Search This Blog

Thursday, February 4, 2021

जि.प. व पं.स.मधील रिक्तपदांसाठी 18 फेब्रुवारीला प्रारूप मतदार याद्या

जि.प. व पं.स.मधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 18 फेब्रुवारीला प्रारूप मतदार याद्या

मुंबई, दि. 5 (रानिआ): विविध 19 जिल्हा परिषदा आणि 27 पंचायत समित्यांमधील 60 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 18 फेब्रुवारी 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
    श्री. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 15 जानेवारी 2021 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय (निवडणूक विभाग व निर्वाचक गण) विभाजित केल्यानंतर 18 फेब्रुवारी 2021 रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 5 मार्च 2021 रोजी निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अंतिम व अधिप्रमाणित करण्यात येतील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 10 मार्च 2021 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
    निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गणाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती श्री. मदान यांनी दिली.
    पोटनिवडणूक होत असलेल्या निवडणूक विभागांची जिल्हा परिषदनिहाय नावे अशी (कंसात तालुका): रायगड- वरसे (रोहा),  पुणे- शिर्सूफळ- गुणवाडी (बारामती), सांगली- उमदी (जत), सोलापूर- कुर्डू (माढा), कोल्हापूर- दत्तवाड (शिरोळ), नाशिक- कानाशी (कळवण), जळगाव- वाघोदा बु.- विवरा बु. (रावेर), अहमदनगर- सातेवाडी (अकोले), औरंगाबाद- घायगाव (वैजापूर), नांदेड- बोधडी बु. (किनवट), पेठवडज (कंधार), बारड (मुदखेड), लातूर- हाडोळती (अहमदपूर), एकुर्गा (लातूर), चापोली (चाकूर), हिंगोली- आंबा (वसमत), बीड- राजुरी न. (बीड), कडा (आष्टी), उस्मानाबाद- आष्टा (भूम), सांजा (उस्मानाबाद), जालना- पिरकल्याण (जालना), सेवली (जालना), परभणी- कोल्हा (मानवत), अमरावती- बेनोडा (वरुड), गायवाडी (दर्यापूर), देवगाव (धामणगाव रेल्वे), बुलढाणा- निमगाव (नांदुरा), उंद्री (चिखली), चंद्रपूर- मोहाडी नलेश्वर-वासेरा (सिंदेवाडी) आणि चुनाळा विरूर स्टेशन (राजुरा).
    पोटनिवडणूक होत असलेल्या निर्वाचक गणांची पंचायत समितीनिहाय नावे अशी (कंसात जिल्हा): तळा (रायगड)- काकडशेत, हवेली (पुणे)- मांजरी बु., कवठे महाकाळ (सांगली)- देशिंग, शिराळा (सांगली)- मणदूर, मिरज (सांगली)- कसबे डिग्रज, सातारा (सातारा)- दरे खुर्द, शिरोळ (कोल्हापूर)- दानोळी, कळवण (नाशिक)- मोकभणगी, यावल (जळगाव)- दहिगाव, यावल (जळगाव)- भालोद, शिरपूर (धुळे)- हिसाळे, साक्री (धुळे)- हट्टी खुर्द, श्रीगोंदा (अहमदनगर)- काष्टी, अकोले (अहमदनगर)- सातेवाडी, भूम (उस्मानाबाद)- आरसोली, उमरगा (उस्मानाबाद)- मुळज, उमरगा (उस्मानाबाद)- दाळींब, अर्धापूर (नांदेड)- मालेगाव, नांदेड (नांदेड)- वाडी (बु.), मुदखेड (नांदेड)- मुगट, औसा (लातूर)- खरोसा, परळी वै. (बीड)- धर्मापुरी, अमरावती (अमरावती)- वलगाव, अचलपूर (अमरावती)- कांडली, दिग्रस (यवतमाळ)- मांडवा, भद्रावती (चंद्रपूर)- पाटाळा, चंद्रपूर (चंद्रपूर)- पडोली, मूल (चंद्रपूर)- मारोडा, मूल (चंद्रपूर) जुनासुर्ला आणि आरमोरी (गडचिरोली)- अरसोडा.

