Search This Blog

Friday, May 10, 2019

महानगरपालिकांच्या पोटनिवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची 17 मेस प्रसिद्धी


महानगरपालिकांच्या पोटनिवडणुकांसाठी
 प्रारूप मतदार याद्यांची 17 मेस प्रसिद्धी
मुंबई, दि. 10 (रानिआ): बृहन्मुंबई, उल्हासनगर, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, चंद्रपूर आणि कल्याण-डोंबिवली या महानगरपालिकांमधील 20 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीकरिता 17 मे 2019 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, या निवडणुकांकरिता 10 एप्रिल 2019 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येतील. त्याआधारावर तयार करण्यात येणाऱ्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 17 मे 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्या दिवसापासून त्यावर 21 मे 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 27 मे 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 29 मे 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशी माहितीही श्री. सहारिया यांनी दिली.
महानगरपालिकानिहाय पोटनिवडणूक होणारे प्रभाग: पुणे- 42अ, 42ब (हद्दवाढ क्षेत्रासाठी), 24ब आणि 1अ, उल्हासनगर- 1ब आणि 5अ, नाशिक- 10 ड, परभणी- 11अ आणि 3ड, मालेगाव- 6क, चंद्रपूर- 6ब आणि 13ब, कोल्हापूर- 28 आणि 55, कल्याण-डोंबिवली- 26, नवी मुंबई- 29, बृहन्मुंबई- 32, 28, 76 आणि 81.