भवल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगास आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणुकांशी संबंधित प्रभाग रचना, मतदार यादी व प्रत्यक्ष निवडणूक आदी स्वरूपाचे सर्व कार्यक्रम आज (ता.17) रोजी आहे त्या टप्प्यांवर स्थगित केले आहेत.
राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1 हजार 570 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यासाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तसेच नाशिक, धुळे, परभणी व ठाणे महानगरपालिकेतील प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीकरिता मतदर याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. वसई- विरार महानगरपालिका, अंबरनाथ, कुळगाव- बदलापूर, वाडी, राजगुरूनगर, भडगाव, वरणगाव, केज, भोकर आणि मोवाड या नऊ नगरपरिषदा/ नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 15पंचायत समित्या; तसेच सुमारे 12 हजार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेसंदर्भात कार्यवाही सुरू होती. या सर्व कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. पुढील कार्यवाहीसंदर्भात परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील, असेही श्री. मदान यांनी स्पष्ट केले आहे.

Tuesday, February 25, 2020

नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांची 9 मार्चला प्रसिद्धी


नाशिक, धुळे, परभणी व ठाणे महानगरपालिका पोटनिवडणुका
नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिकेच्या
प्रारूप मतदार याद्यांची 9 मार्चला प्रसिद्धी
मुंबई, दि. 25 (रानिआ): नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तर नाशिक, धुळे, परभणी व ठाणे या चार महानगरपालिकांतील प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीकरिता 9 मार्च 2020 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
विधानसभा मतदारसंघाच्या 31 जानेवारी 2020 रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येतील. त्या आधारावर तयार करण्यात येणाऱ्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 9 मार्च 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. या प्रारूप मतदान याद्यांवर 16 मार्च 2020 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय मतदार याद्या व मतदान केंद्रांच्या याद्या अनुक्रमे 23 व 24 मार्च 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. अंतिम मतदार याद्या 26 मार्च 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
नाशिक महानगरपालिकेच्या 4अ, धुळे महानगरपालिकेच्या 5ब, परभणी महानगरपालिकेच्या 11ब आणि ठाणे महानगरपालिकेच्या 30अ या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील या मतदार याद्या तयार करण्यात येत आहेत.
प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात.

Monday, February 24, 2020

दीड हजार ग्रामपंचायतींसाठी 29 मार्च रोजी मतदान


दीड हजार ग्रामपंचायतींसाठी
29 मार्च रोजी मतदान
मुंबई, दि. 24 (रा.नि.आ.): राज्यातील 19 जिल्ह्यांतील सुमारे 1 हजार 570 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29 मार्च 2020 रोजी मतदान; तर 30 मार्च 2020 रोजी मतमोजणी होणार आहे.
संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल 2020 ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होत आहेत. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे 6 ते 13 मार्च 2020 या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 16 मार्च 2020 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 18 मार्च 2020 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 29 मार्च 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतमोजणी 30 मार्च 2020 रोजी होईल.
सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 13, रायगड- 1, रत्नागिरी- 8, नाशिक- 102, जळगाव- 2, अहमनगर- 2, नंदुरबार- 38, पुणे- 6, सातारा- 2, कोल्हापूर- 4, औरंगाबाद- 7, नांदेड- 100, अमरावती- 526, अकोला- 1, यवतमाळ- 461, बुलडाणा- 1, नागपूर- 1, वर्धा- 3 आणि गडचिरोली- 296. एकूण- 1570.