निवडणुका रद्द झालेल्या ग्रामपंचायतींसाठी 12 मार्चला मतदान

निवडणुका रद्द झालेल्या ग्रामपंचायतींसाठी नव्या कार्यक्रमानुसार 12 मार्चला मतदान

मुंबई, दि. 4 (रा.नि.आ.): विविध कारणांमुळे निवडणूक रद्द केलेल्या नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) व कातरणी (ता. येवला), नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) आणि अहमदनगर जिल्ह्यातील वाकी (ता. जामखेड) ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी नव्या कार्यक्रमानुसार 12 मार्च 2021 रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर साकत (ता. जामखेड) ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. 2 साठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
    श्री. मदान यांनी सांगितले की, उमराणे, कातरणी आणि खोंडामळी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार होते; परंतु सदस्य व सरपंचपदांच्या लिलावप्रकरणी या तिन्ही ठिकाणी निवडणूक रद्द करण्यात आली होती. त्याचबरोबर वाकी ग्रामपंचायतीची आणि साकत ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र.2 मधील निवडणूक नि:पक्षपणे पार न पडल्यामुळे रद्द करण्यात आली होती. आता या सर्वांसाठी नव्या निवडणूक कार्यक्रमानुसार 16 ते 23 फेब्रुवारी 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील. त्यांची छाननी 24 फेब्रुवारी 2021 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 26 फेब्रुवारी 2021 असेल आणि त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 12 मार्च 2021 रोजी होईल व मतदान पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी लगेचच मतमोजणी होईल.

Tuesday, February 2, 2021

नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी प्रारूप मतदार याद्या 15 फेब्रुवारीला

 95 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी प्रारूप मतदार याद्या 15 फेब्रुवारीला
                                           रिक्तपदांसाठीदेखील प्रारूप मतदार याद्या
    मुंबई, दि. 2 (रानिआ): विविध जिल्ह्यांमधील 95 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच इतर विविध 31 नगरपरिषदा, नगरपंचायतींमधील 35 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 15 फेब्रुवारी 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 22 फेब्रुवारी 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
    श्री. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 15 जानेवारी 2021 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 15 फेब्रुवारी 2021 रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 22 फेब्रुवारी 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 1 मार्च 2021 रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 8 मार्च 2021 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
    प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती श्री. मदान यांनी दिली.
    प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणाऱ्या नगरपरिषदा/ नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे अशी: ठाणे- अंबरनाथ, कुळगाव- बदलापूर, मुरबाड, शहापूर, रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, रत्नागिरी- मंडणगड, सिंधुदुर्ग- कसई- दोडामार्ग, वाभवे- वैभववाडी, पुणे- राजगुरूनगर, चाकण, नाशिक- चांदवड, निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी, धुळे- साक्री, नंदुरबार- धडगाव- वडफळ्या- रोषणमाळ, जळगाव- भडगाव, वरणगाव अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर, जामखेड, शेवगाव, औरंगाबाद- सोयगाव, जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, परभणी- पालम, बीड- केज, शिरूर- कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी, लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर- अनंतपाळ, उस्मानाबाद- वाशी, नांदेड- भोकर, हिमायतनगर, नायगाव, हिंगोली- सेनगाव, औंढा- नागनाथ, अमरावती- भारकुली, तिवसा, धारणी, नांदगाव- खंडेश्वर, बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा, यवतमाळ- महागाव, कळंब, झरी, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, वाशीम- मानोरा, नागपूर- मोवाड, वाडी, हिंगणा, कुही, भिवापूर, वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर, भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर, गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, गोरेगाव, देवरी, चंद्रपूर- चिमूर, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, गडचिरोली- मुलचेरा, एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड.  

