Search This Blog

Monday, February 3, 2020

निवडणुकांसंदर्भातील संशोधनासाठी आयोगाचे प्रोत्साहन



राज्य निवडणूक आयोगाचे प्रोत्साहन
                -यू. पी. एस. मदान
मुंबई, दि. 3 (रा.नि.आ.): स्थानिक‍ स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे विविध पैलू समजून घेण्यासाठी पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांनी संशोधन प्रकल्प हाती घ्यावेत. त्यासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मानस आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
लोकशाही पंधरवड्यानिमित्त एस. के. सोमय्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि राज्य निवडणूक आयोगाच्या लोकशाही, निवडणुका व सुशासन संस्थेतर्फे (आयडीईजीजी) आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सोमय्या ट्रस्टचे सचिव निवृत्त लेफ्टनंट जनरल जगबिर सिंह, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मनाली लोंढे, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. नितीन मोहोड, आयडीईजीजीचे विशेष कार्याधिकारी डॉ. मृदुल निळे यावेळी उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात बोलताना श्री. मदान म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यांच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा पाया आहे. या निवडणुका अधिक चुरशीच्या आणि गुंतागुंतीच्या असतात. त्यामुळे त्यांचे विविध पैलू समजून घेणे आवश्यक असल्याने त्याबाबत शास्त्रीय पद्धतीने संशोधन होण्याची गरज आहे. यात विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. राज्य निवडणूक आयोग निश्चितच सहकार्य करेल.
श्री. जगबिर सिंह म्हणाले की, लोकशाही ही महत्वाची आणि बहुसंख्य देशांनी स्वीकारलेली शासन प्रणाली आहे. या प्रणालीत प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य प्राप्त होते; परंतु त्याचबरोबर जबाबदारीही होते. जबाबदारीबरोबरच शिस्तदेखील महत्वाची असते. जबाबदार नागरिक म्हणून आपल्या सर्वांना पुढे घेवून जाणारे लोकप्रतिनिधी निवडून देणे गरजेचे असते. त्यावरच लोकशाहीचे भवितव्य अवलंबून असते.
राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकाराने 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत दरवर्षी लोकशाही पंधरवडा साजरा केला जातो. त्यानिमित्ताने सोमय्या महाविद्यालयात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या निमित्ताने लोकशाही आणि मतदार जागृतीसंदर्भात एका प्रदर्शनाचीही यावेळी आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्‌घाटन श्री. मदान यांच्याहस्ते यावेळी करण्यात आले.