Monday, February 3, 2020

निवडणुकांसंदर्भातील संशोधनासाठी आयोगाचे प्रोत्साहन



राज्य निवडणूक आयोगाचे प्रोत्साहन
                -यू. पी. एस. मदान
मुंबई, दि. 3 (रा.नि.आ.): स्थानिक‍ स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे विविध पैलू समजून घेण्यासाठी पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांनी संशोधन प्रकल्प हाती घ्यावेत. त्यासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मानस आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
लोकशाही पंधरवड्यानिमित्त एस. के. सोमय्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि राज्य निवडणूक आयोगाच्या लोकशाही, निवडणुका व सुशासन संस्थेतर्फे (आयडीईजीजी) आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सोमय्या ट्रस्टचे सचिव निवृत्त लेफ्टनंट जनरल जगबिर सिंह, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मनाली लोंढे, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. नितीन मोहोड, आयडीईजीजीचे विशेष कार्याधिकारी डॉ. मृदुल निळे यावेळी उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात बोलताना श्री. मदान म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यांच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा पाया आहे. या निवडणुका अधिक चुरशीच्या आणि गुंतागुंतीच्या असतात. त्यामुळे त्यांचे विविध पैलू समजून घेणे आवश्यक असल्याने त्याबाबत शास्त्रीय पद्धतीने संशोधन होण्याची गरज आहे. यात विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. राज्य निवडणूक आयोग निश्चितच सहकार्य करेल.
श्री. जगबिर सिंह म्हणाले की, लोकशाही ही महत्वाची आणि बहुसंख्य देशांनी स्वीकारलेली शासन प्रणाली आहे. या प्रणालीत प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य प्राप्त होते; परंतु त्याचबरोबर जबाबदारीही होते. जबाबदारीबरोबरच शिस्तदेखील महत्वाची असते. जबाबदार नागरिक म्हणून आपल्या सर्वांना पुढे घेवून जाणारे लोकप्रतिनिधी निवडून देणे गरजेचे असते. त्यावरच लोकशाहीचे भवितव्य अवलंबून असते.
राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकाराने 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत दरवर्षी लोकशाही पंधरवडा साजरा केला जातो. त्यानिमित्ताने सोमय्या महाविद्यालयात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या निमित्ताने लोकशाही आणि मतदार जागृतीसंदर्भात एका प्रदर्शनाचीही यावेळी आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्‌घाटन श्री. मदान यांच्याहस्ते यावेळी करण्यात आले.

Friday, January 24, 2020

26 जानेवारीपासून लोकशाही पंधरवडा


 राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकारातून
26 जानेवारीपासून लोकशाही पंधरवडा
मुंबई, दि. 24 (रा.नि.आ.): ‘लोकशाही, निवडणुका व सुशासन’ याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या लोकशाही पंधरवड्यानिमित्त राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी  दिली आहे.
श्री. मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकाराने 2018 पासून लोकशाही पंधरवड्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने देशाच्या विकास प्रक्रियेमधील स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्व, स्थान आणि भूमिका; तसेच त्यांच्या निवडणुकांचे महत्व अधोरेखित करणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात आणि वेळेवर पार पाडण्यासाठीच राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे; परंतु राज्य निवडणूक आयोग आणि भारत निवडणूक आयोग यांच्या कार्यकक्षेतील फरक आणि अधिकारांबाबत सर्व संबंधित घटकांमध्ये जनजागृती होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी हा उपक्रम निश्चितच फलदायी ठरु शकतो.
भारत निवडणूक आयोगातर्फे 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित 28 फेब्रुवारी 2020 ते 27 मार्च 2020 या कालावधीत मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण करण्यात येणार आहे. या संधीचा लाभ घेऊन अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी, यासाठी लोकशाही पंधरवड्यानिमित्त जनजागृती करता येईल. त्याचबरोबर लोकशाही पंधरवड्यानिमित्त लोकशाही व सुशासन याबाबत जनजागृती करणे, पंचायतराजसंदर्भातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करणे, राज्य निवडणूक आयोगाचे विविध उपक्रम सर्व संबंधित घटकांपर्यंत पोहचविणे, विविध स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लोकशाही बळकटीकरणाचा संदेश सर्वदूर पोहचविणे, महिला मतदारांच्या नोंदणीबाबत विशेष मोहीम राबविणे इत्यादी स्वरूपाचे उपक्रम या पंधरवड्यानिमित्त राबविण्याबाबतचे निर्देश सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनास देण्यात आले आहेत, असेही श्री. मदान यांनी सांगितले.