जिल्हा परिषदांसाठी 11 फेब्रुवारीला प्रारूप मतदार याद्या

      भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांसाठी 11 फेब्रुवारीला प्रारूप मतदार याद्या
    मुंबई, दि. 2 (रानिआ): भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 11 फेब्रुवारी 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 22 फेब्रुवारी 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
    श्री. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 15 जानेवारी 2021 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय (निवडणूक विभाग व निर्वाचक गण) विभाजित केल्यानंतर 11 फेब्रुवारी 2021 रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 22 फेब्रुवारी 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 3 मार्च 2021 रोजी निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अंतिम व अधिप्रमाणित करण्यात येतील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 10 मार्च 2021 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
    निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गणाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती श्री. मदान यांनी दिली.

महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांची 16 फेब्रुवारीला प्रसिद्धी

नवी मुंबई, वसई- विरार व कोल्हापूर महानगरपालिकेच्या
प्रारूप मतदार याद्यांची 16 फेब्रुवारीला प्रसिद्धी
पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदार याद्या

मुंबई, दि. 2 (रानिआ): नवी मुंबई, वसई- विरार आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच इतर विविध 16 महानगरपालिकांतील 25 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता 16 फेब्रुवारी 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 23 फेब्रुवारी 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
    श्री. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 15 जानेवारी 2021 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 16 फेब्रुवारी 2021 रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 23 फेब्रुवारी 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 3 मार्च 2021 रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 8 मार्च 2021 रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर 12 मार्च 2021 रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.
    प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती श्री. मदान यांनी दिली.
    विविध महानगरपालिकानिहाय रिक्त पदे अशी (कंसात कारण): नाशिक- 4अ (निधन), धुळे- 5ब (राजीनामा), परभणी- 11ब (निधन), 14क (निधन), ठाणे- 30अ (जात प्रमाणपत्र अवैध), 15ड (निधन), 23ड (निधन), अहमदनगर- 9क (अनर्ह), नांदेड वाघाळा- 13अ (निधन), नागपूर- 8ब (जात प्रमाणपत्र अवैध), मीरा भाईंदर- 10ड (निधन), मालेगाव- 20क (निधन), पिंपरी चिंचवड- 1ड (निधन), 14अ (निधन), 4ब (निधन), उल्हासनगर- 14ड (निधन), 8क (निधन) सोलापूर- 6क (निधन), सांगली मिरज कुपवाड- 16अ (निधन), अकोला- 4अ (निधन), 8क (निधन), 3क (निधन), भिवंडी निजामपूर- 9ब (राजीनामा), पुणे- 8क (निधन) आणि 29ब (निधन). 

Thursday, January 28, 2021

कातरणी ग्रामपंचायत निवडणूक रद्द

लिलावप्रकरणी कातरणी ग्रामपंचायत निवडणूक रद्द; संबंधितांवर कारवाई होणार
    मुंबई, दि. 28 (रा.नि.आ.): नाशिक जिल्ह्यातील कातरणी (ता. येवला) ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतीची आतापर्यंत राबविण्यात आलेली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
    श्री. मदान यांनी सांगितले की, कातरणी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार प्राप्त झाली होती. या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदांच्या 11 जागांसाठी आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 15 जानेवारी 2021 रोजी मतदान नियोजित होते. मात्र प्राप्त तक्रारीवरून सर्व 11 जागांवर लिलावाच्या माध्यमातून सकृतदर्शनी उमेदवार बिनविरोध निवडून येताना दिसत होते. त्यामुळे आयोगाने हे निकाल घोषित करण्यास मनाई केली होती.
    लिलावाच्या तक्रारीची दखल घेवून आयोगाने नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी आदींचे अहवाल; तसेच विविध कागदपत्रे आणि ध्वनिफितीमधील संभाषणाचे आयोगाने अवलोकन केले. त्यात तथ्य आढळून आल्यामुळे निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता अधिक तपास करून भारतीय दंड विधानाचे प्रकरण 9-अ नुसार अथवा अन्य कायद्यांतील तरतुदींनुसार संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करून आयोगास अहवाल सादर करावा, असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्याचे, श्री. मदान यांनी सांगितले.
    इच्छूक उमेदवारांना मुक्त वातावरणात निवडणूक लढविण्यापासून आणि मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार कातरणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत झाला आहे. यातून लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचे आणि आचारसंहितेचे भंग झाल्याचे सकृतदर्शनी सिद्ध होत आहे. अशा प्रकारांमुळे निवडणूक लढविण्याची सर्वांना समान संधी प्राप्त होऊ शकत नाही. हे प्रकार टाळण्यासाठी निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात निवडणूक घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आहे. ही संविधानात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी आयोगाने या ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द केली असून स्वतंत्रपणे नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल, असेही श्री. मदान यांनी सांगितले.

