गडचिरोलीतील ग्रामपंचायतींसाठी सरासरी 67 टक्के मतदान
मुंबई, दि. 20 (रा.नि.आ.): गडचिरोली जिल्ह्यातील 150
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 67 टक्के मतदान झाले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त
यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
श्री. मदान यांनी सांगितले की, गडचिरोली
जिल्ह्यातील सुमारे 360 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 16
डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत:
तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अंशत: बिनविरोध झाल्या. त्यामुळे प्रत्यक्षात 170
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी; तर 150 ग्रामपंचायतींसाठी आज (ता. 20) मतदान झाले. सकाळी 7.30 पासून ते दुपारी
3.00 पर्यंतच मतदानाची वेळ होती. या सर्व ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी 22 जानेवारी
2021 रोजी पार पडणार आहे.