Search This Blog

Friday, December 30, 2016

अवैध दारूच्या वाहतूक व विक्रीला प्रतिबंध

वन, पोलिस व तटरक्षक दलाच्या समन्वयातून
अवैध दारूच्या वाहतूक व विक्रीला प्रतिबंध करावा
                        -राज्य निवडणूक आयुक्त
       मुंबई, दि. 30: महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या वेळी अवैध दारूच्या वाहतुकीला व विक्रीला प्रतिबंध घालण्याठी राज्य उत्पादन शुल्क, वन, पोलिस व तटरक्षक दलाने आपसात समन्वय साधून कठोर उपाययोजना कराव्यात, असे आदेश राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिले आहेत.
          स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आयोगाच्या कार्यालयात नुकतीच बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आयोगाचे सचिव शेखर चन्ने, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त व्ही. राधा, अन्न व औषध प्रशासन आयुक्त हर्षदीप कांबळे, रेल्वे पोलीस आयुक्त निकित कौशिक, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रभात कुमार यांच्यासह वन, परिवहन, सीमा शुल्क, तटरक्षक दल आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
          श्री. सहारिया यांनी सांगितले की, निवडणुकांच्या काळात शेजारील राज्य किंवा जिल्ह्यांमधून होणारी संभाव्य अवैध दारूची वाहतूक रोखण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे. परिवहन विभागाच्या सर्व सीमा तपासणी नाक्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मदतीने अवैध दारूच्या तस्करीला प्रतिबंध करावा. कोकण रेल्वेच्या रो-रो सेवेवरही नजर ठेवावी.
        अवैध दारू निर्मिती रोखण्यासाठी त्याच्या कच्च्या पदार्थ्यांच्याही वाहतूक व विक्रीबाबत अन्न व औषध प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी. वन विभागाच्या क्षेत्रातही अवैध दारूनिर्मिती होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. समुद्र किनारा, खाडी अथवा खारफुटीच्या वनांच्या परिसरात अवैध दारू निर्मिती किंवा साठा होऊ नये यासाठी सीमा शुल्क विभागाच्या मरीन व प्रिव्हेंटिव्ह शाखेच्या मदतीने तटरक्षक दलाच्या बोटीतून गस्त घालावी, असे निर्देशही श्री. सहारिया यांनी दिले.