Wednesday, January 20, 2021

गडचिरोलीतील ग्रामपंचायतींसाठी सरासरी 67 टक्के मतदान

                                     गडचिरोलीतील ग्रामपंचायतींसाठी सरासरी 67 टक्के मतदान

मुंबई, दि. 20 (रा.नि.आ.): गडचिरोली जिल्ह्यातील 150 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 67 टक्के मतदान झाले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

श्री. मदान यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे 360 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 16 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अंशत: बिनविरोध झाल्या. त्यामुळे प्रत्यक्षात 170 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी; तर 150 ग्रामपंचायतींसाठी आज (ता. 20) मतदान झाले. सकाळी 7.30 पासून ते दुपारी 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ होती. या सर्व ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी 22 जानेवारी 2021 रोजी पार पडणार आहे.

 

ट्रू व्होटर ॲपद्वारे खर्चाचा हिशेब सादर करण्याची सुविधा

 ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना ट्रू व्होटर ॲपद्वारे खर्चाचा हिशेब सादर करण्याची सुविधा

मुंबई, दि. 20 (रा.नि.आ.): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष, निवडणूक यंत्रणा आदींसाठी उपयुक्त असलेल्या ट्रू व्होटर मोबाईल ॲपद्वारे ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

श्री. मदान यांनी सांगितले की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1958 नुसार निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना निवडणुकीच्या निकालानंतर 30 दिवसांच्या आत एकूण खर्चाचा हिशेब सादर करणे बंधनकारक आहे. विहित मुदतीत आणि पद्धतीने खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र घोषित करण्यात येते. त्यादृष्टीने उमेदवारांच्या सोयीसाठी राज्य ‍निवडणूक आयोगाने ट्रू व्होटर मोबाईल ॲपद्वारे खर्च सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा ऐच्छिक स्वरूपाची आहे; परंतु याद्वारे किंवा पारंपरिक पद्धतीने विहित मुदतीत खर्च सादर करणे बंधनकारक आहे.

निवडणूक खर्च सादर करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतची सूचना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका याचिकेवर निकाल देताना केली होती. त्यादृष्टीने ट्रू व्होटर मोबाईल ॲप उपयुक्त ठरत आहे. त्याचा वापर 2017 मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून मोठ्याप्रमाणावर करण्यात येत आहे. यात निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्याबरोबरच मतदार यादीत नाव शोधणे, मतदान केंद्राचे ठिकाण शोधणे, उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातीला माहिती जाणून घेणे आदी सुविधा देण्यात आलेल्या आहेत. निवडणुकांशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी मतदार यादी बनविणे, मतदान केंद्रांचा नकाशा तयार करणे, महत्वाचे अहवाल सादर करणे, मतदानाची आकडेवारी देणे आदी सुविधा आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका लढविलेल्या 80 हजार उमेदवारांनीदेखील हे ॲप डाऊनलोड केले आहे, असेही श्री. मदान यांनी सांगितले.

Friday, January 15, 2021

ग्रामपंचायतींसाठी सरासरी 79 टक्के मतदान

                                 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरासरी 79 टक्के मतदान

मुंबई, दि. 15 (रा.नि.आ.): राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

श्री. मदान यांनी सांगितले की, राज्यातील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 11 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अशंत: बिनविरोध झाल्या आहेत. सरपंच व सदस्यपदाच्या लिलावप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील 162 ग्रामपंचायतींसाठी 20 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. अशा विविध कारणांमुळे आज प्रत्यक्षात 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यात 22 जानेवारी 2021 रोजी; तर अन्य सर्व जिल्ह्यांत 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होईल.

