नांदेड- वाघाळा महानगरपालिका
निवडणुकीत
एका प्रभागात
प्रायोगिक तत्वावर व्हीव्हीपॅटचा वापर
मुंबई, दि. 21: नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक
निवडणुकीसाठी 11 ऑक्टोबर 2017 रोजी होणाऱ्या मतदानासाठी एका प्रभागात प्रायोगिक तत्वावर
व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक
आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाने लोकसभा
व विधानसभा निवडणुकांसाठी टप्प्याटप्प्याने व्हीव्हीपॅटचा वापर करण्यास सुरूवात
करावी, असे आदेश
सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2013 मध्ये दिले. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने
देशात काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर या यंत्राचा वापर सुरू केला आहे. त्याच
धर्तीवर नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत या यंत्राचा वापर करण्यासाठी
राज्य निवडणूक आयोगाने 400 व्हीव्हीपॅट खरेदी तत्वावर उपलब्ध करून देण्याबाबत इलेक्ट्रॉनिक्स
कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीला कळविले होते; त्यानुसार कंपनीने
400 व्हीव्हीपॅट उपलब्ध करून देण्याचे मान्य केले होते; परंतु तांत्रिक अडचणीमुळे खरेदी
तत्वावर व्हीव्हीपॅट पुरविण्यास कंपनीने नंतर असमर्थता दर्शविली. मात्र या निवडणुकीत
प्रायोगिक तत्वांवर काही व्हीव्हीपॅटच्या वापरास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी द्यावी,
अशी विनंती कंपनीने
केली होती.
कंपनीच्या
विनंतीचा सखोल विचार करुन नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या एका प्रभागात हे व्हीव्हीपॅट
प्रायोगिक तत्वावर वापरण्यास कंपनीला परवानगी देण्याचा निर्णय आयोगाने घेतला. त्यानुसार
कंपनीने 70 व्हीव्हीपॅट 20 सप्टेंबर 2017 रोजी नांदेड महानगरपालिकेकडे पाठविले. या महानगरपालिकेच्या एकूण 20
प्रभागांतील 81 जागांसाठी 11 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होत आहे. त्यासाठी या व्हीव्हीपॅटच्या
वापरासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांनी आज मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची
व इतर मान्यवरांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीतच सर्वांच्या उपस्थितीत चार सदस्य संख्या असलेल्या
19 प्रभागांतून सोडतीद्वारे प्रभाग क्रमांक 2 ची निवड करण्यात आली. या प्रभाग क्र.
2 मधील सर्व मतदान केंद्रांवर आता व्हीव्हीपॅटचा प्रायोगिक तत्वावर वापर केला
जाणार आहे. या व्हीव्हीपॅटच्या वापराबाबतचे सर्व तांत्रिक प्रशिक्षण व त्यांची
देखरेख कंपनीचे अधिकारी
महानगरपालिका आयुक्तांशी सल्लामसलत करुन करणार आहेत. मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर हे सर्व
व्हीव्हीपॅट इलेक्ट्रॉनिक्स
कॉर्पोरेशन
ऑफ इंडिया परत घेऊन जाणार आहे, असेही श्री. सहारिया
यांनी सांगितले.