थेट सरपंचपदासाठीदेखील
होणार मतदान
मुंबई, दि. 1: राज्यात नोव्हेंबर व डिसेंबर 2017 मध्ये
मुदत संपणाऱ्या 7 हजार 576 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन टप्प्यांत
7 आणि 14 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणार आहे. यात सदस्यांसह थेट सरपंचपदांच्या निवडणुकांचाही
समावेश आहे. पहिल्या टप्प्यात विविध 18 जिल्ह्यांतील 3 हजार 884; तर दुसऱ्या टप्प्यात
16 जिल्ह्यांतील 3 हजार 692 ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल. त्यासाठी संबंधित ठिकाणी
आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी
आज येथे पत्रकार परिषदेत केली.
श्री. सहारिया यांनी सांगितले, की ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी
2018 या कालावधीत राज्याभरातील सुमारे 8,500 ग्रामपंचायतींच्या मुदती संपत आहेत. संविधानातील
तरदुदीनुसार मुदत संपण्यापूर्वी त्यांच्या निवडणुका घेणे आवश्यक आहे. यापैकी ऑक्टोबर
2017 मध्ये मुदत संपणाऱ्या 114 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम यापूर्वीच जाहीर
करण्यात आला आहे. त्यासाठी 23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान होत आहे. नोव्हेंबर व डिसेंबर
2017 मध्ये मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे.
जानेवारी व फेब्रुवारी 2018 मध्ये मुदत संपणाऱ्या 689 आणि नव्याने स्थापित झालेल्या
37 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम यथावकाश जाहीर करण्यात येईल.
तीन ते चार मते देणे आवश्यक
थेट सरपंचपदासाठी पहिल्यांदाच मोठ्याप्रमाणावर मतदान
होत असल्याने आचारसंहितेबाबत विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका मतदाराला
कमीत कमी तीन व जास्तीत जास्त चार मते द्यावी लागतील. एक मत थेट सरपंचपदासाठी असेल;
तर अन्य मते आपल्या प्रभागातील सदस्यपदांसाठी द्यावी लागतील. पूर्वीप्रमाणेच सदस्यांसह
थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठीदेखील निवडणूक चिन्ह म्हणून मुक्त चिन्हांचा वापर केला
जाईल. राजकीय पक्षांसाठी आरक्षित असलेल्या चिन्हांचा या निवडणुकीत वापर होणार नाही.
सरपंचपदासाठी फिकी निळी मतपत्रिका
पहिली मतपत्रिका सरपंचपदाच्या जागेसाठी असेल. सरपंचपदासाठीच्या
मतपत्रिकेचा रंग फिका निळा असेल. सदस्यपदाच्या मतपत्रिकांचे रंग पूर्वीप्रमाणेच असतील
अनुसूचित जातीच्या जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका गुलाबी, अनुसूचित जमातीच्या राखीव
जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका हिरवा; तर नागरिकांचा मागासप्रवर्गाच्या जागेसाठीच्या
मतपत्रिकेचा रंग फिका पिवळा असेल. सर्वसाधारण जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग पांढरा
असेल.
…तर 7 वी उत्तीर्ण आवश्यक
सरपंचपदाची उमेदवार असलेली व्यक्ती 1 जानेवारी 1995
रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली असल्यास किमान 7 वी इयत्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अशा उमेदवारांना 7 वी इयत्ता उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने
तसे प्रमाणित करणे आवश्यक राहील.
आचारसंहिता लागू
या सर्व ठिकाणी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून
आचारसंहिता लागू झाली आहे. ज्या जिल्ह्यांत एकूण ग्रामपंचायतींपैकी 50 टक्के किंवा
त्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्यास अशा जिल्ह्याच्या संपूर्ण ग्रामीण
क्षेत्रात आचारसंहिता लागू असेल. त्याचप्रमाणे ज्या तालुक्यात 50 टक्के किंवा त्यापेक्षा
अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्यास अशा तालुक्याच्या संपूर्ण ग्रामीण क्षेत्रात
आचारसंहिता लागू राहील. निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या लगतच्या गावांमध्येसुद्धा
आचारसंहिता लागू राहील; परंतु निवडणूक नसलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकास कामांवर
कोणतेही निर्बंध राहणार नाही. त्यांना फक्त निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील
मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कोणतीही कृती करता येणार नाही. निकाल लागल्यानंतर आचारसंहिता
संपुष्टात येईल. मतदानाच्या दिवशी संबंधित ठिकाणी जिल्हाधिकारी स्थानिक सुट्टी जाहीर
करतील.
पहिला टप्पा
पहिल्या टप्प्यासाठी नामनिर्देशनपत्रे 15 सप्टेंबर ते
22 सप्टेंबर 2017 या कालावधीत दाखल करता येतील. ते 27 सप्टेंबर 2017 पर्यंत मागे घेता
येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. 07 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7.30
ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 9 ऑक्टोबर 2017 रोजी मतमोजणी होईल.
दुसरा टप्पा
दुसऱ्या टप्प्यासाठी नामनिर्देशनपत्रे 22 सप्टेंबर ते
29 सप्टेंबर 2017 या कालावधीत दाखल करता येतील. ते 05 ऑक्टोबर 2017 पर्यंत मागे घेता
येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. 14 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7.30
ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी
7.30 ते दुपारी केवळ 3.00 वाजेपर्यंत असेल. या सर्व ठिकाणी 16 ऑक्टोबर 2017 रोजी मतमोजणी
होईल.
पहिल्या टप्यात 7 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय
संख्या अशी: नाशिक-
170, धुळे- 108, जळगाव- 138, नंदुरबार- 51, अहमदनगर-
204, औरंगाबाद- 212, बीड- 703, नांदेड- 171, परभणी-
126, उस्मानाबाद- 165, जालना- 240, लातूर- 353, हिंगोली-
49, अमरावती- 262, अकोला- 272, यवतमाळ- 93, वाशीम-
287 आणि बुलडाणा- 280. एकूण- 3,884.
दुसऱ्या टप्यात 14 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय
संख्या अशी: ठाणे- 41, पालघर- 56, रायगड- 242, रत्नागिरी-
222, सिंधुदुर्ग- 325, पुणे- 221, सोलापूर- 192, सातारा-
319, सांगली- 453, कोल्हापूर- 478, नागपूर- 238, वर्धा-
112, चंद्रपूर- 52, भंडारा- 362, गोंदिया- 353 आणि गडचिरोली-
26. एकूण- 3,692.