आज मतदान होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या 1 लाख 25 हजार 709 जागांसाठी एकूण 3 लाख 56 हजार 221 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. छाननी आणि माघारीनंतर 2 लाख 41 हजार 598 उमेदवार शिल्लक होते. त्यापैकी 26 हजार 718 उमेदवार बिनिविरोध विजयी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अंतिमत: 2 लाख 14 हजार 880 उमेदवार आज प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात होते. त्यासाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले. अनेक ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदानासाठी मतदारांच्या रांगा होत्या. गडचिरोली जिल्ह्यात आणि गोंदिया जिल्ह्यातील चार तालुक्यांत मात्र दुपारी 3 पर्यंतच मतदानाची वेळ होती, असेही श्री. मदान यांनी सांगितले.

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी झालेल्या मतदानाची प्राथमिक अंदाजानुसार जिल्हानिहाय टक्केवारी (कंसात ग्रामपंचायतींची संख्या): ठाणे- 143, पालघर- 3, रायगड- 78, रत्नागिरी- 360, सिंधुदुर्ग- 66, नाशिक- 565, धुळे- 182, जळगाव- 687, नंदुरबार- 64, अहमनगर- 705, पुणे- 649, सोलापूर- 593, सातारा- 652, सांगली- 142, कोल्हापूर- 386, औरंगाबाद- 579, बीड- 111, नांदेड- 1013, परभणी- 498, उस्मानाबाद- 382, जालना- 446, लातूर- 383, हिंगोली- 421, अमरावती- 537, अकोला- 214, यवतमाळ- 925, वाशीम- 152, बुलडाणा- 498, नागपूर- 127, वर्धा- 50, चंद्रपूर- 604, भंडारा- 145, गोंदिया- 181 आणि गडचिरोली- 170. एकूण- 12,711.

ग्रामपंयात निवडणूक एक दृष्टिक्षेप

·        निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234

·        आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711

·        एकूण प्रभाग- 46,921

·        एकूण जागा- 1,25,709

·        प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221

·        अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024

·        वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197

·        मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719

·        बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718

·        अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880

Wednesday, January 13, 2021

सरपंच आणि सदस्यपदांचे लिलाव प्रकरण

 सरपंच आणि सदस्यपदाच्या लिलावाप्रकरणी
उमराणे व खोंडामळी ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द
                        -यू. पी. एस. मदान
मुंबई, दि. 13 (रा.नि.आ.): नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबद्दलचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतींची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
        श्री. मदान यांनी सांगितले की, उमराणे आणि खोंडामळी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याचबरोबर आयोगाकडे तक्रारीदेखील प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने आयोगाने अहवाल मागविले होते. जिल्हाधिकारी, निवडणूक निरीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांचा अहवाल; तसेच विविध कागदपत्रे आणि ध्वनिचित्रफितींचे अवलोकन केल्यानंतर या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. खोंडामळी येथील लिलावाप्रकरणी आधीच नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता अधिक तपास करून भारतीय दंड विधानाचे कलम 171 (क) अथवा अन्य कायद्यांतील तरतुदींनुसार संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करून आयोगास अहवाल सादर करावा, असे निर्देश नाशिक आणि नंदुरबारचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.
     काही ग्रामस्थांच्या एकतर्फी दबावात्मक निर्णयामुळे इच्छूक उमेदवारांना मुक्त वातावरणात निवडणूक लढविण्यापासून आणि मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार या दोन्ही गावांमध्ये झाला आहे. यातून लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचे आणि आचारसंहितेचे भंग झाल्याचे सकृतदर्शनी सिद्ध होत आहे. अशा प्रकारांमुळे निवडणूक लढविण्याची सर्वांना समान संधी प्राप्त होऊ शकत नाही. हे प्रकार टाळण्यासाठी निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात निवडणूक घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आहे. ही संविधानात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी आयोगाने या दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे, असेही श्री. मदान यांनी सांगितले.