Search This Blog

Friday, January 24, 2020

26 जानेवारीपासून लोकशाही पंधरवडा


 राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकारातून
26 जानेवारीपासून लोकशाही पंधरवडा
मुंबई, दि. 24 (रा.नि.आ.):लोकशाही, निवडणुका व सुशासनयाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या लोकशाही पंधरवड्यानिमित्त राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी  दिली आहे.
श्री. मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकाराने 2018 पासून लोकशाही पंधरवड्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने देशाच्या विकास प्रक्रियेमधील स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्व, स्थान आणि भूमिका; तसेच त्यांच्या निवडणुकांचे महत्व अधोरेखित करणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात आणि वेळेवर पार पाडण्यासाठीच राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे; परंतु राज्य निवडणूक आयोग आणि भारत निवडणूक आयोग यांच्या कार्यकक्षेतील फरक आणि अधिकारांबाबत सर्व संबंधित घटकांमध्ये जनजागृती होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी हा उपक्रम निश्चितच फलदायी ठरु शकतो.
भारत निवडणूक आयोगातर्फे 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित 28 फेब्रुवारी 2020 ते 27 मार्च 2020 या कालावधीत मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण करण्यात येणार आहे. या संधीचा लाभ घेऊन अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी, यासाठी लोकशाही पंधरवड्यानिमित्त जनजागृती करता येईल. त्याचबरोबर लोकशाही पंधरवड्यानिमित्त लोकशाही व सुशासन याबाबत जनजागृती करणे, पंचायतराजसंदर्भातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करणे, राज्य निवडणूक आयोगाचे विविध उपक्रम सर्व संबंधित घटकांपर्यंत पोहचविणे, विविध स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लोकशाही बळकटीकरणाचा संदेश सर्वदूर पोहचविणे, महिला मतदारांच्या नोंदणीबाबत विशेष मोहीम राबविणे इत्यादी स्वरूपाचे उपक्रम या पंधरवड्यानिमित्त राबविण्याबाबतचे निर्देश सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनास देण्यात आले आहेत, असेही श्री. मदान यांनी सांगितले.